नाशिक : पवारांना दिसले राहुल मध्ये “मोरारजी”; काँग्रेसमध्ये सोडली राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची भाकीतरुपी पुडी!! शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीचा हा निष्कर्ष आहे. Sharad pawar claims that rahul Gandhi’s acceptability in the opposition is more than morarji desai
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला सविस्तर मुलाखत दिली. त्यामुळे भारताच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर भाष्य केले. हे भाष्य करताना शरद पवारांनी राहुल गांधींची स्वीकारार्हता मोरारजी देसाईंपेक्षा जास्त आहे, असा दावा केला. त्याच वेळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय राजकारणात खूप मोठे बदल होऊन प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील किंवा ते काँग्रेसमध्ये विलीन, असेही भाकीत वर्तविले आहे. त्यामुळेच वर उल्लेख केलेला पवारांना राहुल मध्ये दिसले “मोरारजी” आणि त्यांनी काँग्रेसमध्ये सोडली राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची पुडी!!, असे निरीक्षण नोंदविले आहे!!
आपल्या वक्तव्याचा अधिक खुलासा करताना शरद पवार म्हणाले, देशात मोदीविरोधी वातावरण आहे. कोट्यवधी लोकांना मोदी आवडत नाहीत. मोदीविरोधी असणाऱ्या राजकीय शक्ती आता एकत्र येऊ लागल्या आहेत. त्यामुळे 1977 मध्ये जयप्रकाश नारायण आणि आचार्य कृपालानी यांच्या प्रेरणेतून जसा जनता पक्ष तयार झाला होता, तसेच विरोधी पक्षांचे एकत्रीकरण 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. 1977 मध्ये सुरुवातीला जनता पक्षाला स्वतःचा नेता नव्हता. परंतु जयप्रकाश नारायण आणि सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांशी चर्चा करून मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड केली होती. 2024 मध्ये त्यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नाही. परंतु यावर्षी राहुल गांधींची स्वीकारार्हता ही मोरारजी देसाई यांच्यापेक्षा जास्त आहे, असा दावा शरद पवार यांनी केला. यातून पवारांनी राहुल गांधींना विरोधी पक्षांच्या (न येणाऱ्या) सरकारच्या नेतृत्वाच्या मधाचे बोट चाटवले आणि त्याचवेळी पवारांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने भारताच्या “भविष्यवेधी” राजकारणाची सूत्रे उलगडून दाखवली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरेचसे प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील आणि काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे पवारांनी सांगितले आहे. याचा अर्थ पवारांची उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा निष्कर्ष काही राजकीय भविष्यवेत्यांनी काढला आहे, पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आत्तापर्यंत पवारांनी अनेकदा नकारात्मक उत्तर दिले आहे. किंबहुना त्यांनी तसे पाऊल गेल्या 25 वर्षांमध्ये उचललेले नाही.
काँग्रेस बरोबर सत्तेसाठी आघाडी करायची. आपल्या अटी शर्तींवर काँग्रेस बरोबर सत्तेचे “डील” करायचे, पण त्यापलीकडे काँग्रेसचे कुठले वर्चस्व मान्य करायचे नाही, हे आत्तापर्यंत पवारांचे धोरण राहिले होते, पण आता परिस्थिती इतकी पालटली आहे की पवारांकडे ना स्वबळावर आपली उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस चालवण्याची शक्ती उरली आहे, ना त्या राष्ट्रवादी काँग्रेसची तेवढी संघटना उरली आहे. त्याही पलीकडे जाऊन त्या उरल्या सुरल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनात्मक पातळीवरचे बळकट नेतृत्व म्हणून ते सुप्रिया सुळे यांच्याकडे पाहू शकत नाहीत, ही खरी पवारांच्या वक्तव्यातली “राजकीय मेख” आहे. कारण बारामतीची लोकसभा निवडणूक मैदानात उतरून लढविणे निराळे आणि प्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षाची संपूर्ण संघटना ताब्यात घेऊन तो पक्ष स्वबळावर चालविणे निराळे!! लोकसभा निवडणूक निवडणूक लढविणे आणि पक्ष चालवणे हे दोन स्वतंत्र क्षमतांचे विषय आहेत आणि इथेच सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेबद्दल खुद्द पवारांच्या मनात दाट शंका आहे!!
पण असे असले तरी पवारांचे राजकीय वक्तव्य इतके सरळ आणि सहज घेता येत नाही. किंबहुना ते जे बोलतात किंवा सूचित करतात, त्याच्याबरोबर उलटा अर्थ काढायचा असतो, असा अनुभवसिद्ध सिद्धांत अनेकांनी मांडला आहे. त्यामुळे पवारांनी जरी राहुल गांधींना भविष्यात न येणाऱ्या सरकारच्या नेतृत्वाचे मधाचे बोट चाटवले असले, तरी राष्ट्रवादीच्या काँग्रेस मधल्या विलीनीकरणाची भाकीतरुपी पुडीच सोडून काँग्रेसमध्येच विविध शंका – कुशंकांच्या सापसुरळ्या सोडल्या आहेत, हे स्पष्ट दिसत आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App