हातातले कसे गमवावे, हे राहुल – प्रियांका गांधींकडून शिकावे…!!, हाच धडा उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभांच्या निवडणुकांनी घालून दिला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वयाच्या पन्नाशीत आहेत. काँग्रेस सारख्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षाची धुरा या दोन्ही बहीण भावंडांकडे आहे. त्यांच्या कष्टामध्ये कमी नाही. दौऱ्यांमध्ये कमी नाही. काँग्रेस कडे पैशाला कमी नाही… पण तरी देखील यशाला मात्र कमतरता आहे. किंबहुना त्यांचे यश वाळवीने संपूर्ण खाल्ल्याचे असे दिसत आहे. ही वाळवी या दोन्ही बहीण – भावंडांचा राजकीय कर्तृत्वाचा लागलेली दिसते आहे. U. P. Punjab Elections: How to lose your hand, learn from Rahul-Priyanka Gandhi … !!
2014 पासून 2022 पर्यंतच्या एकाही निवडणुकीत राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला कुठेही जनमताचा कौल प्राप्त करण्यात यश आलेले नाही. याचा अर्थ काँग्रेसला जनमताचा कौल प्राप्त करण्यात अपयश आले असा नाही, तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या पुढाकाराचे हे अपयश आहेत हे ठळकपणे दिसून येते. पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची पूर्ण बहुमतानिशी सत्ता होती. ही सत्ता साडेचार वर्षे चालविण्यात आली पण काँग्रेस पक्षांतर्गत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाविरुद्धच्यातक्रारी थांबत नव्हत्या. काँग्रेसने ऐन मजधारेत पंजाब मध्ये बोटीचा कॅप्टन बदलला आणि बोट रसातळाला गेली. हा निर्णय सर्वस्वी राहुल गांधी यांचा होता. यात कॅप्टनचे वैयक्तिक नुकसान फार झाले नाही. पण पक्षाचे मात्र कायमचे नुकसान होऊन बसले. ज्या व्यक्तीच्या नादी लागून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पंजाब मध्ये नेतृत्व बदल केला ते नवज्योत सिंग सिद्धू देखील पराभूत होऊन आता पंजाब मधल्या राजकारणाच्या बाहेर फेकले गेले आहेत. हातात जे होते ते असे राजकीय कर्तृत्वाने गमावले…!! याचे हे उत्तम उदाहरण आहे.
“जिथे राहुल गेले तिथे अपयश आले”, असे सूत्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मांडले गेले होते. तेच आता प्रियांका गांधी यांच्या बाबतीत उत्तर प्रदेशात लागू झाले आहे. प्रियंका गांधी यांनी उत्तम राजकीय टायमिंग साधत हाथरस कांडाचा मुद्दा उचलून धरला होता. लखीमपूर शेतकरी हिंसाचाराचा मुद्दाही उचलला होता. त्यानंतर त्यांनी लडकी हूँ लढ सकती हूँ ही मोहीम ही जोरदार चालवली होती. उत्तर प्रदेश खरंच यांनी गेल्या चार महिन्यांपासून ढवळून काढला होता पण हाती काय आलंय तर अपयशाचा कटोरा…!! वयाच्या पन्नाशीत या दोन्ही बहीण – भावंडांना राजकीय यश हाती लागत नाही ही काँग्रेससाठी मोठी राजकीय शोकांतिका आहे. “कितीही घासा कितीही घुसा… जिंकणार भाजपच…!!” असे राजकीय वातावरण देशात का तयार झाले…??, याचा विचार खऱ्या अर्थाने सोनिया गांधींनी करायची गरज आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला जुना आकडा देखील गाठणे शक्य नाही. अशी स्थिती का येऊन ठेपली?? रायबरेलीतून भाजप आणि समाजवादी पक्ष का जिंकत चाललेत?, याचा विचार सोनिया गांधी यांनी करायची वेळ आली आहे.
कालपर्यंत प्रियांका गांधींना राज्यसभेवर स्थान देण्याचे, त्यांच्याकडे मोठे नेतृत्व सोपवायचे घाटले जात होते. कदाचित त्या राज्यसभेवर जातील. काँग्रेससाठी त्या मोठ्या पदावर जातीलही… पण राजकीय यशाचे काय…?? ते कुठल्या बाजारातून विकत आणायचे…?? जनतेने तर त्यांचा निवडणुकीत कायमचा बाजार उठवण्याचे ठरवलेले दिसते…!! उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यांचा हा सांगावा आहे… पण सोनिया गांधी तो ऐकतील का?? हा खरा प्रश्न आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App