विशेष प्रतिनिधि
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज १२ वर्षे पूर्ण झाली. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील ओंकारेश्वर मंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर उर्वरित तिघांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. Narendra Dabholkar
डॉ. नरेंद्र दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अघोरी समाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम केले होते. ते स्वतः या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देखील होते.
डॉ. दाभोळकर यांची मंगळवार दि. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली. पुढे, दाभोळकर हत्या प्रकरण हे २०१४ ला महाराष्ट्रातील सरकार बदलल्यानंतर सीबीआय कडे सुपूर्त करण्यात आले. या प्रकरणात सीबीआय आरोपपत्र दाखल झाल्यानंतर दीर्घ सुनावणीला सुरुवात झाली. १५ सप्टेंबर २०२१ रोजी आरोप निश्चित करण्यात आले व पुरावे नोंदविण्यास अखेर २९ ऑक्टोबर २०२१ पासून सुरुवात झाली. Narendra Dabholkar
तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांआधारे सीबीआयने ५ जणांना आरोपीच्या पिंजऱ्यात अडकवले. ज्यात डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सचिन प्रकाशराव आंदुरे, शरद भाऊसाहेब काळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांचा समावेश होता. या पाचही आरोपींचा सनातन संस्थेशी संबंध आहे.
अखेर तपासाअंती पुण्यातील विशेष न्यायलयात सुनावणी झाली. ज्यात आरोपी क्रमांक २ सचिन प्रकाशराव आंदुरे व आरोपी क्रमांक ३ शरद भाऊसाहेब कळसकर यांना, दोन डोळस साक्षीदारांचे जबाब व कळसकर यांनी दिलेला कबुली जबाब यामुळे, IPC कलम ३०२ व शस्त्र कायदा कलम ३ (२५) अंतर्गत खुनाचे दोषी ठरवण्यात आले. दोघांना आयुष्यभर कठोर कारावासाची व ५ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र इतर तीनही आरोपींना ( डॉ. विरेंद्रसिंह तावडे, अॅड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे ) निर्दोष मुक्तता देण्यात आली. Narendra Dabholkar
यात विशेष बाब मात्र अशी की निर्दोष म्हणून मुक्त करण्यात आलेला आरोपी विरेंद्रसिंह तावडे हाच या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा दाट संशय सीबीआयने व्यक्त केला होता. याच तावडे यांना ‘इतर कोणत्या गुन्ह्यात आवश्यक नसल्यास तात्काळ मुक्त’ करण्याचेही आदेश देण्यात आले.
संबंधित २ आरोपींना दोषी ठरवल्या नंतरही ‘आरोपी हे जरी प्रत्यक्ष शूटर असले तरी ते मास्टरमाइंड नसल्याचं’ निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. दोषी ठरलेला शरद कळसकर व सचिन आंदुरे (सवंतत्रपणे) यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात दोषसिद्धी विरोधात अपील केले आहे. ८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या सुनावणीत ‘माझ्या विरोधात ठोस पुरावा नसल्याचा’ काळसकरचा युक्तिवाद नोंदविला गेला आहे. हे प्रकरण अद्याप पुढील सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे. Narendra Dabholkar
दुसरीकडे मात्र, निर्दोष मुक्तता मिळालेल्या तिघांविरुद्ध CBI ने उच्च न्यायालयात अद्यापही अपील न केल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (MANS) व कुटुंबीयांनी २०२४ पासून सातत्याने आक्षेप नोंदविलेला आहे. १३ ऑगस्ट २०२५ रोजीही MANS ने पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा पुन्हा एकदा उपसाठीत केला होता.
दाभोळकरांच्या हत्येला आज १२ वर्ष पूर्ण होऊनही यंत्रणेला मुख्य सूत्रधार शोधण्यात मात्र यश आलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App