गुगल ॲनालिटिक्स माहिती नाही, असा माणूस डिजिटल विश्वात तरी सापडणे दुर्मिळच. जिथे जिथे वेबसाईट तिथे तिथे गुगल ॲनालिटिक्स हे ओघाने येतेच. सध्यातरी जगातील ७० टक्के वेबसाईट्सनी गुगल ॲनालिटिक्सचा कोड त्यांच्या वेबसाईटमध्ये वापरला आहे, असे आकडेवारीवरून दिसते. ॲनालिटिक्सच्या माध्यमातून वेबसाईट्स त्यांच्याकडे येणाऱ्या ट्रॅफिकचे विश्लेषण करीत असतात. सध्या तरी कोणत्याही वेबसाईटसाठी हे सेवा फ्री आहे. अर्थात हे फ्री सरळसाधे नक्कीच नाही. Story of birth of Google analytics
त्याबदल्यात गुगल तुमच्या साईटवर येणाऱ्या ट्रॅफिकची माहिती जमवत असते. या माध्यमातून जगातील ७० टक्के वेब ट्रॅफिकची माहिती गुगलकडे अगदी सहजपणे जमा होते. त्यातूनच मग लोक नक्की कोणत्या साईटवर कशासाठी जाताहेत वगैरे गोष्टी गुगलला समजू शकतात.
मूळ मुद्दा हा आहे की हे ॲनालिटिक्स काही गुगल कंपनीची स्वतःची निर्मिती नाही. मग हे आले कुठून? तर ही कथा खूपच इंट्रेस्टिंग आहे. स्कॉट क्रॉस्बी आणि त्याचे सहकारी या कथेचा नायक. या स्कॉटची आणि त्याच्या काही सहकाऱ्यांची १९९५ च्या सुमारास क्वांटिफाईड सिस्टिम्स नावाची अमेरिकी कंपनी होती. दक्षिण कॅलिफोर्नियातील काही ग्राहकांना वेबसाईट तयार करून देणे आणि आपल्या कंपनीच्या सर्व्हरवर या वेबसाईट होस्ट करण्याचे काम या कंपनीकडून केले जायचे. त्यावेळी बँडविड्थ हा खूपच खर्चिक मामला होता. त्यामुळे वेबसाईट तयार करण्याबरोबरच ती होस्ट करण्यासाठी हजारो डॉलर्स मोजायला लागायचे.
ग्राहकांकडून हे पैसे आकारतोय म्हटल्यावर त्यांना वेबसाईटच्या ट्रॅफिकबद्दल माहिती दिली पाहिजे. त्यातून त्यांचा आपल्या कंपनीवरचा विश्वास आणखी वाढेल. या हेतून स्कॉट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ते होस्ट करीत असलेल्या वेबसाईटवर ट्रॅफिक कसे आणि किती येते, याची माहिती देण्यासाठी एक रचना तयार केली. या माध्यमातून ते आपल्या ग्राहकांना त्यांच्या वेबसाईटवर येणाऱ्या ट्रॅफिकची सगळी माहिती देत होते.
वेबसाईट तयार करणाऱ्या ग्राहकांसाठी अशी माहिती मिळणे हे दुधात केशरासारखेच होते. त्यामुळे त्यांनी या प्रकारच्या माहितीला उचलून धरले. वेबसाईट ट्रॅफिकची आपण जी माहिती देतो आहोत, ती आपल्या ग्राहकांना उपयोगी पडते आहे, हे लक्षात आल्यावर क्वांटिफाईड सिस्टिम्समधील सर्व सहकाऱ्यांनी वेबसाईट निर्मिती आणि होस्टिंगपेक्षा याकडेच जास्त लक्ष देण्याचा निर्धार केला.
याच निर्धारातून त्यांनी अर्चिन सॉफ्टवेअर कॉर्पोरेशन ही नवी कंपनीही सुरू केली. ही कंपनी वेबसाईट ट्रॅफिकची सर्व माहिती ग्राहकांना देत होती. काही दिवसांतच या कंपनीची चर्चा अमेरिकेत सुरू झाली आणि पुढे ओघाने जे व्हायचे तेच झाले. गुगलने ही कंपनी विकत घेतली. त्यानंतर तिचे गुगल ॲनालिटिक्स असे नामकरण करण्यात आले. आज आपण सगळे जे गुगल ॲनालिटिक्स वापरतो, ते तयार करण्यात स्कॉट क्रॉस्बी आणि त्याच्या सहकाऱ्यांचा अनमोल आणि लाख मोलाचा वाटा आहे. तो कधीच विसरता कामा नये…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App