हिजाब, टिपू , सावरकर आणि हिंदू समाज!!

गेल्या तीन चार दिवसांपासून हिजाब वरून कर्नाटकात सुरू झालेले वादळ आता सर्वत्र घोंघवायला सुरुवात झाली आहे . वास्तविक एक साधा प्रश्न. ज्याला इंग्रजीत युनिफॉर्म आणि मराठीत गणवेश म्हणतात त्यात कुणाच्या वेगळेपणाची काय आवश्यकता ? आमच्या लहानपणी तर शाळेत सगळ्यांचा गणवेश एक असायचा.Hijab, Tipu, Savarkar and Hindu society

सर्व जण सारखे दिसावेत, सर्वांमध्ये समानता दिसावी आणि आर्थिक स्तर, जात,धर्म हे शिक्षण घेताना भेदाची कारणे बनू नयेत हा गणवेश किंवा युनिफॉर्म मागचा उद्देश आहे. कुठल्याही आस्थापनात अगदी कारखाने, बँका सगळीकडेच युनिफॉर्म असतो .

पण आमच्या कडे तथाकथित धर्मनिरपेक्ष वातावरणात स्वतःची वेगळी ओळख स्वातंत्र्यच्या नावाखाली ठेवण्याची मुभा काही विशेष मंडळींना देण्याची प्रथा अलिकडे काही राजकारण्यांनी सुरू केली. एकीकडे हिंदू समाजाच्या पारंपरिक गोष्टीना अंधश्रद्धा ठरवायची, त्याबाबतीत हिंदू समाजात न्यूनगंड निर्माण करायचा आणि दुसरीकडे अल्पसंख्यांक नावाखाली विशेषतः मुस्लिमांना धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली वेगळेपणा जपण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे हा दुहेरी पुरोगामी कांगावा देशाच्या एकात्मतेवर घाला घालणारा आहे!!

हिजाबचे निमित्त करून बघता बघता चार दिवसात सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडिया यात ज्या बातम्या येत आहेत, जी आगीत तेल ओतणारी वक्तव्ये राजकारणी मंडळी करत आहे ती चिंता उत्पन्न करणारी आहेत. निमित्त हिजाबचे आहे, पण राजकारण्यांचे लक्ष या निमित्ताने अल्पसंख्याक समाजाच्या मतपेढीवर आहे आणि त्यांची ही मानसिकता लक्षात घेऊन ब्रेकिंग इंडियाचे सूत्रधार जे की pdfi सारख्या संघटना आहेत ते आपला अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत .

नेहमी प्रमाणे पाकिस्तान मधून या हिजाब विषयात नाक खुपसण्याचा उद्योग सुरू झालाच आहे. स्वतःच्या अंगावरचे कपडे फाटून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नग्न व्हायची वेळ आली पण भारताचा अंतर्गत बाबीत नाक खुपसण्याचा उद्योग काही त्यांचा कमी होत नाही . पण त्यांना प्रोत्साहन देणारे मणिशंकर अय्यर सारखे साप भारतात अजूनही आहेत . एक चांगले झाले म्हणजे ओवैसीने त्यांना फटकारले!!

मल्लाला युसूफजाई!! तमाम जागतिक पुरोगाम्यांच्या दृष्टीने पोस्टर गर्ल!! भारतात हिजाब आंदोलनाला पाठिंबा देते!!
कारण येन केन प्रकारे भारतात अशांती निर्माण झाली पाहिजे. तुझ्या देशात तालिबान मध्ये मुस्लिम स्त्रियांची काय परिस्थिती आहे हे बघायचे सोडून इथल्या मुलींची काळजी याना पडावी हा किती विरोधाभास म्हणायचा!!

मनात येते हिजाबचा आग्रह धरला असता तर सानिया मिर्झा सारखी टेनिस खेळाडू जगात दिसली असती का? वहिदा रेहमान सारखी अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण झाली असती का? आज जावेद अखातरची टिवटिव शांत आहे, पण त्याच्या शबाना बेगमला हिजाब मान्य आहे का? त्यांची मुलगी कुठले हिजाब घालून फोटो शूट करते?

– हिसाब आंदोलनाचे ठिकाण कळीचा मुद्दा

ज्या भागातून हे आंदोलन जन्म घेत आहे, त्या भागाचा इतिहास समजून घेण्याची गरज आहे. नुकतेच टिपू सुलतान या विषयावर पुन्हा काही विवाद निर्माण झाले होते. टिपूच्या हिंदू विरोधी इतिहासाकडे दुर्लक्ष करून त्याला स्वातंत्र्यसेनानी ठरवणारे पुरोगामी, मुस्लिम धर्मांध आणि राजकारणी यांच्या अभद्र युतीतून हिजाब आंदोलन पेटत आहे. हीच युती शाहीनबागच्या वेळीही होती. या देशातील राष्ट्रीय आणि हिंदू जनमानसाच्या आकांक्षा पूर्ण करणारे सरकार लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले यांना बघवत नाही .

हैदर आणि टिपू या धर्मांध पितापुत्रांनी ज्या पद्धतीने हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले, मंदिरे उध्वस्त केली आणि धर्मांतरे घडवून आणली त्या भूभागातूनच हिजाब आंदोलन उभे राहत आहे. मलबार परिसरात मोपला नावाने ओळखले जाणारे हे टिपूचे वारसदार!! त्यांनीच खिलापत आंदोलनात जे बंड केले त्यात हिंदूंचा बळी गेला. आता हिजाब आंदोलन उभे करताना पुन्हा हिंदू लक्ष्य केले जाणार आहे, जाते आहे.

