नाशिक : “उत्सवी मग्न राजा, निधीअभावी सरकारी योजनांचा वाजला बेंडबाजा”, अशी स्थिती आज महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात कोरोना काळानंतर राजकीय लग्नांचा धूमधडाका उडाला आहे. त्यामध्ये शिवसेना – राष्ट्रवादीचे नेते कपल डान्स करताना दिसत आहेत, तर राष्ट्रवादीचे दुसरे नेते सलमान खान – शिल्पा शेट्टी बरोबर “जुम्मे की रात”वर नाचताना दिसत आहेत. तिसऱ्या नेत्यांनी आपल्या लेकीच्या साधेपणाच्या लग्नाचा कौतुक सोहळा सोशल मीडियावर रंगवून घेतला आणि नंतर गोव्यातल्या ग्रँड हयात या सेवन स्टार हॉटेलमध्ये संगीत मेहंदी आणि ग्रॅंड रिसेप्शन केले. Grand wedding receptions of shiv sena and NCP leaders irked common man as he face economic crunch
एकीकडे या दिमाखदार लग्न सोहळ्यांवर हे नेते करोडो रुपये खर्च करीत असताना दुसरीकडे गरिबांना पोटभर जेवायला देणारी शिवभोजन थाळी गेल्या पाच महिन्यांपासून अनुदानाअभावी बंद करण्याच्या स्थितीत येऊन ठेपली आहे. इतकेच नाही तर मराठा समाजाची विद्यार्थ्यांची सारथी संस्था निधीसाठी निधीसाठी सरकारकडे डोळे लावून बसली आहे. ओबीसी समाजाच्या एम्पिरिकल डेटाविषयी महाविकास आघाडीचे नेते एका पेक्षा एक आवाज काढून बोलताना दिसत आहेत. परंतु तो डेटा गोळा करण्यासाठी आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा निधी देताना हात आखडता घेत आहेत. गेल्या ९ महिन्यांमध्ये ट्रिपल टेस्ट पूर्ण झाली नाही. स्थानिक पातळीवरचा ओबीसी डेटा मिळवता आला नाही. तो सुप्रीम कोर्टात सादर करता आला नाही म्हणून ओबीसी राजकीय आरक्षण स्थगित झाले आणि आता आता ठाकरे – पवार सरकारचे अर्थमंत्री अजित पवार म्हणतात, की आम्ही ओबीसी डेटा गोळा करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. गेल्या ९ महिन्यांमध्ये निधीअभावी हे काम रखडले होते.
एकीकडे शिवसेनेचे खासदार प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात ते स्वतः आणि खासदार सुप्रिया सुळे कपल डान्स करत होते. तो सोहळा देखील मोठ्या हॉटेलातच आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुलीचा देखील लग्न सोहळा असाच दणक्यात पार पडला होता.
कालच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाचा लग्न सोहळा जयपूरच्या पॅलेस मध्ये पार पडला. त्यात प्रफुल्ल पटेलांनी सलमान खान आणि शिल्पा शेट्टी बरोबर “जुम्मे की रात मे” या गीतावर नाच केला. प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध पक्षांचे बडे नेते उपस्थित होते. उद्योगपती गौतम अदानी, अनिल अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती उपस्थित होते.
ठाकरे – पवार सरकार मधले गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मुलीचे लग्न साध्या पद्धतीने रजिस्टर केले. त्याविषयी सोशल मीडियात त्यांचे भरपूर कौतुक झाले. जितेंद्र आव्हाड त्यावेळी भावुक होऊन म्हणाले होते, की पंचवीस वर्षे आपल्या अंगाखांद्यावर खेळलेली मुलगी आता आपली राहणार नाही. दुसऱ्याची होणार अशा कठीण प्रसंगी एक बाप काय भावना व्यक्त करणार? ती गेल्यामुळे आपल्या घराचे घरपण संपते. तिनेच स्वतःहून साधेपणाने लग्न करायचे ठरवले होते म्हणून लग्न साधेपणाने केले, असे ते म्हणाले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या या उद्गारांचे सोशल मीडियावर भरपूर कौतुक झाले होते.
पण कालच गोव्याच्या ग्रँड हयात सेवन स्टार हॉटेलमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या लग्नाचे संगीत सोहळ्याचे कार्यक्रम झाले. आज तिथे ग्रॅंड रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला बडी बडी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.
तिकडे सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते बड्या बड्या लग्न सोहळ्यांमध्ये करोडो रुपये खर्च करत असताना दुसरीकडे सर्वसामान्य विद्यार्थी, शेतकरी, एसटीचा संपकरी कामगार आपल्या खर्चाची तोंडमिळवणी करताना जेरीस आले आहेत. त्यांना अनुदान नाही. शिष्यवृत्ती नाही. पगार नाही. बोनस नाही. इतकेच काय पण अवकाळी पावसाची नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते,… “उत्सवी मग्न राजा निधीअभावी सरकारी योजनांचा वाजला बेंडबाजा…!!”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App