नाशिक : संपूर्ण राजकीय कारकिर्दीत मुंबईचे महापौर, महाराष्ट्राचे दोनदा उपमुख्यमंत्री आणि वर्षानुवर्षे मंत्री राहिलेल्या छगन भुजबळांची खदखद महायुती सरकारने फक्त एकदा मंत्रिपद नाकारले म्हणून बाहेर आली. छगन भुजबळ यांनी नागपूरचे अधिवेशन सोडून देऊन थेट नाशिक गाठले आणि नाशिक मध्ये समता परिषदेचे संपूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते जमवून ते आज आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
पण ही भूमिका जाहीर करण्यापूर्वी काल दिवसभर छगन भुजबळांची संपूर्ण माध्यमातून जी चर्चा झाली, ती जणू काही भुजबळांना मंत्रिपद नाकारून महाराष्ट्रातल्या समस्त ओबीसी समाजावर महायुतीने अन्याय केल्यासारखी भासवली गेली. भुजबळांनी देखील अजित पवार + प्रफुल्ल पटेल + सुनील तटकरे या त्रिकुटाचे सगळे डावपेच उघड्यावर आणले. आपण त्यांच्या हातातले खेळणे आहोत का??, असा परखड सवाल विचारून राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीचे सत्तेच्या लालसेचे उदाहरण दाखवून दिले.
वाटेल तेव्हा, वाटेल त्याला पदावर बसवायचे आणि वाटेल तेव्हा त्या पदावरून उतरवायचे हा “खेळ” शरद पवारांनी वर्षानुवर्षे केला. तोच त्यांचे पुतणे अजितदादांनी छगन भुजबळांच्या बाबतीत 2024 मध्ये करून दाखविला म्हणून भुजबळ चिडले. त्यांना ज्यावेळी राज्यसभेवर जायचे होते, तेव्हा त्यांना तिथे पाठवले नाही. त्यावेळी नितीन पाटलांना शब्द दिला म्हणून राज्यसभेवर पाठवले आणि आता भुजबळांना मंत्री करायचे नाही आणि नितीन पाटलांच्या भावाला मंत्री करायचे म्हणून भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याचा “डाव” अजित पवारांनी आखला होता. तो छगन भुजबळांनी “एक्सपोज” करून टाकला. महाराष्ट्रातल्या ओबीसी मतांवर फक्त भुजबळांची मक्तेदारी आहे, असे त्यांनी भासविले. या निमित्ताने त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबरच भाजपलाही कानपिचक्या द्यायचा प्रयत्न केला, पण या सगळ्या घडामोडीतून शरद पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीचा सत्तेच्या लालसेचा DNA च महाराष्ट्रासमोर आला.
Maharashtra cabinet expansion : पहिल्याच झटक्यात 39 मंत्र्यांसह फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार; नव्यांच्या समावेशाने मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा बदलला!!
महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली खरी, पण सत्तेच्या वळचणीशिवाय ती चालू शकली नाही. म्हणून ज्या काँग्रेस मधून बंड करून पवार बाहेर पडले, त्याच काँग्रेसशी सहा महिन्यांत सत्तेसाठी ते समझोता करून बसले. पवारांच्या राजकारणाची भलामण करणाऱ्या पत्रकारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा DNA सत्तेचा आहे, असे संपूर्ण महाराष्ट्रभर सातत्याने ठसविले.
वास्तविक लोकशाहीमध्ये कुठल्याच पक्षाचा कुठलाच सत्तेचा DNA वगैरे काही नसतो. जनतेने कौल देऊन सत्तेवर बसवले, तर खुर्चीवर बसायचे, जर विरोधात बसण्याचा कौल दिला, तर विरोधात बसायचे हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा DNA आहे. त्यात कुठलीही भेसळ नाही. पण पवारांच्या राजकारणाची भलामण करणाऱ्यांनी राष्ट्रवादी जणू काही फक्त सत्तेसाठीच जन्माला आली आहे, असे भासवून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा DNA कायमचा चिकटवून टाकला. त्या DNA मधलाच “सत्ता” नावाचा “रोग” त्या पक्षाच्या नेत्यांच्या अंगात शिरला. भुजबळांची आजची खदखद या “सत्ता” नावाच्या DNA मधल्या रोगामधूनच बाहेर आली.
वास्तविक पाहता भाजपने अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत घेण्याचे तसे काहीच कारण नव्हते. एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर आल्यानंतर भाजपला पुरेसे बहुमत मिळाले होते. पण मोदी + अदानी आणि पवार कनेक्शन मधून असे काही “पॉलिटिकल झेंगट” जमले की, अजित पवारांमार्फत राष्ट्रवादी नावाची प्रवृत्ती भाजपच्या सत्तेशी संलग्न झाली. अजित पवारांच्या सत्तेची भूक भागवण्यासाठी भाजपने त्यांना बरोबर घेतल्याचा समज महाराष्ट्रात पसरला. तो फार गैर नव्हता.
प्रत्यक्षात भाजपच्या मतदारांची ही अपेक्षा होती की, भाजपला जर बहुमताच्या जवळ नेऊन ठेवले आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बरोबरीने त्यांना बहुमताच्या पार नेले, तर भाजपने राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या सत्तेचा DNA ठेचून काढावा. पण प्रत्यक्षात भाजपलाच राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या कौतुकाचे भरते आले. ते 2024 च्या शपथविधी मध्ये दिसले.
– चंद्रकांतदादांचे खुळचट वक्तव्य
तसाही भाजप आज जरी सत्तेवर आला असला, तरी त्यांच्या नेत्यांमध्ये अजून सत्तेचा DNA शिरायचा बराच बाकी आहे. नाहीतरी चंद्रकांतदादा पाटलांसारखे नेते मध्यंतरी भाजपचा DNA विरोधी पक्षात बसायचा आहे, असे राजकीयदृष्ट्या खुळचट वक्तव्य करून बसलेच होते. ज्या भाजपचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच विरोधी बाकांवर बसले नव्हते, त्या पक्षाचा DNA फक्त विरोधी पक्षाचा आहे, असे म्हणणे हे वस्तुस्थितीला धरून नव्हतेच, पण त्या पलीकडे जाऊन ते राजकीय खुळचटपणाचे वक्तव्य होते. तसेच राष्ट्रवादीचा DNA सत्तेचा आहे असे म्हणणे ही त्या पक्षाचा नेत्यांचा राजकीय माज वाढवणारे वक्तव्य आहे आणि राष्ट्रवादीचा DNA हा खरंच सत्तेचा असेल, तर तो लोकशाहीच्या मूळ पवित्र तत्वांच्या विरोधी आहे, हे नीट लक्षात ठेवून राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीचा सत्तेचा DNA ठेचून काढण्याची जबाबदारी भाजप सारख्या पक्षाचीच आहे, इतरांची नव्हे, हे अवश्य ध्यानात ठेवले पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App