योगी खरेच बॉलिवूड पळवायला मुंबईत आलेत काय?; त्यांनी बॉलिवूडच्या कलावंतांशी चर्चा करण्यात गैर काय़? त्यांनी उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारली तर बॉलिवूडचे महत्त्व कमी होण्याचे कारणच काय? बॉलिवूडमध्ये आणि महाराष्ट्राच्या दोन सत्ताधारी प्रादेशिक पक्षांमध्ये बॉलिवूडचे महत्त्व टिकवून ठेवण्याचे कर्तृत्व आहे काय?… २५ लवासा सिटी उभारायच्या वल्गना करणाऱ्यांना एक लवासा सिटी झेपली नाही. तिची दिवाळखोरी जाहीर करावी लागली… हा इतिहास वर्तमानात घडतोय!! yogi – supriya sule b news
विनायक ढेरे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन बॉलिवूडच्या कलावंत, दिग्दर्शकांशी चर्चा करत आहेत. त्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कांगावा सुरू केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी योगींचे मुंबईत स्वागत आहे, पण कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड तिकडे म्हणजे उत्तर प्रदेशात साकारणे शक्य नाही, असे म्हटले आहे. शिवेसेनेच्या नेत्यांनी देखील मुंबईतून पळवून नेणे शक्य नाही, असे म्हटले आहे. योगी मुंबईत येणार म्हटल्यावरच या दोन्ही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया एवढ्या तीव्र आल्या आहेत, यातच खरी राजकीय मेख दडली आहे. yogi – supriya sule b news
पण या निमित्ताने काही गंभीर आणि बोचणारे प्रश्नही पुढे आले आहेत. या प्रश्नांची खरी उत्तरे या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी देणे गरजेचे आहे. मूळात योगींना उत्तर प्रदेशात बॉलिवूड साकारायचेय, हा या पक्षांच्या नेत्यांचा स्वतःच्या सोयीचा कांगावा आहे. त्यानिमित्ताने ते केंद्रातील मोदी सरकारवर दुगाण्या झोडून घेताहेत. योगी तेथे फिल्मसिटी उभारत आहेत. तिचे नावही अद्याप निश्चित झालेले नाही. तिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते बॉलिवूड पळवून लावण्याची हकाटी पिटत आहेत.
त्यातही पुढचा प्रश्न मूळात बॉलिवूड हे काय पेटंट असलेले नाव आहे काय?, की दुसऱ्या कोणी ते नाव आपल्या फिल्मसिटीला ठेवूच नये? भारतातील अन्य चित्रपटसृष्ट्यांना टॉलिवूड, मॉलिवूड अशी नावे आहेत. ती देखील काही पेटंट असलेली नावे नाहीत. अशा स्थितीत बॉलिवूडच्या पेटंट नसलेल्या नावावर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी डिंग्या मारण्यात काय मतलब आहे? असलाच तर तो पोकळ अस्मितेशिवाय दुसरा कोणताही नाही.
कारण ज्या बॉलिवूडच्या नावाने योगी आल्यानंतर या दोन्ही पक्षांचे नेते “चांगभलं” करत आहेत, त्या बॉलिवूडसाठी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे योगदान काय? त्यांनी बॉलिवूडसाठी नेमकेपणाने काय केले आहे? … त्यातही ठाकरे फॅमिलीचे काही योगदान असल्याचे मानताही येईल. ठाकरे फॅमिली ही मूळात कलावंतांची फॅमिली आहे. प्रबोधनकार, बाळासाहेबांपासून तेजसपर्यंत प्रत्येकाच्या अंगी विशिष्ट दर्जाची कलाकारी आहे. स्मिता ठाकरे तर चित्रपट निर्मात्या आहेत. पण राष्ट्रवादीतील फॅमिलीचे काय? राजकारण सोडून कोणती कलाकारी राष्ट्रवादीच्या फॅमिलीने अथवा फॅमिल्यांनी दाखविली आहे? की आज ते बॉलिवूडच्या नावावरून गळा काढत आहेत?
बॉलिवूड मुंबईत आहे. ते उत्तर भारतीय कलावंतांनी आणि पंजाबी त्यातही फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात येऊन वसलेल्या कलावंतांनी विकसित केले आहे. बॉलिवूडमधील जुन्या स्टुडिओंची नावे पाहा. त्यात मोठी अनेक पंजाबी नावे आढळतील. त्यात व्ही. शांतारामांसारख्या राजकमलसारखे मराठी नावही खूप मोठे आहेच. पण त्यावर राष्ट्रवादीच्या फॅमिलीपेक्षा सावरकर आणि ठाकरे यांचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे योगींच्या मुंबईत येण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीची फॅमिली बॉलिवूडमध्ये घुसखोरी करून घेत असल्याचे स्पष्ट आहे.
त्यातही राष्ट्रवादीच्या फॅमिलीची वरकडी अशी, की योगींच्या मुंबई भेटीतून मुंबईचे आणि बॉलिवूडचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करते आहे, असा आरोप ती फॅमिली करते आहे. या आरोपाचा येथे संबंधच काय?, योगींना आपल्या राज्यात फिल्मसिटी उभारण्याचा अधिकार नाही काय?, आत्तापर्यंत मुंबईतल्या बॉलिवूडचा डॉमिनन्स होता हे खरेच आहे. पण म्हणून तोच कायम राहील असे गृहीत का धरायचे? बॉलिवूडची रेषा मोठी आहे. पण त्याहीपेक्षा कोणी मोठी रेषा काढत असेल, तर त्याला कोणी, कसे आणि का रोखायचे?
योगी आपल्या फिल्मसिटीची रेषा मोठी काढत असतील तर बॉलिवूडची रेषा आणखी मोठी काढायला कोणी रोखले आहे का?… पण अंगात तेवढे मोठे कर्तृत्त्व आहे का? कारण टीका करायला आणि दुगाण्या झोडायला कर्तृत्व लागत नाही. पण मोठे काम करायला मोठे कर्तृत्व लागते. ते राष्ट्रवादीच्या फॅमिलीकडे आहे का?
२५ लवासा सिटी उभारायला निघालेल्यांना एक लवासा सिटी झेपली नाही. तिच्यातून राष्ट्रवादीच्या फॅमिलीला शेअर काढून घ्यावे लागलेत. एका लवासाची दिवाळखोरी जाहीर करावी. लागली. ६००० कोटींची कर्जफेड करता येत नाही. आणि योगींच्या फिल्मसिटीवर बोलले जातेय. त्यांच्यावर दुगाण्या झोडल्या जाताहेत. यात पोकळ अस्मितेच्या गमजा नाहीत, तर दुसरे काय आहे?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App