नाशिक : ना स्वतंत्र कार्यक्रम, ना कार्यकर्त्यांना काम; माध्यमांमधल्या बातम्यांवर महाविकास आघाडीची राजकीय गुजराण!! अशीच सध्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची अवस्था झाली आहे.
वास्तविक शरद पवारांनी साधारण महिना दीड महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शॅडो कॅबिनेट नेमली. या सगळ्या नेत्यांना त्यांनी काम दिले पण प्रत्यक्षात या शॅडो कॅबिनेटची कुठलीच “सावली” ना फडणवीस सरकारवर पडली, ना महाराष्ट्राच्या जनतेवर पडली. त्या शॅडो कॅबिनेट मधल्या मंत्र्यांनी ना कुठले काम केले, ना फडणवीस सरकारला धारेवर धरले. त्या ऐवजी 600 मीटरच्या रस्त्यासाठी सुप्रिया सुळे यांचे उपोषण, जयंत पाटलांचे तळ्यात मळ्यात, शरद पवारांची रयत शिक्षण संस्थेची बैठक असल्या बातम्यांनी “पवार बुद्धीच्या” माध्यमांना राष्ट्रवादी काँग्रेस (शप) महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत ठेवावी लागली.
दुसरीकडे काँग्रेसचे एवढे मोठे महाअधिवेशन गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झाले, पण त्याचे साधे पडसाद देखील महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उमटलेले दिसले नाहीत. महाराष्ट्रातले कुठले काँग्रेसचे नेते अहमदाबाद अधिवेशनाला गेले होते??, त्यांनी तिथे महाराष्ट्रासंबंधी, काँग्रेसच्या नवसंजीवनी देण्यासंबंधी काय भूमिका मांडली??, तिथे कोणाची भाषणे झाली अथवा त्या अधिवेशनावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा कुठला ठसा उमटला का??, याविषयी कुठल्याच कॉर्नर मधून काहीही दिसले नाही अथवा ऐकू आले नाही.
एरवी काँग्रेसचे महाअधिवेशन म्हटले की बातम्यांची प्रचंड रेलचेल असायची. अगदी गटबाजी पासून ते काँग्रेसच्या नव्या कार्यक्रमापर्यंत सगळ्या बातम्या सर्व भाषी माध्यमांना मिळायच्या. काँग्रेसचे प्रदेश पातळीवरचे नेते आणि कार्यकर्ते आपापल्या प्रदेशांमध्ये परतून महाअधिवेशनात घडलेले वृत्तांत कथन करायचे. महा अधिवेशन ठरल्यानुसार पक्षाचा कार्यक्रम राबवायचे. एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करायचे. पण काँग्रेसच्या अहमदाबाद मधल्या महाअधिवेशनानंतर महाराष्ट्रात त्या अधिवेशनाचे कुठले पडसाद उमटलेले दिसले नाहीत.
त्या उलट मराठी माध्यमांनी चालवलेल्या बातम्यांवर किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या घटनांवर प्रतिक्रिया देणे एवढेच महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांचे काम उरल्याचे दिसले. विजय वडेट्टीवार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी माध्यमांसमोर आले, पण काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीला हजर होते, तिथला कुठलाही वृत्तांत त्यांनी कथन केला नाही. महाराष्ट्रात काँग्रेसच्या वाडी विषयी ते काही बोलले नाहीत.
संजय राऊत यांची रोजची पत्रकार परिषद, त्यामधली तीच ती टीका टिप्पणी, कधीतरी कोणालातरी टोचणे, कुणाला तरी बोचकारणे या पलीकडे त्यात सापडले नाही. अगदी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जुन्याच नेत्यांची “नवे प्रवक्ते” म्हणून नियुक्ती केल्यानंतर देखील शिवसेनेच्या पक्षांतर्गत आघाडीवर पूर्ण सामसूम दिसली. अधून मधून मातोश्रीवर एखादी घरवापसी या पलीकडे शिवसेनेलाही काही कार्यक्रम उरलेला नाही.
त्यामुळे महाराष्ट्रातल्या घटना घडामोडींवर प्रतिक्रिया देणे आणि मराठी माध्यमांनी चालवलेल्या बातम्यांवर टीका टिप्पण्या करणे याखेरीज संजय राऊत, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील यांना कुठले काम उरलेले दिसले नाही. स्वतःच्या पक्षाचे नवे कार्यक्रम घेऊन जनतेमध्ये घुसण्याची जिद्द त्यांच्यात दिसली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App