उत्तर प्रदेशच्या नागरिकांना योगींचा अनोखा दिलासा : थेट दारात पोहोचविणार जीवनावश्यक वस्तू


योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना थेट तुमच्या दारापर्यंतच दूध, भाजीपाला, फळे, औषधे पोहोचविण्याचे सांगुन नागरिकांना आश्वस्त केले. त्यामुळे उत्तर प्रदेशातील २३ कोटी जनतेने सुटकेचे निश्वास सोडला आहे.


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : कोरोना व्हायरसविरुध्दच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना अनोखा दिलासा दिला आहे. लॉक डाऊनच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थेट त्यांच्या दारापर्यंत करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांनी मंगळवारी लॉक डाऊनची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली. किराणा, दूध, बेकरीसमोर रांगा लागल्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच राहणार असल्याचे सांगितले. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना थेट तुमच्या दारापर्यंतच दूध, भाजीपाला, फळे, औषधे पोहोचविण्याचे सांगुन नागरिकांना आश्वस्त केले. त्यामुळे उत्तर प्रदेशातील २३ कोटी जनतेने सुटकेचे निश्वास सोडला आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले, राज्यात दूध, भाजीपाला, औषधांचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी अजिबात काळजी करू नये. सामाजिक अंतर कायम राखून आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. आपली काळजी सरकार घेणार आहे.

बुधवारपासून भाजीपाला, दूध, फळे, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू थेट आपल्या दारापर्यंत पोहोचविण्यात येतील. यासाठी १० हजार सरकारी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही खरेदीसाठी बाहेर जाण्याची गरज नाही.

करोनाचा वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. २१ दिवस घरात राहणे हे मोठे कष्टाचे काम असले तरी त्याशिवाय कोणताही पर्याय आपल्याकडे नाही. गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये जमावबंदी आणि त्यानंतर सक्तीची बंदी लागू करण्यात आली. राज्य सरकारांनी केलेल्या या प्रयत्नांना गांभीयार्ने घ्या. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि करोनाग्रस्त देशांच्या अनुभवातून आपल्याला शिकले पाहिजे. म्हणूनच प्रत्येक राज्य, जिल्हा, गाव, गल्लीमध्ये स्थानिक प्रशासनाच्या आदेशाचे पालन करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते.

अनेक राज्यांत त्यानंतर एकदम धास्तीचे वातावरण तयार झाले होते. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती तातडीने जनतेला दिल्यामुळे तेथे गोंधळ झाला नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण