नाशिक : काँग्रेसने मोदी + शाह यांच्या राज्यात अहमदाबाद मध्ये जाऊन अधिवेशन घेतले आणि मोदी राजवटीला आव्हान दिले. त्या अधिवेशनातून जे काही भले बुरे बाहेर आले, ते काँग्रेसचे काँग्रेसलाच लखलाभ झाले, पण त्या अधिवेशनाच्या निमित्ताने उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी एका लेखाद्वारे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला उपदेशाचे डोस पाजले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला ठोकून काढले.
काँग्रेसने आपल्या जुन्या वाड्याचे नेपथ्य लावून नेत्यांची भाषणे केली. वाडा लयास गेला आहे. तो उभारण्याची ताकद निर्माण करावी लागेल. जुन्या काळातून बाहेर पडून नवा विचार घ्यावा लागेल. काँग्रेसने गुजरातच्या भूमीवरून रणशिंग फुंकले पण पुढे काय?? INDI आघाडीचे भवितव्य काय??, याचा विचार करून काँग्रेस अध्यक्षांना उत्तर द्यावे लागेल, अशीच टोचणी संजय राऊत यांनी त्या लेखातून काँग्रेसला लावली. पण त्यापलीकडे जाऊन संजय राऊत यांनी त्या लेखात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची थोडीफार स्तुती केली, पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला झोडपले. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस ज्या पद्धतीने मित्र पक्षांशी वागली, तिचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसले, त्याचे खापर संजय राऊत यांनी काँग्रेसवर फोडले. ते खापर फोडतानाच संजय राऊत यांनी काँग्रेसला जुन्या वाड्याची उपमा दिली. अर्थात ही उपमा म्हणजे काही संजय राऊत यांची “ओरिजिनल आयडियेची कल्पना” नाही, ती “ओरिजिनल आयडियेची कल्पना” त्यांचे गुरु शरद पवारांची!!
शरद पवारांनीच काँग्रेसला जुनी हवेली – जुना वाडा असे म्हणून हिणवले होते. देशात एकेकाळी काँग्रेस सर्वत्र पसरली होती. त्यामुळे त्यांच्या नेत्यांना ते जुने वैभवाचे दिवस आठवतात. पण आता ते दिवस इतिहासजमा झालेत. एखाद्या वाड्याच्या मालकाला असे वाटत असते की हा वाडा आपला होता, त्या भोवतीचे शेत शिवार आपले होते, पण आता त्यातले काही उरले नाही, अशीच काँग्रेसची अवस्था झाल्याची टीका शरद पवारांनी केली होती.
– 10 जनपथचे उंबरे झिजवले
पण त्या वेळचे शरद पवार काय किंवा आजचे संजय राऊत काय, हे दोन्ही नेते त्याच काँग्रेसच्या वळचणीला जाऊन सत्तेची उब उपभोगत होते. पवार काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी फटकून वागत काँग्रेसी संस्कृतीचा उदो उदो करत होते. एखाद – दुसऱ्या केंद्रीय मंत्री पदासाठी आणि महाराष्ट्रातल्या सत्तेच्या तुकड्यासाठी त्याच काँग्रेस नेतृत्वाशी जुळवून घेत होते. संजय राऊत यांचे नेते उद्धव ठाकरे देखील 10 जनपथचे उंबरे झिजवत होते.
पण आज त्याच पवार शिष्य संजय राऊतांनी काँग्रेसवर लेखाद्वारे दुगाण्या झोडल्या. पण म्हणून काँग्रेस आणि अन्य प्रादेशिक पक्ष यांच्यातले राजकीय ताकदीचे मूलभूत अंतर लपून राहत नाही. अगदी संजय राऊत म्हणतात, त्याप्रमाणे अहमदाबादच्या अधिवेशनात काँग्रेसने जुन्या वाड्याचे नेपथ्य लावून भाषणे केलीही असतील, पण निदान त्या जुन्या वाड्याचे नेपथ्य लावण्यासाठी काँग्रेसकडे 99 खासदार तरी आहेत. त्या उलट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार संख्या डबल डिजिट आणि आमदार संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच उरली आहे. काँग्रेसकडे नेपथ्य लावण्याइतपत मोठा वाडा तरी होता, पण त्या उलट पवारांकडे आणि ठाकरेंकडे जुन्या ऐतिहासिक पात्रांना लावण्याचा मेकअप तरी उरलाय का??, हा खरा सवाल आहे आणि त्याचे उत्तर संजय राऊत आणि शरद पवार या दोघांनी काँग्रेसकडे बोट दाखवून हसण्यापूर्वी दिले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App