… 23 वर्षांच्या इतिहासात लोकसभेत सिंगल डिजीट आणि विधानसभेत फक्त डबल डिजीट जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय यशाचे नेमके प्रमाण तपासले, तर राजकीय वस्तूस्थिती लक्षात येते. आता याच वस्तुस्थितीला जर कोणाला, “राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने डोक्यावर घेतले”, असे म्हणायचे असेल तर त्याला “डोक्यावर पडलेले आर्ग्युमेंट” असे म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणायचे…!! NCP MLA Rohit Pawar argument over NCP popularity over exaggerated
विनायक ढेरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना दिलेले प्रत्युत्तर सध्या सोशल मीडियावर गाजते आहे. राज ठाकरे यांनी एकदा नव्हे, तर दोनदा राष्ट्रवादीवर जातिवाद वाढविल्याचा आरोप केला. सुरुवातीला एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर म्हणजे 1999 नंतर महाराष्ट्रात जातिवाद वाढला. तो आता शाळा – कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत येउन ठेपला आहे, असा आरोप केला. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या इतिहासाचे, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे आकलन कसे नाही, याचे सविस्तर वर्णन केले. त्याला राज ठाकरे यांनी कालच्या पुण्यातल्या पत्रकार परिषदेत उत्तरही दिले.
परंतु त्याच वेळी त्यांनी राष्ट्रवादी वरील आरोपाचा मात्र पुनरुच्चार केला. याच आरोपाला उत्तर देताना रोहित पवार यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. ही ट्विट सध्या सोशल मीडियावर गाजताहेत. या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले, की राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर लोकांनी त्या पक्षाला डोक्यावर घेतले आणि त्या पक्षाचा वाढता प्रभाव पाहिल्यानंतर त्यावेळच्या विरोधी पक्षांना महाराष्ट्रात जातीयवाद आणल्याशिवाय राष्ट्रवादीला खाली खेचता येणार नाही, असे वाटले म्हणून विरोधकांनी जातीयवाद आणला, असे त्यांनी सूचित केले. त्यांचा रोख अर्थातच शिवसेना-भाजप आणि खुद्द राज ठाकरे यांच्यावर होता. कारण त्यावेळी राज ठाकरे हे शिवसेनेत होते. मनसे तेव्हा अस्तित्वात नव्हती.
पण रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर लोकांनी त्या पक्षाला डोक्यावर घेतले होते, हे केलेले आर्ग्युमेंट मात्र नेमके “डोक्यावर पडल्यासारखे” वाटते. राष्ट्रवादीचा राजकीय इतिहास 23 वर्षांचा आहे. तो तपासला की हे नीट लक्षात येईल. गेल्या 23 वर्षांमध्ये राष्ट्रवादीचा निवडणूक परफॉर्मन्स पाहिला तर लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने कधीही सिंगल डिजिटचा आकडा ओलांडलेला नाही. विधानसभेच्या फक्त एका निवडणुकीत काँग्रेस पेक्षा ३ जागा अधिक मिळवून म्हणजे 72 जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या नंबरचा पक्ष बनली. त्यानंतर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची घसरण झाली आहे. म्हणजे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची राजकीय प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा मोठी राष्ट्रीय पातळीवरची आणि पक्ष म्हणून राष्ट्रवादी प्रादेशिक किंबहुना पश्चिम महाराष्ट्रापुरता उपप्रादेशिक तेवढाच मर्यादित राहिलेला दिसतो. आता या पक्षाला “लोकांनी डोक्यावर घेतले,” असे म्हणायचे असेल तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे…!!
…आणि लोकसभेत सिंगल डिजीट कधीही ओलांडू न शकलेल्या पक्षाला जर “लोकांनी डोक्यावर घेतलेला पक्ष” म्हणायचा असेल तर मग दोन खासदारांवरून 303 खासदारांपर्यंत पोहोचलेल्या भाजपला “लोकांनी कुठे घेतले?”, असे म्हणावे लागेल…?? जी गोष्ट भाजपची तीच अन्य प्रादेशिक पक्षांची आणि नेत्यांची. आंध्र, तेलंगण, तामिळनाडू, ओरिसा पश्चिम बंगाल, पंजाब इथल्या प्रादेशिक पक्षांची ताकद लक्षात घेतली तर त्या पक्षांनी नेत्यांनी, “आपल्या पक्षांना डोक्यावर घेतले”, असे म्हटले तर ते वस्तुस्थितीला सोडून होणार नाही. कारण या सर्व राज्यांमधल्या सध्याच्या सत्ताधारी पक्षांनी म्हणजे वायएसआर काँग्रेस, टीआरएस, डीएमके, बिजू जनता दल, तृणमूळ काँग्रेस आणि अकाली दल यांनी विधानसभेच्या निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे. ममता बॅनर्जी, नवीन पटनाईक, एम. के. स्टालिन, जगन मोहन रेड्डी, चंद्रशेखर राव, प्रकाशसिंग बादल हे आपापल्या पक्षांचे सर्वोच्च नेते आपल्या पक्षांना त्या त्या राज्यांमध्ये जनमताचा मोठा पाठिंबा मिळवून एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकून सत्तेवर आले आहेत.
सत्तेवरची त्यांची मांड जनमताच्या आधारे पक्की आहे. कोणत्याही “जुगाडू राजकारणातून” ते आपापल्या राज्यात सत्तेवर आलेले नाहीत. त्यामुळे या नेत्यांनी, “आपल्या पक्षाला जनतेने डोक्यावर घेतले,” असे म्हटले तर ते राजकीय दृष्ट्या योग्य ठरेल. परंतु, “राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातल्या जनतेने डोक्यावर घेतले” हे म्हणणे सत्याचा अपलाप तर आहेच, पण ती राजकीय वस्तुस्थिती देखील नाही. राष्ट्रवादी काँग्रेस जनमताचा पाठिंबा या आधारे आजही तिसऱ्या क्रमांकावर आहे. 23 वर्षांच्या इतिहासात राष्ट्रवादीने विधानसभेत आमदारांचे कधीही शतक ओलांडलेले नाही. भाजपनेही कामगिरी सलग दोन निवडणुकांमध्ये 2014 आणि 19 मध्ये करून दाखविली आहे. शिवसेनेची ही कामगिरी राष्ट्रवादीपेक्षा निश्चित चांगली आहे. भाजपच्या साथीने त्यांनी अनेकदा लोकसभेच्या निवडणुकीत डबल डिजीटचा खासदारांचा आकडा गाठला आहे. मग त्या पक्षाला लोकांनी कुठे घेतले…??, असे म्हणायचे…??
… या सर्व राजकीय पक्षांच्या राजकीय यशाचे मूल्यमापन केले की राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय यशाची नेमकी स्थिती काय आहे हे लक्षात येते. आता याच वस्तुस्थितीला जर कोणाला, “राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने डोक्यावर घेतले”, असे म्हणायचे असेल तर त्याला “डोक्यावर पडलेले आर्ग्युमेंट” असे म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणायचे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App