नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी पाजळली राजकीय विद्वत्ता; 41 आमदारांचा पक्ष 10 आमदारांच्या पक्षात विलीन करायची केली सूचना!!, असं खरंच घडलं. Rohit Pawar
एरवी रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य कसे चालवावे?, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अर्थ खाते कसे सांभाळाव, याच्या सूचना करतच असतात. पण त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या 10 आमदारांनी कसे वागावे?, याच्या मात्र सूचना करताना ते कधी दिसले नाहीत, पण इतरांना सूचना करण्यात ते कायमच आघाडीवर राहिले, पण आता ती आघाडी रोहित पवारांनी थेट आपले काका अजितदादांकडे वळविली असून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये “सशर्त” विलीन व्हावे, अशी सूचना केली.
अर्थातच त्यासाठी रोहित पवार यांनी त्यांच्याकडे खूप अधिकार आहेत, अशा “अधिकारवाणीने” अजितदादांवर अट आणि शर्तही लादली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हाव्यात, अशी आमची ही मनीषा आहे, पण जोपर्यंत अजितदादा भाजपला साथ देत आहेत, तोपर्यंत दोन राष्ट्रवादींचे ऐक्य शक्य नाही. कारण आम्ही भाजपला तात्विक दृष्ट्या विरोध करतो. अजितदादांनी भाजपच्या बरोबर जाणे आम्हाला मान्य नाही. त्यांनी भाजपची साथ सोडावी. शरद पवारांच्या पुरोगामी विचारांबरोबर पुन्हा यावे. त्यांनी भाजपची साथ सोडली, तर त्यांचा पक्ष मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करून घ्यायचा विचार करता येईल. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करता येईल, असे लांबलचक वक्तव्य रोहित पवारांनी केले.
त्यामुळे अजित पवारांच्या पक्षात “फारच मोठी खळबळ” उडाली. आपले पुतणे रोहित पवार यांच्या सूचनेवर हुकूम अजितदादा खरंच आपला 41 आमदारांचा पक्ष 10 आमदारांच्या पक्षात विलीन करतात की काय??, ते भाजपच्या सत्तेची वळचण सोडतात की काय??, याची “भीती” अजितदादांच्या आमदारांना वाटायला लागली. आता आपले राजकीय भवितव्य काय आणि कसे राहील??, या “चिंतेने” अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार “व्याकूळ” झाले.
परफॉर्मन्सची ऐशी तैशी
लोकसभा निवडणुकीत अजितदादांचा परफॉर्मन्स 5 उमेदवार, 4 पराभव आणि 1 विजय असा राहिला, पण विधानसभा निवडणुकीत भाजपची भक्कम साथ मिळाल्यानंतर त्यांना 41 आमदार निवडून आणता आले. त्या उलट शरद पवारांच्या पक्षाचे आठ खासदार निवडून आल्यानंतर देखील विधानसभा निवडणुकीत पवारांच्या पक्षाला आपटी खावी लागली. शरद पवारांच्या सारख्या मातब्बर नेत्याला फक्त 10 आमदार निवडून आणता आले. पण या सगळ्या राजकीय वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून रोहित पवारांनी शरद पवारांच्या पुरोगामी विचारांची मशाल पेटवली. आणि त्यांनी 41 आमदारांचा पक्ष 10 आमदारांच्या पक्षांमध्ये विलीन करायची सूचना आपल्या काकांना करून टाकली. त्यामुळे रोहित पवारांची “राजकीय विद्वत्ता” पुन्हा एकदा महाराष्ट्रभर जाहीर झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App