देशभरात मी अनेक श्रीराम मंदिरे आणि तिथल्या श्रीरामाच्या मूर्ती पाहिल्या आहेत. सहसा श्रीरामांची मूर्ती सीतामाई आणि लक्ष्मण यांच्यासमवेतच असते. पायाशी भक्त हनुमान बसलेला असतो. कधी कधी गर्भगृहात राम पंचायतन असतं तर कधी संपूर्ण श्री राम दरबार असतो. श्रीरामाच्या मूर्ती बनवताना धनुष्य श्रीरामांच्या हातात तरी असतं नाहीतर शेजारी ठेवलेलं तरी असतं. हे सर्वमान्य संकेत आहेत. shriram temple in nendungunam tamilnadu
पण ह्या संकेतांचे पालन न करणाऱ्या दोन मूर्ती दोन वेगवेगळ्या श्रीराम मंदिरांमध्ये आहेत. पहिली मूर्ती आहे ती तामिळनाडू मधल्या नेदुंगुणंम ह्या गावातल्या श्रीयोगरामार मंदिरातली ध्यानमग्न योगमूर्ती. ह्या मंदिराच्या गर्भगृहातली श्रीरामांची मूर्ती ही पद्मासनात बसलेली दाखवली आहे.
मूळ पल्लव काळात बांधलेले हे मंदिर १३०० वर्षे जुने आहे. सध्या अस्तित्वात आहे ते मंदिर विजयनगरच्या सम्राटांनी जीर्णोद्धार केल्यानंतरचे आहे. इथल्या गर्भगृहात श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई ह्यांच्या मूर्ती आहेत. पायाशी हनुमान आहेत. लक्ष्मण धनुर्धारी आहेत पण श्रीराम निःशस्त्र आणि योगमग्न आहेत. त्यांचा एक हात हृदयावर आहे, डोळे मिटलेले आणि नजर आत वळविलेली आहे, चेहेऱ्यावर कमालीचे शांत भाव आहेत. पायाशी बसलेले हनुमान पोथीतून वेदपठण करीत आहेत आणि श्रीराम ते ऐकत ध्यान करत आहेत असे अनोखे दृश्य ह्या मंदिराच्या गर्भगृहात पाहायला मिळते.
ह्यामागची कथा अशी आहे की रावणाचा वध करून अयोध्येला परतताना श्रीराम या ठिकाणी आले. इथे शुकब्रह्मर्षींचा आश्रम होता. त्यांनी श्रीरामांना ह्याठिकाणी ध्यान करून हातून घडलेल्या हिंसेचे परिमार्जन करायचा उपदेश केला व हनुमानाला उपनिषदांचे ज्ञान दिले. योगमग्न अवस्थेत असल्यामुळे श्रीरामांजवळ धनुष्य-बाण दाखवलेला नाही. लक्ष्मण मात्र सदैव श्रीराम आणि सीतामाईच्या सुरक्षेला तत्पर असल्यामुळे त्यांच्या हातात धनुष्य बाण आहे. सीतामाईच्या हातात कमळाचे फूल आज जे आत्मज्ञानाचे प्रतीक आहे. अत्यंत देखण्या अश्या ह्या मूर्ती दर्शन घ्यायला आलेल्या भाविकांना एका वेगळ्याच प्रगाढ शांतीची अनुभूती देतात.
दुसरी श्रीरामांची एक अनोखी मूर्ती आहे ती नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात असलेल्या कोदंडधारी श्रीरामाच्या मंदिरात आहे. एकतर गर्भगृहात फक्त श्रीराम आहेत, तेही एकदम कोवळ्या वयातले, विद्यार्थी दशेतले. विश्वामित्रांबरोबर विद्याभ्यासासाठी आणि यज्ञ रक्षणासाठी निघालेले तरुण विद्यार्थी श्रीराम आहेत हे. भोसला मिलिटरी स्कुलच्या तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून मुद्दाम ही मूर्ती अशी घडवलेली आहे. ह्या मूर्तीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भोसला मिलिटरी स्कुलमध्ये प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी उडविलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या काडतूसाच्या पितळी केसिंगच्या धातूपासून ही मूर्ती घडवलेली आहे.
ह्या मूर्तीमधुन षोडशवर्षीय श्रीरामांचे कोवळे पण कणखर व्यक्तिमत्व साकारण्यात शिल्पकार सदाशिव साठे कमालीचे यशस्वी झाले आहेत. श्रीरामांच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजव्या हातात बाण आहे. पाठीवर भरलेला भाता आहे. धनुष्याची प्रत्यंचा सरळ रेषेत ताण दिल्यासारखी वाटते. श्रीराम राजकुळातले असल्यामुळे त्यांच्या मस्तकावर मुकुट आहे. पिळदार शरीर, मोजके अलंकार आणि मूर्तीच्या देहबोलीतुन जाणवणारा आत्मविश्वास दर्शन घेणाऱ्या भाविकाला जाणवल्याशिवाय राहवत नाही.
वेळ आली तेव्हा युद्धाला तयार असलेले श्रीराम आणि युद्धात यशस्वी झाल्यावर युद्धविराम घेऊन ध्यानमग्न झालेले श्रीराम ही दोन्ही रूपे बघण्यासाठी ह्या मंदिरांना जरूर भेट द्या.
शेफाली वैद्य
(सौजन्य: फेसबुक)
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App