प्रतिनिधी
पुणे : भूविज्ञान आणि पुरातत्त्व विज्ञान यांची उत्तम सांगड घालून अनेक चकित करणारी भू रहस्ये शोधून काढणारे ज्येष्ठ भू पुरातत्त्व वैज्ञानिक डॉ. शरद राजगुरू यांचे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. Great archeologist Dr. Sharad Rajguru passed away
अनेक वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांसाठी ते मोठे प्रेरणास्थान होते. त्यांनी लावलेल्या अनेक संशोधनांना जागतिक पातळीवर अधिमान्यता मिळाली आहे. पुण्याजवळ खंडोबाच्या जेजूरीनजीक महानदी वाहात होती. मोरगाव बोरीजवळ इंडोनेशियातील ज्वालामुखीची राख आढळली. हे आणि असे अनेक शोध डॉ. शरद राजगुरू यांनी परिश्रमपूर्वक आणि पुराव्यांनिशी जगासमोर आणले. जागतिक पातळीवरच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिली.
डॉ. शरद राजगुरू यांना बालपणी स्वरूप संप्रदायातील थोर संत बाबा महाराज सहस्रबुद्धे यांचा सहवास लाभला. बाबा महाराजांनी त्यांना इंग्रजी विषय शिकवून त्या विषयाची गोडी लावली.
अनेक अभ्यासकांनी राजगुरू यांच्या सखोल संशोधनाविषयी कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली वाहिली आहे.
दगडांना बोलतं करणारा माणूस
अभिजित घोरपडे
20 – 25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सासवडजवळ काहीतरी वेगळं पाहण्यासाठी चाललो होतो. आम्ही दोघेच होतो. मी आणि डॉ. शरद राजगुरू. पुण्यावरून मोटारसायकलवरून निघालो. दिवे घाट चढून माथ्यावर पोहोचलो. तसेच पुढे सासवड गाठले. या ऐतिहासिक गावाला वळसा घातला आणि पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याच्या दिशेने निघालो. तिथले प्रसिद्ध संगमेश्वर आणि त्यानंतर वटेश्वर ही मंदिरे ओलांडली. पुरंदरच्या रस्त्याने जात असताना डाव्या बाजूला कोरडं पात्र असलेला एक ओढा समांतर जात होता. काही अंतर गेल्यावर सरांनी थांबायला सांगितले आणि ते ओढ्यात उतरण्यासाठी वाट शोधू लागले.
त्या वाटेने काही अंतर गेल्यावर त्यांनी एक दगड उचलला. तो पाहून त्यांचा चेहरा उजळला आणि मलासुद्धा ते काहीतरी वेगळे असल्याचे जाणवले. ‘हा जांभा आहे…’ राजगुरू सरांचे शब्द. ते पाहून मी अतिशय रोमांचित झालो. कारण आतापर्यंत जांभा खडकाचा संबंध किनारपट्टीवरील कोकण आणि धो धो पाऊस पडणाऱ्या घाटमाथ्यांशीच लावला जात होता. त्यामुळे माझ्या मनात स्वाभाविक प्रश्न होता- जांभा इथं कसा?
तो दगड जाता-येता कदाचित कोणी टाकून दिलेला होता का?… तसेही नव्हते. कारण त्या ओढ्याच्या पात्रात आतमध्ये घट्ट रोवून बसलेले काही गोटे सापडले. तेसुद्धा गोल गरगरीत आणि गुळगुळीत. याचा अर्थ ते त्या ओढ्याच्या पात्राचा भाग होते. वरच्या बाजूला कुठेतरी त्यांचा मूळ स्रोत होता आणि ते तिथून निघून पाण्यासोबत वाहत वाहत इथंवर पोहोचले होते. पण या ओढ्याचा उगम फार दूरवर नव्हतो, तर तो पुरंदर किल्ल्याच्या जवळपासच होता. म्हणजे त्या परिसरातच जांभा खडक तयार झाला होता. या खडकाची निर्मिती होण्यासाठी भरपूर काळ धो धो पाऊस पडावा लागतो. पण ज्या परिसरात आता हा जांभा सापडला, तो तर कोरड्या हवामानाचा भाग आहे. याचाच अर्थ पूर्वी त्या भागात भरपूर पावसाचे आर्द्र हवामान होते… राजगुरू सरांकडून हे समजून घेणं हे अतिशय आनंददायी असे. कारण त्यांच्या बोलण्यात, समजावण्यात, वावरण्यात कमालीचा साधेपणा असे. म्हणूनच मोठ्या अभ्यासकापासून ते विद्यार्थी आणि सर्वसामान्य माणूससुद्धा त्यांच्याशी सहजपणे जोडला जाईल.
