तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात 600 गाड्यांचा ताफा घेऊन आले आणि पंढरपुरातल्या राष्ट्रवादीला फोडून गेले. पण मूळात चंद्रशेखर राव हे राजकारणातले “पवार मॉडेल” फॉलो करत आहेत, हे कोणी ध्यानातच घेतले नाही.K. Chandrashekhar rao following pawar model of politics, “only talk national, act local”
चंद्रशेखर राव यांचा महाराष्ट्रात येऊन काही राजकीय इम्पॅक्ट घडवण्याचा प्रयत्न असला, तरी तो प्रामुख्याने काँग्रेस – राष्ट्रवादी यांना फोडून प्रामुख्याने दक्षिण महाराष्ट्रात शिरकाव करण्याचा आहे. त्यांच्या महाराष्ट्रातल्या संभाव्य राजकारणाच्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिल्या असल्या, अगदी त्यांनी पंकजा मुंडे, राजू शेट्टी यांना भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला तर त्यांना मुख्यमंत्री पदाच्या ऑफर दिल्या असल्या, तरी प्रत्यक्षात चंद्रशेखर राव हे राजकारणातले “पवार मॉडेल”च फॉलो करत आहेत हे कोणी सांगत नाही!!
पवार मॉडेल आहे काय??
यासाठी राजकारणातले हे “पवार मॉडेल” म्हणजे नेमके काय??, हे समजून घेतले पाहिजे. तर “पवार मॉडेल” म्हणजे आपली राजकीय प्रतिमा राष्ट्रीय पातळीवरची आहे, असे भासवत राहून प्रत्यक्षात राजकारण मात्र आपल्या प्रदेशापुरते साधत राहायचे, हे ते “पवार मॉडेल” आहे!! पवारांनी 1991 पासून आत्तापर्यंत सातत्याने हेच मॉडेल वापरले आहे. पवार 1991 पासून पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत जे गेले तिथपासून ते “राष्ट्रीय नेते” म्हणून गणले जातात. पण प्रत्यक्षात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अथवा काँग्रेस या दोन्ही पक्षातून खरे “राष्ट्रीय राजकारण” कधीही केले नाही. उलट ते “राष्ट्रीय प्रतिमेचे महाराष्ट्र मर्यादित” नेतेच राहिले!! पवारांचे सगळे राजकारण प्रादेशिक किंबहुना पश्चिम महाराष्ट्र पुरते उपप्रादेशिकच राहिले. पण पवारांचे स्वतःचे वय आणि राजकीय वय जसे वाढत गेले, तसे खरे राष्ट्रीय पातळीवरचे नेते एकतर निधन पावले किंवा वयोपरत्वे राजकीय दृष्ट्या अस्तंगत झाले. पण पवार त्या पद्धतीने राजकीयदृष्ट्या अस्तंगत झाले नाहीत, हे त्यांचे निश्चित राजकीय कौशल्य आहे!! पण म्हणून पवारांनी खऱ्या अर्थाने “राष्ट्रीय राजकारण” केले, असे मानण्यास अजिबात वाव नाही. त्यांनी स्वतःची राष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा फक्त स्वतःचे महाराष्ट्रातले राजकारण साध्य करून घेण्यासाठीच वापरली. हेच नेमके राजकारणाचे “पवार मॉडेल” आहे!!
तेलंगणातला प्रभाव टिकवण्याचा प्रयत्न
के. चंद्रशेखर राव हेच “पवार मॉडेल” तेलंगणासाठी फॉलो करताना दिसत आहेत. चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय राजकारणात फारसा वाव नाही, याची त्यांना कल्पना नसेल असे अजिबात नाही. पण त्यांना तेलंगणातला प्रभाव दीर्घकाळ टिकवायचा आहे म्हणूनच आपण आता केवळ तेलंगणपुरते “मर्यादित” नाही तर त्या पलीकडे “राष्ट्रीय” पातळीवरचे नेते आहोत, हे तेलंगण मधल्या जनतेला भासवत राहणे चंद्रशेखर राव यांना भाग आहे. तेच नेमके ते करत आहेत.
दक्षिण महाराष्ट्रात शिरकाव
मग असेच असेल, तर त्यातल्या त्यात राजकारणात इतर राज्यांमध्ये शिरकाव करण्यास योग्य भूमी कोणती?, तर ती तेलंगणाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या बॉर्डर वरचे जिल्हे होत. त्यामुळेच त्यांनी नांदेड, सोलापूर हे जिल्हे निवडले आणि तिथल्या जुन्या जाणत्या काँग्रेस अथवा राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोडायचा प्रयत्न केला. त्यांनी शंकरअण्णा धोंडगे पाटलांना फोडले. भगीरथ भालकेंना फोडले. काँग्रेसचे माजी खासदार धर्मांना सार्दूल, लिंगराज वल्याळ यांचे चिरंजीव यांना वश करण्याचा प्रयत्न केला. नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यातील मधली राष्ट्रवादी फोडण्यात त्यांना यश देखील आले.
पंकजा मुंडे, राजू शेट्टींना ऑफर
दरम्यानच्या काळात चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री पदाचे पत्ते पिसल्यासारखे सारख्या पंकजा मुंडे आणि राजू शेट्टी यांना ऑफर देखील देऊन झाल्या जणू काही चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात येऊन पहिल्याच प्रयत्नात भारत राष्ट्र समितीचे बहुमत आणणार आहेत आणि त्यामुळे पंकजा मुंडे अथवा राजू शेट्टी हे थेट भारत राष्ट्र समितीचे मुख्यमंत्री खुर्चीवर बसविणार आहेत, असे वातावरण तयार करण्यात आले. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रात चार बळकट पक्ष अस्तित्वात असताना ते कदापि शक्य नाही, याची निश्चित जाणीव चंद्रशेखर राव यांना आहे. पण त्यांना राजकारणातले “पवार मॉडेल” फॉलो करून आपल्या तेलंगण या राज्यातच आपला प्रभाव टिकवून ठेवायचा आहे, हीच त्यांच्या सध्याच्या राजकारणाची वस्तुस्थिती आहे. त्यापलीकडे काही नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App