आज श्रावणी पौर्णिमा. आजचा दिवस ‘विश्व संस्कृत दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ‘अमृतवाणी’, ‘देववाणी’, ‘गीर्वाणवाणी’, ‘सुरगीरा’, अश्या नावांनी जिचा गौरव केला जातो, अशी विद्वानांना प्रिय असणारी ही ‘संस्कृत’ भाषा. हिची महती जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवस मानतात.Bhashasu Mukhya Madhura; Shravan Pournima: World Sanskrit Day
वैष्णवी शेजवलकर
प्राचीन काळी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी वेदाध्ययनास प्रारंभ करण्याची पद्धत होती. तसेच, या दिवसाचे विशेष धार्मिक महत्त्व असल्यामुळे ऋषिमुनींचा सन्मान करण्याचाही हा दिवस आहे. संस्कृतात या ऋषिमुनींचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने हा संस्कृत दिवस म्हणून साजरा करतात.
संस्कृत भाषेस सर्व भारतीय भाषांची जननी म्हटले जाते. या भाषेत अमाप साहित्यनिर्मिती झाली आहे. ‘ऋग्वेद’ हे जगातील सर्वात प्रथम साहित्य असल्याचे एक मत आढळते. हिंदू धर्मातील सर्व प्रमुख ग्रंथ याच भाषेत रचले गेले. सनातन धर्माची मूलतत्त्वे, आदर्श जीवनशैली, आध्यात्मिकता यांचे दर्शन संस्कृत साहित्यातून घडते. ‘समाजस्य हितम्, संस्कृते निहितम्।’ अशी उक्ती प्रसिद्ध आहे. परमेश्वरापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाची दारे ज्याद्वारे उघडतात, ते मंत्र, स्तोत्रवाङ्मय ही याच भाषेची अमूल्य देणगी आहे. संस्कृतवाणीला देववाणीचा दर्जा दिला गेला आहे
चतुर्वेद, उपनिषदे, इ. वैदिक वाङ्मय,श्रीवाल्मिकीरचित ‘रामायणम्’, तसेच, महामुनी व्यासरचित ‘महाभारतम्’, ही आर्षकाव्ये, श्रीकृष्णकथिता ‘भगवद्गीता’ हे केवळ संस्कृत साहित्याचे उत्कृष्ट नमुनेच नाही, तर हिंदू धर्माचे आधारस्तंभ आहेत. आस्तिक दर्शनांप्रमाणे, नास्तिक दर्शनांचाही या भाषेने विशाल मनाने स्वीकार केला आहे. आयुर्वेद, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र या व अश्या अगणित शास्त्रांवर, विषयांवर ग्रंथरचना झाल्या आहेत. वैदिक साहित्याप्रमाणे आधुनिक साहित्यानेही रसिकांच्या मनावर आजतागायत राज्य गाजवले आहे.
भास, कालिदास, भवभूति, माघ, सुबन्धु, बाणभट्ट, यांसारख्या दिग्गजांनी ‘न भूतो न भविष्यति’ अश्या प्रकारच्या साहित्यकृतींनी या भाषेस आणखी समृद्ध केले आहे.या मधुर वाणीच्या अभ्यासाचा मोह पाश्चात्यांना, तसेच नासासारख्या संस्थेलाही आवरला नाही. अजूनही संस्कृत साहित्यावर अविरत संशोधन चालू आहे.
आज, ही भाषा व्यवहारात वापरली जात नसली, तरी ‘सत्यमेव जयते’, ‘वसुधैव कुटुम्बकम्’, इ. बोधवाक्ये सहज वापरली जातात. परंतु, या भाषेबद्दलची जागरुकता मात्र कमी झालेली आढळते. ही भाषा क्लिष्ट वाटत असल्याने ती ठराविक वर्गापुरतीच मर्यादित आहे आणि बर्याच अंशी दुर्लक्षित होत आहे. यासाठी श्रावणी पौर्णिमेस संस्कृत दिन साजरा करुन संस्कृत भाषेबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. संस्कृत निबंध, गीतगायन, वाद—विवाद इ. स्पर्धा, पुस्तकांचे वाटप, कवी सम्मेलने इत्यादींचे आयोजन केले जाते.
संस्कृत ही संपूर्ण भारताची भाषा आहे. म्हणूनच ती प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचावयास हवी. ती क्लिष्ट नाही, तर माधुर्यसंपन्न, सुलभ, रमणीय आहे. म्हणून म्हटले जाते— ‘सुरससुबोधा विश्वमनोज्ञा ललिता हृदया रमणीया।अमृतवाणी संस्कृतभाषा नैव क्लिष्टा न च कठिना।।’ ‘जयतु भारतम्। जयतु संस्कृतम्।।’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App