जंतूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या माणसे वारंवार हात धूत आहेत. हात २० सेकंद कसे धुवायचे, हे सतत सांगितले जात आहे. ते करायलाच हवे. ही हात धुण्याची कृती हादेखील एक सजगता ध्यानाचा सराव होऊ शकतो. Bring the mind back to the present
एखादी कृती करताना विचारात भटकणारे मन पुन:पुन्हा त्या कृतीवर आणणे म्हणजेच सजगता ध्यान. असे ध्यान हे ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर अर्थात ओसीडी या आजाराचा एक उपचार आहे, तसेच हा आजार होऊ नये म्हणूनही ते उपयोगी आहे. या आजारात अस्वच्छतेच्या विचारांमुळे माणसे सतत हात धुतात, अंघोळ करतात. पण अनेकदा आपण काय करतो आहोत, याचे भान त्यांना नसते. आपण हात धूत आहोत हे ती कृती करू लागल्यानंतर दहा मिनिटांनी त्यांच्या लक्षात येते.
घरात एकटय़ा राहणाऱ्या स्त्रिया दोन दोन तास बाथरूममध्ये स्वच्छता करीत राहतात, पाण्यात सतत राहि
ल्याने त्यांची बोटे सुजू लागतात. पण ती कृती करीत असताना त्यांचे मन विचारांच्या प्रवाहात असते आणि आपण बाथरूममध्ये आहोत हेच लक्षात येत नाही. शरीरमन थकवणारा हा आजार होऊ द्यायचा नसेल, तर सध्या आपली प्रत्येक कृती सजगतेने करण्याचा प्रयत्न करायला हवा. म्हणजे हात धुताना नळ सुरू केला की त्याची मनात नोंद करायची. पाण्याचा, साबणाचा हाताला होणारा स्पर्श अनुभवायचा.
२० सेकंद हात चोळत असताना नळ बंद ठेवायचा. हे २० सेकंद मन लावून हात धुताना दोन बोटांच्या मधे चोळायचे, तो स्पर्श अनुभवायचा. नंतर नळ सुरू करून पाण्याचा स्पर्श जाणत हात स्वच्छ करायचे. आठवणीने नळ बंद करायचा. अशी कृती वारंवार करू लागतो, तशी ती सवयीने होऊ लागते. म्हणजे मन विचारात राहते आणि हात धुतले जातात. हे होणे स्वाभाविक. ओसीडीमध्ये मात्र हेच विकृतीच्या पातळीला जाते. ते टाळण्यासाठी लक्ष सारखे वर्तमान कृतीवर आणायचे. कृती सजगतेने केली की आनंददायी होते.
भरकटणारे मन आनंदी नसते. ध्यानाचा सराव म्हणजे आपले मन वर्तमान क्षणात नाही, विचारात भरकटते आहे याचे भान येऊन पुन:पुन्हा क्षणस्थ होणे. त्यामुळे असा सराव जागे झाल्यापासून झोप लागेपर्यंत करू शकतो. दिवसभरात एकदाच पाच-दहा मिनिटे ध्यान करणे पुरेसे नाही. अधिकाधिक वेळ सहजतेने क्षणस्थ होणे हे सजगता ध्यान आहे. ते मानसिक स्वास्थ्य देणारे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App