त्यावेळी खिलापत चळवळ राष्ट्रीय चळवळ मानली गेली. मोठ्या दिमाखाने त्याची शताब्दी केरळ सरकारने या वर्षी साजरी केली. यातूनच अशी खोमेनी वृत्ती डोके वर काढते हे लक्षात घेतले पाहिजे!!

टिपू सुलतान हा इंग्रजांचा विरोधक म्हणून स्वातंत्र्य संग्रामातील आघाडीचा “वीर” म्हणून महात्मा गांधी यांनी गौरवले आणि इंदिरा गांधी यांनी तर चादर वाहण्याचा पराक्रम केला . टिपूचा पराभव झाल्यावर म्हैसूरच्या राजाला पुन्हा गादीवर बसवण्यास विरोध करणारा कोण होता? टिपूच्याच वारसदाराला गादीवर बसवावे असा इंग्रजांना सल्ला देणारा कोण होता?, तर तो टिपूचा मुख्य प्रधान पुरणय्या म्हणून होता. तो हिंदू होता हे हिंदू समाजाचे दुर्दैव म्हणावे लागेल. याच पुरणाय्यांची सुंता करायला टिपू सरसावला होता. त्याच्या आईने त्याला थांबवले, तरी पण त्याला अक्कल आली नाही. हिजाब आंदोलनाला पाठिंबा देणारे मुंब्रा विद्यापीठातील विचारवंत आणि अन्य मंडळी याच कृतघ्न जातकुळीतील आहेत .

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सहा सोनेरी पाने यात म्हटले आहे, टिपूचा पराभव झाल्यावर मुसलमानांच्या जनानखान्यात अडकून पडलेल्या हिंदू स्त्रिया , मुले आणि बळजबरीने मुस्लिम झालेले हिंदू पुरुष मुक्तीसाठी वाट बघत असताना आमच्या सैन्याने जे अक्षम्य दुर्लक्ष केले परिणामस्वरूप एक हिंदू विरोधी समाज आम्हीच उभा केला . त्याच समाजाने खिलापत आंदोलनाच्या निमित्ताने आंदोलन उभे करून अत्याचार केले. सावरकरांनी हिंदूंची ऐतिहासिक चूक इतक्या वर्षांपूर्वी सांगितली आज हिजाबचे आंदोलन बघितल्यावर त्यांच्या दूरदृष्टीचे विशेष वाटत राहते!!

पण प्रश्न आहे तो हिंदू समाजाचा. एकीकडे राणा प्रताप यांना एकटे पाडताना आपल्या मुली बाळी बादशहाला नजराणा देणारी राजपूत घराणी आणि आज येन केन प्रकारे धर्मांध मुस्लिम आणि अन्य तुकडे तुकडे गॅंग ला पाठिंबा देत मोदी विरोधाचा कंड भागवून घेणारी मंडळी एकाच जयचंदी जात कुळातील आहेत. दुसरीकडे सावरकरांनी वर्णन केलेली मला काय त्याचे ? ही हिंदूंची सामाजिक वृत्ती पण कायम आहे .

अशा वेळी मुस्लिम समाजातील शमसुद्दीन तांबोळी आणि तत्सम समाज सुधारक , प्रामाणिक मुस्लिम विचारवंत यांना प्रोत्साहन देणे आणि दुसरीकडे हिंदू समाजातील लोकांना प्रतिक्रियावादी किंवा धर्मवेडे म्हणून संभावना करण्याच्या ऐवजी ते कुठल्या भावनेने भगवे वस्त्र परिधान करण्यास उद्युक्त होत आहेत हे समजून घेण्याची गरज आहे . काही मंडळी शिक्षणसंस्था सारख्या पवित्र ज्ञानमंदिराचा धार्मिक किंवा राजकीय आखाडा बनवू पाहत आहेत यात त्यांच्या भावी पिढ्यांची बरबादी होत आहे हे त्यांना समजत नाही हे दुर्दैव आहे .

मुस्लिम महिलांना पुन्हा मध्ययुगीन धार्मिक रुढी, परंपरा यात ढकलून देण्याची हिजाब चा आग्रह धरणाऱ्यांची मानसिकता आहे . शहाबानोवर झालेला अन्याय पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न आहे. हिजाब बद्दल आवेशाने बोलणाऱ्या मुस्लिम तरुणीला रणरागिणी आणि झाशीची राणी ठरवणारी पत्रकारिता येथे आहे या सारखे दुर्दैव दुसरे काय असणार? लव्ह जिहाद सारख्या प्रकारात बळी जाणाऱ्या हिंदू तरुणी एकीकडे आणि आम्हाला शिकवणारे पुरुष शिक्षक आहेत म्हणून हिजाब चा आग्रह धरणाऱ्या मुस्लिम महिला दुसरीकडे .

संविधानाची खरोखर चाड प्रकाश आंबेडकर , जितेंद्र आव्हाड यांना असेल तर पूजनीय बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात हे शमसुद्दीन तांबोळी यांच्याकडून समजून घेतील. पण तसे ते करणार नाहीत त्यांना हे राजकीय दृष्ट्या परवडणारे नाही. आव्हाड यांची मानलेली बहीण इशरत जहां हिजाब वापरूनच अतिरेकी मोहिमेवर गेली होती का ? आव्हाडांनी तो पण खुलासा आंदोलनाबद्दल बोलताना केला पाहिजे .

समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर पडेपर्यंत सर्वत्र निर्माण होणारे हे विष पचवण्यासाठी समाजपुरुषाची शक्ती नीलकंठ रुपी होण्यासाठी समाजातील हिंदू संघटनांना अधिक सक्रिय , अधिक सतर्क आणि अधिक गंभीर होण्याची गरज निर्माण झाली आहे हेच हिजाब आंदोलनाचे मर्म आहे .

(सौजन्य : फेसबुक)

Hijab, Tipu, Savarkar and Hindu society

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात