बहुजन राजकारणाचा मुलामा; सत्तेच्या वळचणीचा गारवा!!, अशाच शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेषतः शरद पवार यांच्या गेल्या 50 – 55 वर्षांच्या राजकारणाचा इतिहास सांगता येईल. पवारनिष्ठ राजकीय विश्लेषक यालाच “सत्ता” हा राष्ट्रवादीचा “डीएनए” आहे, असे म्हणतात. पण सत्ता हा “डीएनए” तर सोडाच, पण सत्तेचा अमरपट्टा कोणालाच मिळत नसतो हे सत्य ते विसरतात!!
बहुजन राजकारणाचा मुलामा देऊन सत्तेच्या वळचणीला जायचा वारसा शरद पवारांना राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्याकडून मिळाला. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार या दोघांनी महाराष्ट्रात बहुजन समाजाचे राजकारण आणि समाजकारण जरूर केले, पण ते करताना त्याची किंमत सत्तेच्या रूपाने कधी चुकवली नाही, तर ते कायम सत्तेच्याच वळचळणीला बसून राहिले, हा इतिहास आहे.
काँग्रेस बलाढ्य असताना यशवंतराव चव्हाण नेहरू – इंदिरानिष्ठ राजकारण करत राहिले. त्यातले महाराष्ट्रापुरते बहुजनांचे राजकारण हे यशवंतरावांचे “उपराजकारण” होते. राष्ट्रीय राजकारणात ते नेहरू – इंदिरानिष्ठ राजकीय नेते म्हणूनच वावरले. 1978 ते 1980 या दोन वर्षांत चव्हाण- रेड्डी काँग्रेस काढून त्यांनी इंदिरा गांधींना विरोध करून पाहिला. पण 1980 नंतर त्या प्रचंड बहुमतानिशी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर यशवंतरावांनी त्यांच्यापुढे शरणागतीच पत्करली. इंदिरा गांधींची काँग्रेस हाच देशाच्या राजकारणाचा मुख्य प्रवाह आहे, असे सांगून ते प्रवाहपतित झाले. त्यावेळी त्यांनी आपले शिष्योत्तम शरद पवारांना देखील सोडून दिले होते.
शरद पवार 1986 पर्यंत विरोधी पक्षात कायम राहिले. पण राजीव गांधींच्या सर्वंकष शक्तीपुढे त्यांनीही शरणागती पत्करली आणि ते काँग्रेसवासी झाले. या कालावधीत यशवंतराव आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांच्या तोंडी बहुजन राजकारण आणि समाजकारण हे विषय होतेच, पण ते ताटातल्या तोंडी लावण्यापुरतेच!! बाकीचे त्यांचे सर्व राजकारण सत्तेशी संलग्नच राहिले.
राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करताना देखील पवारांनी स्वाभिमानाचा विषय जरूर पुढे आणला. पण दोन महिन्यांतच हा “स्वाभिमान” “दिल्ली शरणागत” झाला. 1990 च्या दशकात भाजप आणि शिवसेनेचा उदय होताना शरद पवारांनी आपल्या तोंडी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ही भाषा आणली. या भाषेतून त्यांनी शिवसेना आणि भाजपला जातीयवादी म्हणून वगळले. पण सत्तेची वळचण सुटू नये म्हणून काँग्रेसची साथ सोडली नाही.
-“भाजपचे “माधव” समीकरण
भाजपने “माधव” समीकरण म्हणजे ओबीसी राजकीय अभिसरण अंमलात आणून शरद पवारांच्या राजकारणावर सामाजिक दृष्ट्याही मात करून दाखवली. त्यांच्यावरचा पुरोगामीत्वाचा शिक्का पुसून मराठा राजकारणाचा शिक्का बसण्याइतपत पवारांचे राजकारण प्रतिगामी करून टाकले आणि 2014 नंतर तर पवारांच्या मराठा राजकारणाचा बाजही उतरवून टाकला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकवून दाखवले. पण पवारांच्याच बुद्धीकौशल्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने ते आरक्षण घालवले.
– राजकीय कृती वेगळी
आता जेव्हा अजित पवारांनी बंडाचा झेंडा पुकारल्याच्या बातम्या आहेत, त्यावेळी सत्तेची वळचण किती महत्त्वाची आहे, हेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या कृतीतून दिसून येते. प्रफुल्ल पटेल यांनी त्यासंदर्भात केलेला गौप्यस्फोट पुरेसा बोलका आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांनी सरकारला पाठिंबा देण्यासंदर्भात शरद पवारांना पत्र दिले होते. पण पवारांनी आयत्यावेळी कच खाल्ली. निर्णय घेतला नाही, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला. त्याला सायंकाळी जितेंद्र शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी दुजोरा दिला आणि जयंत पाटलांनी ते पत्र शरद पवारांपर्यंत पोहोचू दिले नाही, असा दुसरा गौप्यस्फोट करून जयंत पाटलांना अडचणीत आणले.
पण या सर्वांची राजकीय गोळा बेरीज राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायला किती उतावीळ होती, हेच सांगणारे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने कायम बेरजेचे राजकारण केले असे सांगतात. या बेरजेच्या राजकारणाचा वारसा त्यांना यशवंतराव चव्हाण यांनी दिला. 1960-70 च्या दशकात महाराष्ट्रातले सर्व विरोधी पक्ष फोडून त्यातले प्रभावी नेते काँग्रेसमध्ये आणणे हे यशवंतराव चव्हाणांचे बेरजेचे राजकारण होते. शरद पवारांनी देखील काँग्रेस फोडून, मुंडे – ठाकरे – खडसे घराणी फोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे बेरजेचे राजकारण केले.
– राष्ट्रवादीतली फूट दोन्ही गटांना अमान्य
आजही जेव्हा अजितदादांनी 8 मंत्र्यांसह शपथ घेतली, तेव्हा देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी अद्याप पक्षात फूट पडल्याचे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलेले नाही. शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ या दोन्ही गटांनी राष्ट्रवादीतली फूट अधिकृतरित्या मान्य केलेली नाही. याचा अर्थ आमदारांच्या बहुमताच्या दिशेने शरद पवार झुकणार आणि पुन्हा सत्तेच्या वळचणीला जाऊन बसणार, असाच होतो आहे. उद्याच्या बैठकीत हे निश्चित होणार आहे.
– पवारांचा यू-टर्न शक्य
आता आमदारांचेच सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्याचे बहुमत आहे. त्यामुळे आपण आमदारांच्या बाजूने निर्णय घेतला, असे सांगून शरद पवार उद्या कदाचित मोकळे होणार आहेत. त्यामुळे बहुजनांचे राजकारण हा मुलामा आहे. प्रत्यक्षात सत्तेच्या वळचणीचा गारवा पाठीला बरा आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more