लतादीदींवर आपले वडील मास्टर दीनानाथ यांचा प्रचंड प्रभाव होताच, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर मंगेशकर घराण्याची भक्ती आहे. मास्टर दीनानाथ, चिंतामणराव कोल्हटकर यांच्यासाठी सावरकरांनी “संन्यस्त खड्ग” हे नाटक लिहून दिले होते. मास्टर दीनानाथांच्या बलवंत संगीत मंडळीने बसविलेले हे नाटक 1940 च्या दशकात प्रचंड गाजले होते.Latadidi, Master Dinanath and Savarkar
पण त्यावर टीका देखील झाली होती. त्यावेळी चिंतामणराव कोल्हटकर यांनी एकदा सावरकरांची भेट घेऊन “संन्यस्त खड्ग” नाटकावरील टीकेविषयी त्यांना विचारले. त्यावेळच्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलेली टीका सावरकरांना दाखवली. त्यावेळी सावरकर म्हणाले होते, रोजच दूध-भात खाणाऱ्यांना आज तिखट रस्सा दिला आहे. त्यामुळे तो थोडा जळजळणारच…!! ही आठवण पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांनी सावरकर जन्मशताब्दी निमित्त झालेल्या दूरदर्शनच्या मुलाखतीत सांगितली होती.
मास्टर दीनानाथ आणि सावरकरांचे मैत्रीसंबंध देखील त्यांनी उलगडून सांगितले होते. सावरकरांच्या समाजसुधारणेच्या उपक्रमांमध्ये मास्टर दीनानाथ आणि चिंतामणराव कोल्हटकर यांचा हिरीरीने सहभाग असायचा. दलित समाजाबरोबरच्या सहभोजन कार्यक्रमात ते सहभागी व्हायचे. सावरकरांशी मंगेशकर यांचे अतिशय घनिष्ठ आणि कौटुंबिक संबंध होते. सावरकरांना आवडणारे मासे आणि मांसाहारी पदार्थ माई मंगेशकर त्यांना पाठवत असत. लता मंगेशकर आणि त्यांची इतर भावंडे हे पदार्थ सावरकर यांना त्यांच्या घरी नेऊन देत असत.
नमस्कार.भारतमाता के सच्चे सपूत, स्वतंत्रता सेनानी,मेरे पिता समान वीर सावरकर जी की आज जयंती है. मैं उनको कोटी कोटी प्रणाम करती हूँ. pic.twitter.com/mtuznsykHl — Lata Mangeshkar (@mangeshkarlata) May 28, 2021
नमस्कार.भारतमाता के सच्चे सपूत, स्वतंत्रता सेनानी,मेरे पिता समान वीर सावरकर जी की आज जयंती है. मैं उनको कोटी कोटी प्रणाम करती हूँ. pic.twitter.com/mtuznsykHl
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) May 28, 2021
लतादीदींची निर्मिती असलेल्या “सूरिली” या चित्रपटाचा मुहूर्त सावरकरांनी केला होता. सावरकरांना पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट प्रदान केली होती. त्याच वेळी त्यांच्या नावाचे एक अध्यासन देखील सुरु केले होते. या अध्यासनासाठी लता मंगेशकर यांचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी सावरकर यांचे आशीर्वाद घेण्यासाठी लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर त्यांच्याकडे गेले होते. सावरकरांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तो कार्यक्रम यशस्वी झाला होता.
सावरकरांनी आपल्यावर उत्तम संस्कार केले. त्यांच्या तेजस्वी आणि ओजस्वी भाषेच्या संस्कारांमध्ये आम्ही वाढलो, असे लतादीदींनी सांगितले होते. सावरकरांच्या काव्याची मीमांसा या मुलाखतीत प्रख्यात कवी आणि समीक्षक शंकर वैद्य यांनी केली होती. “बद्धता आणि मुक्ती” ही सावरकरांच्या काव्याची खूणगाठ आहे. स्वातंत्र्य ही तर त्यांची जीवननिष्ठा आहे. ती त्यांच्या काव्यात उतरली आहे. म्हणूनच त्यांना महाकवी म्हणतात, अशी मीमांसा शंकर वैद्य यांनी केली होती.
मास्टर दीनानाथ हे सावरकरांचे काव्य अतिशय समरसून गात असत. सावरकरांनी मास्टर दीनानाथ यांच्या मृत्यूनंतर मंगेशकर कुटुंबियांना नेहमी मदत केली, इतकेच काय पण लता मंगेशकर यांना गाण्यात करिअर म्हणून पुढे जाण्याचे प्रोत्साहन सावरकरांनी दिले होते. याच्या कृतज्ञ आठवणी देखील मंगेशकर भावंडांनी अनेकदा सांगितल्या आहेत.
मास्टर दीनानाथ हे लतादीदींचे गुरु, तर मास्टर दीनानाथ यांचे सावरकर हे गुरु असे गुरुणां गुरु असे नाते मंगेशकरांचे सावरकरांशी होते. याविषयीच्या अनेक हृदयस्पर्शी आठवण लतादीदी मुलाखतीच्या रूपाने मागे ठेवून गेल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App