त्यांच्यासोबत जांभा पाहिला तशी 20 – 25 वर्षांपूर्वी कऱ्हेच्या पात्रातील ज्वालामुखीची राख पाहिली. दिवे घाटाच्या माथ्यावर सापडणारी आदिमानवाने तयार केलेली छोटी-छोटी दगडी हत्यारं (सूक्ष्मास्त्र / Microliths) पाहिली. त्यांचा अर्थ समजून घेतला… असा हा खडकांना बोलायला लावणारा, त्यांचा अर्थ शोधणारा आणि तो इतरांपर्यंत पोहोचवणारा माणूस!
त्यांचे वेगळेपण म्हणजे, त्यांनी भूविज्ञान (Geology) आणि पुरातत्त्वविज्ञान (Archaeology) या दोन विषयांची उत्तम सांगड घातली. त्यामुळेच भूविज्ञानातील काही गोष्टी वापरून पुरातत्त्वविज्ञानातील काही घटनांचा अर्थ लावला किंवा उलटेसुद्धा! याचे उदाहरण म्हणजे आपल्याकडे मोरगाव आणि बोरी या ठिकाणी नद्यांच्या पात्रात सापडणारी इंडोनेशियामधील ज्वालामुखीची राख (Tephra). ही राख इथे कधी येऊन पडली याची कालनिश्चिती करण्यासाठी या थराच्या खाली सापडलेल्या दगडी हत्यारांचा उपयोग झाला. हे करणाऱ्या टीमध्ये राजगुरू सरांचा प्रमुख वाटा होता. अशी अनेक उदाहरणे आहेत.
सरांनी वयाची ऐंशी ओलांडली तरी त्यांचे उत्साह प्रचंड होता. कोणतीही नवी गोष्ट पाहिली, त्याबाबत ऐकले किंवा काही वाचले तरी ते समजून घेण्याचे कुतूहल एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे असे. कोविडच्या काळात बाहेर पडणे कमी झाले, अन्यथा ते फिल्डवर जाण्यासाठी सदैव तत्पर असत. गेल्याच महिन्यात त्यांनी वयाची नव्वदी पार केली होती. त्या वेळी शंभरी गाठणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ती पूर्ण झाली नाही. काल सायंकाळी त्यांचे निधन झाले. डॉ. शरद राजगुरू यांचे आता जाणे ही अतिशय दु:खद बाब.
त्यांना व्यक्तिश: तसेच, “#भवताल” तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
सुनील देशपांडे : माझ्यासाठी तर मामा गेले. ते मला ढेबरभाई म्हणायचे. मला म्हणायचे, चल राजस्थानला जाऊ, वाळवंट कस पहायच असत ते दाखवतो. पुर्वांचलचा दगड अन् दगड,ओढान ओढा अभ्यासलेला जादूगार गेला. ८० वे वर्ष ओलांडुन गेले तरी पांडुरंग बलकवडे आले की कसब्याच्या वाड्या ठिकाणी बिल्डिंग होत आहे तेथे जमीनी खाली २०/२५ मिटर त्या टपो-या लिफ्टने जाई. वाहिलेला माणूस म्हणजे काय हे स्वतः अनुभवलेले माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट उदाहरण. त्यामुळे आठवणींचे पोते ओझे न होता बालसुलभ खेळण्यांचा पसारा देईल इतका आनंद देत आहेत. लाखो वर्षांपूर्वीच्या निसर्गचक्राविषयी अधिकारी व्यक्ती म्हणून ज्या ५० व्यक्तींना जगाने मान्यता दिली आहे (fellow) त्यातील एक व एकमेव भारतीय, असा विश्वमान्य अभ्यासक आज सोडून गेले.
राजू बोंद्रे : फार पूर्वी वाचलं होतं की जावा /बाली बेटावर सुमारे सव्वा लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा जो उद्रेक झाला त्या वेळी त्यांची जी राख उडाली होती ती या भागात पडली आणि नारायणगाव येथे जी रेडीओ दूर्बीण झाली आहे तेथे ती बसवण्यापूर्वी जे पायाभरणी साठी खोदकाम झाले तेथे एक प्राचीन मानवी हाडांचा सांगाडा त्या राख मिश्रीत माती खाली सापडला होता आणि तो सांगाडा तपासणी झाल्यानंतर त्यांनी काही काळानंतर त्याची डेट डिक्लेयर केली होती.
नेहा चक्रदेव : भावपूर्ण श्रद्धांजली! मला माझ्या संशोधन कार्यात सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते……फील्ड वर्क घ्या आठवणी व सरांचं मार्गदर्शन यांच्या आठवणींना उजाळा देत सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
(सौजन्य : फेसबुक)
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App