मनातले मुख्यमंत्री फारतर पोस्टर्सवर चढणार; पण एलिमिनेशन राऊंडनंतर तर दिल्लीच सगळे ठरविणार!!


मनातले मुख्यमंत्री फारतर पोस्टर्स वर चढणार; पण एलिमिनेशन राऊंड नंतर दिल्लीच सगळे ठरविणार!!, असेच महाराष्ट्राच्या इतिहास आणि वर्तमानात घडले. भविष्यातही तसेच घडण्याची दाट शक्यता आहे. 2019 मध्ये निवडणूक निकालानंतर जर ठाकरे + पवार एकत्र येऊन डाव खेळू शकतात, तर 2024 मध्ये दिल्लीला “तसा” डाव खेळणे अवघड आहे का??

-यशवंतरावांची ग्रीप निसटली

तसेही दिल्लीतल्या काँग्रेस आणि भाजपच्या राजवटीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे डाव कायमच दिल्लीच खेळली. अपवाद असलाच तर 1962, 1963 चा यशवंतराव चव्हाण आणि 1995 चा बाळासाहेब ठाकरे यांचा म्हणता येईल. 1962 दिल्लीला संरक्षण मंत्री म्हणून जाताना यशवंतरावांनी मारोतराव कन्नमवारांना मुख्यमंत्री केले, त्यांच्या नंतर सुरुवातीला वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री केले. पण नाईकांची नंतरची टर्म यशवंतरावांच्या नव्हे, तर इंदिरा गांधींच्या मर्जीने सुरू झाली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरची यशवंतरावांची “ग्रीप” कायमची निसटली.

1978 मध्ये शरद पवारांच्या बंडाला दिलेला प्रच्छन्न पाठिंबा नंतर यशवंतरावांनाच पूर्णपणे टिकवता आला नाही. 1980 मध्ये इंदिरा गांधींच्या वादळात खुद्द यशवंतराव कसेबसे टिकून राहिले. पण पवारांचे सरकार त्यांना टिकवून धरता आले नाही. इंदिरा गांधींनी ते बरखास्त केलेच. 1980 ते 1995 दिल्लीच्या मर्जीने महाराष्ट्रात मुख्यमंत्री खुर्चीवर बसले आणि दिल्लीची मर्जी खफा होताच खुर्चीवरून त्यांना उतरावे लागले. याला शरद पवार देखील अपवाद नव्हते.

 पवार देखील दिल्लीच्या मर्जीचे मुख्यमंत्री

1978 वगळता पवार तीनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले, पण “स्व”मर्जीने नव्हे, तर दिल्लीच्या मर्जीनेच!! पवारांना आजपर्यंत आपल्या मनातले खरे मुख्यमंत्री खुर्चीत बसवता आलेले नाहीत. 1986 मध्ये पवारांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन राजीव गांधींनी त्यांना 1988 मध्ये मुख्यमंत्री केले. 1991 पवार संरक्षण मंत्री म्हणून नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात गेले, तेव्हा त्यांनी आपल्या मर्जीतल्या सुधाकर नाईक यांना मुख्यमंत्रीपदी बसवले खरे, पण अवघ्या वर्षभरातच सुधाकररावांनी पवारांचे नेतृत्व झुगारून लावले. पवारांच्या गुंड पुंड समर्थकांना थेट तुरुंगात डांबले. मुंबई दंगली आणि बॉम्बस्फोटानंतरची सगळी परिस्थिती सावरण्यासाठी पवारांना स्वतःच्या मर्जीतला पद्मसिंह पाटलांसारखा दुसरा मुख्यमंत्री नेमता आला नाही. उलट नरसिंह राव यांनी डावपेच खेळून पवारांना दिल्लीतून मुंबईत धाडून दिले. नरसिंह रावांच्या डावपेचांमुळे पवारांना महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री व्हावे लागले.

1995 मध्ये पवारांच्या नेतृत्वाखालच्या अखंड काँग्रेसचा महाराष्ट्रात पहिल्यांदा पराभव झाला. बाळासाहेबांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले. भले त्यात पवारांनी काही “हस्तक्षेप” केला, पण शेवटी मनोहर जोशींच्या रूपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री झाला. नंतर बाळासाहेबांनी आपल्या मर्जीने नारायण राणेंना मुख्यमंत्री केले.

भले आज मराठी माध्यमे पवारांच्या मनातल्या मुख्यमंत्री पदाची चर्चा हवेत तरंगत ठेवत असतील, त्यावरून पवारांच्या मुत्सद्देगिरीचा नॅरेटिव्ह चालवत असतील, पण म्हणून राजकीय वस्तुस्थिती बदलत नाही.

एकनाथ शिंदेंना दिल्लीनेच बसविले

2019 मध्ये देवेंद्र फडणवीस नकोत म्हणून पवारांनी उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा शिलगावली. पण उद्धव ठाकरे हे काही फर्स्ट चॉईस नव्हते. ठाकरे देखील अडीच वर्षातल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत फक्त दोन दिवस मंत्रालयात गेले हे आमच्या पचनी पडणारे नव्हते हे पवारांना आपल्या आत्मचरित्रात लिहावे लागले. पवारांच्या खेळीतून अडीच वर्षे फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद लांब गेले, त्या पलीकडे पवारांचे राजकारण तरंगत राहण्यापेक्षा दुसरे काही घडले नाही. पण नंतर दिल्लीनेच डाव खेळून पवार आणि ठाकरेंचे पक्ष फोडले. महाराष्ट्रात पवारांच्या मनातले नाही, तर आपल्या मर्जीतले मुख्यमंत्री बसविले. लोकसभेतले निकाल विपरीत लागले, तरी दिल्लीने मूळ निर्णय बदलले नाहीत. दिल्लीच्या मर्जीतलेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी कायम ठेवले आणि त्याच एकनाथ शिंदेंवर आज पवारांना आणि त्यांच्या कन्येला “राजकीय लाईन” मारावी लागत आहे.

“श्री”काराखाली सगळे नकार, पण

आता देखील पवारांना फडणवीस नकोत. उद्धव ठाकरे पण नकोत. काँग्रेसला पवारांच्या मनातल्या मुख्यमंत्री नको. पवारांना दिल्लीकरांनी नेमलेला पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा मुख्यमंत्री “जड” जातो म्हणून तो नको. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या यादीतल्या श्रीकाराखाली बहुतेक सगळे नकार आहेत. पवार, ठाकरे, नाना पटोले, फडणवीस या सगळ्यांच्या मनात वेगवेगळे मुख्यमंत्री आहेत, पण शेवटी एलिमिनेशन राउंड नंतर दिल्लीच सगळे ठरविणार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुंबईत नव्हे, तर दिल्लीत ठरणार आहे. (यात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी आले.) पण 2019 मध्ये जर निवडणूक निकालानंतर ठाकरे आणि पवार एकत्र येऊन डाव खेळू शकतात, तर 2024 मध्ये निवडणूक निकालानंतर डाव खेळणे दिल्लीला अवघड आहे का??

Chief minister of maharashtra has been and Will be decided in New Delhi and not in Mumbai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात