वृत्तसंस्था
वॉशिंग्टन डीसी : Trump अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या टीमने मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या तपासणीत समोर आले आहे की, निवडणुकीनंतर ट्रम्प आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी विविध निधी आणि योजनांसाठी सुमारे 2 अब्ज डॉलर (18 हजार कोटी रुपये) जमा केले. ही रक्कम त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी गोळा केलेल्या निधीपेक्षाही जास्त आहे.Trump
या तपासणीनुसार, टाइम्सने सरकारी कागदपत्रे, निधीचे रेकॉर्ड आणि अनेक लोकांशी बोलून शोधून काढले की, किमान 346 मोठे देणगीदार असे आहेत, ज्यापैकी प्रत्येकाने 2.5 लाख डॉलर किंवा त्याहून अधिक देणगी दिली.Trump
या लोकांकडूनच सुमारे 50 कोटी डॉलरपेक्षा जास्त रक्कम आली. यापैकी सुमारे 200 देणगीदार असे आहेत, ज्यांना किंवा ज्यांच्या व्यवसायांना ट्रम्प सरकारच्या निर्णयांचा फायदा झाला. यात सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांसारख्या 6 भारतीय वंशाच्या व्यावसायिकांचा समावेश आहे.
या फायद्यांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. कोणाला राष्ट्रपतींकडून माफी मिळाली, कोणाविरुद्ध सुरू असलेले खटले संपले, एखाद्या कंपनीला मोठे सरकारी कंत्राट मिळाले तर कोणाला थेट व्हाईट हाऊसपर्यंत पोहोच मिळाली किंवा सरकारमध्ये मोठे पद देण्यात आले.
मात्र, अहवालात असेही म्हटले आहे की, कोणी पैसे दिले आणि त्या बदल्यात थेट फायदा मिळाला हे सिद्ध करणे कठीण आहे, परंतु, पैसे आणि फायद्यांचे हे नाते प्रश्नचिन्ह निर्माण करते हे निश्चित आहे.
आता जाणून घ्या, ट्रम्पच्या टीमने निधी कसा गोळा केला
ट्रम्पच्या टीमने पैसे गोळा करण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग तयार केले. यापैकी सर्वात मोठा आहे MAGA (मेक अमेरिका ग्रेट अगेन) Inc., जो एक सुपर PAC आहे. PAC ही एक अशी संस्था असते, जी राजकारणासाठी पैसे गोळा करते आणि त्या पैशातून एखाद्या उमेदवाराला किंवा पक्षाला पाठिंबा देते.
याने नोव्हेंबर 2024 ते जून 2025 दरम्यान सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स गोळा केले. याशिवाय, ट्रम्पच्या शपथविधी समारंभासाठी स्थापन केलेल्या समितीने सुमारे 240 दशलक्ष डॉलर्स गोळा केले, जे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक आहे.
इतकंच नाही, तर व्हाईट हाऊसमध्ये एक शानदार बॉलरूम बनवण्यासाठीही निधी गोळा केला जात आहे. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की यासाठी सुमारे 350 दशलक्ष डॉलर्स जमा झाले आहेत, जरी टाइम्सला सुमारे 100 दशलक्ष डॉलर्सच्या देणगीदारांची पुष्टी मिळाली आहे. हा पैसा ‘ट्रस्ट फॉर द नॅशनल मॉल’ नावाच्या संस्थेद्वारे घेतला जात आहे.
देणगीदारांची नावे उघड करणे आवश्यक नाही
याव्यतिरिक्त, अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांसाठी स्थापन झालेल्या ‘अमेरिका250’ या संस्थेसाठी, व्हाईट हाऊस हिस्टोरिकल असोसिएशनसाठी आणि ‘सिक्युरिंग अमेरिकन ग्रेटनेस’ या राजकीय गटासाठीही निधी गोळा करण्यात आला.
यापैकी अनेक ठिकाणी देणगीदारांची नावे सार्वजनिक करणे आवश्यक नाही, त्यामुळे संपूर्ण प्रणाली बऱ्याच अंशी गोपनीय राहिली आहे.
अहवालानुसार, ट्रम्प स्वतः कोण किती पैसे देत आहे यावर लक्ष ठेवतात. त्यांच्या निधी संकलन प्रमुख मेरिडिथ ओ’रूर्क त्यांना नियमित माहिती देतात. अनेक लॉबिस्ट त्यांच्या क्लायंट्सना सल्ला देतात की, जर ट्रम्पचे लक्ष आणि पोहोच हवी असेल, तर या संघटनांना देणगी देणे फायदेशीर ठरू शकते.
देणगीच्या बदल्यात कोणी राजदूत बनले, तर कोणाला करार मिळाले
अहवालात म्हटले आहे की, एका महिलेने MAGA Inc. ला 25 लाख डॉलर दिले आणि काही महिन्यांनंतर तिच्या वडिलांना न्याय विभागाकडून लाचखोरीच्या प्रकरणात खूप कमी शिक्षा झाली.
त्याचप्रमाणे, पार्सन्स या अभियांत्रिकी कंपनीने बॉलरूम प्रकल्पासाठी 25 लाख डॉलर दिले आणि ती ट्रम्पच्या गोल्डन डोम मिसाईल डिफेन्स सिस्टिमसारख्या अब्जावधी डॉलरच्या सरकारी कंत्राटांच्या शर्यतीत आहे.
व्हिडिओ गेम कंपनी रोब्लॉक्सच्या सीईओनेही मोठी देणगी दिली आणि ट्रम्पच्या एआय (AI) संबंधित धोरणांचे कौतुक केले. एका दांपत्याने शपथविधी समारंभ आणि MAGA Inc. ला मिळून सुमारे 15 लाख डॉलरपेक्षा जास्त दिले आणि नंतर त्यांच्या मुलाला फिनलंडमध्ये अमेरिकेचा राजदूत बनवण्यात आले.
टेक कंपनी पॅलेंटिरने बॉलरूमसाठी 1 कोटी डॉलर आणि ‘अमेरिका250’ ला 50 लाख डॉलर दिले. यानंतर, तिला ट्रम्प सरकारकडून शेकडो दशलक्ष डॉलरचे सरकारी कंत्राट मिळाले, ज्यात इमिग्रेशन विभागासाठी सॉफ्टवेअर बनवणे देखील समाविष्ट होते. मात्र, कंपनीचे म्हणणे आहे की हे सर्व देणगीमुळे झाले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App