मग प्रश्न पडतो… एवढी सगळी चर्चा मराठी चॅनेलवर झाली. बातम्या झळकल्या… चर्चा झडल्या… पण हिंदी आणि इंग्रजी चॅनेलला या विषयाची दखलही नव्हती… देशात मोठा राजकीय भूकंप घडू पाहात होता… त्या विषयी हिंदी आणि इंग्रजी चॅनेलला रिपोर्टिंग करावेसे वाटू नये… कसे व्हायचे त्यांचे?? पण… तरीही प्रश्न उरतोच… मराठी चर्चा घडवून पंतप्रधान होता येते…?? प्रयोग करायला काय हरकत आहे…?? sharad pawar UPA chairman
विनायक ढेरे
मराठी चॅनेलवर बातम्या चालवून, चर्चेच्या वावड्या उडवून आणि मराठी पेपरात बातम्या छापून आणून पंतप्रधान होता येईल काय?, हा कळीचा मुद्दा चर्चेत येण्याचे कारण आज दिवसभर मराठी माध्यमांमध्ये घडलेली किंवा घडविलेली चर्चा. शरद पवारांना संयुक्त पुरोगामी आघाडीचे अर्थात यूपीएचे चेअरमन करणार. ते सोनिया गांधींची जागा घेणार. आणि मग ओघानेच आले यूपीएचे चेअरमन म्हणून ते पंतप्रधानपदावर स्वार होणार. sharad pawar UPA chairman
आज दुपारपासून मराठी चॅनेलनी या विषयावर बातम्या, प्रतिक्रिया आणि चर्चांचा रतीब घातला. सायंकाळी काँग्रेसच्या तारिक अन्वरांनी पुढे येऊन त्या चर्चेचा फुगा फोडून टाकला. मराठी माध्यमांचा कामाचा दिवस भरला गेला. sharad pawar UPA chairman
पण या सगळ्यात कळीचा मुद्दा उरलाच, तो म्हणजे मराठी माध्यमांतून चर्चेच्या वावड्या उडवून, बातम्या छापून आणून पंतप्रधान होता येईल का?, १९९१ चा अनुभव त्यासाठी पुरेसा नाही का?, त्यावेळी तर फारसे चॅनेल नव्हतेच. बातम्यांची भिस्त फक्त प्रिंट मीडियावर होती. त्यावेळी देखील अशाच मराठी पेपरांमध्ये बातम्या छापल्या गेल्या पंतप्रधानपदाच्या. त्यातही वैशिष्ट्य म्हणजे पुण्या – मुंबईच्या पेपरांमध्ये बातम्या छापून आल्याने चर्चेला महाराष्ट्रात हवा देता आली.
दिल्लीत महाराष्ट्राने “फार म्हणजे फार मोठे आव्हान” निर्माण केल्याचे वातावरण महाराष्ट्रात त्यातही पुण्या – मुंबईत करण्यात यश आले. त्यातून महाराष्ट्रातून एकदम राष्ट्रीय नेतृत्वपदाला अर्थात पंतप्रधानपदाला गवसणी घालण्याच्या बाता मारण्यात आल्या. पण नंबरगेमची वेळ आली तेव्हा पाठिशी उभे राहिले महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेले ६…!!
पण त्या बातम्या “डाऊन प्ले” करून त्यावेळी छापण्यात आल्या. म्हणजे दिल्लीला दिलेल्या आव्हानापेक्षा कमी महत्त्वाच्या करून नेतृत्व स्पर्धेतील पराभवाच्या बातम्या मराठी पेपरात छापण्यात आल्या. सगळी मशक्कत त्यावेळी वाया गेली.
आजही बहुतेक अशीच पंतप्रधानपदाची उबळ आली असावी. बातम्यांची सुरवातच मूळात “विदाऊट सोर्स” होती. यूपीए चेअरमन करणार अशा बातम्या मराठी चॅनेलने दिल्या. पण या नियुक्तीची माहिती नेमकी कोणत्या नेत्याने सांगितली? याची नेमकी माहिती कोणत्याही चॅनेलच्या बातमीत नव्हती. मग शंका येते बातमी कोणी पेरली असेल??
नंतर बातमी फुलविण्यासाठी निवडक प्रतिक्रिया घेण्यात आल्या. त्या अर्थातच पुण्याच्या पेपरांच्या भाषेत “सकारात्मक” वगैरे होत्या. वय, अनुभव, महाराष्ट्रातला अभिनव प्रयोग, सर्वांशी उत्तम संबंध वगैरे गुणांची तुफान भलामण होती. पण या सगळ्यात नंबरगेम विषयी फारसे कोणी बोलले नाही.
७४ वर्षांचे नेतृत्व रिटायर होऊन ८० वर्षांच्या नेत्याकडे ते ८४ वर्षांचे झाल्यानंतरच्या निवडणुकीचे नेतृत्व देणार आहेत, या वास्तवाकडे देखील कोणाला फारसे लक्ष द्यावेसे वाटले नाही. त्यातही दोन्ही नेत्यांच्या पक्षांच्या नंबरगेमकडे दुर्लक्ष करण्यात आले.
मग प्रश्न पडतो… एवढी सगळी चर्चा मराठी चॅनेलवर झाली. बातम्या झळकल्या… चर्चा झडल्या… पण हिंदी आणि इंग्रजी चॅनेलला या विषयाची दखलही नव्हती… देशात मोठा राजकीय भूकंप घडू पाहात होता… त्या विषयी हिंदी आणि इंग्रजी चॅनेलला रिपोर्टिंग करावेसे वाटू नये… कसे व्हायचे त्यांचे?? पण… तरीही प्रश्न उरतोच… मराठी चर्चा घडवून पंतप्रधान होता येते…?? प्रयोग करायला काय हरकत आहे…??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App