नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्याच्या सभेत बोलताना शरद पवारांना उद्देशून “भटकती आत्मा” अशी प्रखर टीका केली होती. पण आजच्या नंदुरबारच्या सभेत मात्र मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अशी काही ऑफरची राजकीय गुगली टाकली की त्यात शरद पवार क्लीन बोल्ड झाले. Accept Shinde Ajitdad’s leadership and come to NDA instead of dying in Congress
नंदुरबारमध्ये खासदार हिना गावित यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर ते नकली पक्षाचे प्रमुख असल्याची टीका केलीच, पण त्याचबरोबर त्यांना काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA बरोबर येण्याचे आवाहन केले. मोदींनी असे आवाहन केल्याची बातमी पसरताच उतावळ्या पत्रकारांनी माईकची बोंडके हातात घेऊन शरद पवारांकडे धाव घेतली आणि त्यांची प्रतिक्रिया विचारली.
शरद पवारांनी देखील मोदींनी दिलेली ऑफर खरी आहे की खोटी आहे, त्यामध्ये कोणती गुगली आहे, याचा विचार न करता प्रतिक्रिया व्यक्त करून टाकली. पवारांनी आपले मोदींशी वैयक्तिक संबंध आहेत. परंतु मोदींशी वैयक्तिक संबंध असणे निराळे आणि त्यांच्याबरोबर राजकीय युती करणे निराळे असे सांगून मोदींबरोबर जाण्याची कथित ऑफर नाकारली. मोदींमुळे देशातली संसदीय लोकशाही धोक्यात आली आहे त्याच मुद्द्यावर आपले त्यांचे मतभेद आहेत. त्यामुळे आपण मोदींबरोबर जाऊ शकत नाही, असे पवारांनी सांगितले.
पण पवारांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया म्हणजेच मोदींच्या ऑफरच्या गुगलीवर पवार क्लीन बोल्ड झाले याचे निदर्शक होते. कारण मूळात जी ऑफर मोदींनी खऱ्या अर्थाने दिलीच नाही, त्या ऑफरवर उतावळ्या पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पवारांनी ती ऑफर नाकारली. प्रत्यक्षात नंदुरबारच्या सभेत मोदी नेमके काय म्हणाले, हे ऐकल्यावर आणि वाचल्यानंतर त्या ऑफर मधली खरी “राजकीय गुगली” स्पष्ट होते.
मोदी म्हणाले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना चालवण्यापेक्षा आणि आपले पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून मरण्यापेक्षा छाती पुढे काढून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबरोबर यावे आणि मग त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सामील व्हावे.
मोदींच्या या विधानात बरेच “बिटवीन द लाईन्स” दडले आहे. एक तर मोदी ठाकरे आणि पवारांच्या पक्षांना “नकली” म्हणाले. काँग्रेसमध्ये जाऊन ते मरतील, असे स्पष्ट बोलले. त्याही पलीकडे जाऊन मोदींनी ठाकरे आणि पवारांना थेट भाजपमध्ये येण्याची बिलकुल ऑफर दिलेली नाही. त्यांना जी ऑफर दिली, ती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बरोबरी येण्याची ऑफर दिली. म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे नेतृत्व ठाकरे आणि पवारांनी स्वीकारावे. मग त्यांचे उरलेले पक्ष शिंदे आणि अजितदादा यांच्या पक्षात विलीन करावे, अशी ती ऑफर आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनीही रिटायर होऊन अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारावी म्हणजे त्यांची स्वप्ने पूर्ण होतील, अशी मोदींची खरी ऑफर आहे आणि नेमकी हीच मोदींची “राजकीय गुगली” आहे.
याचा सरळ सरळ अर्थ असा की मोदींनी पवार आणि ठाकरे यांचे त्यांच्या पक्षांमधले सर्वोच्च नेतृत्वाचे स्थानच उडवून लावले आहे. त्यांनी पवार आणि ठाकरे यांनी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर यावे म्हणजेच अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करावे, असे सांगितले आहे. कारण आज खऱ्या शिवसेनेचे हे एकनाथ शिंदे नेते आहेत आणि खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे नेते आहेत. त्यामुळे पवार आणि ठाकरे यांनी नेतृत्वाची दुय्यम भूमिका स्वीकारून आपापल्या जुन्या पक्षांमध्ये सामील व्हावे ही खरी ऑफर आहे. या कथित ऑफरच्या गुगलीवर उतावळ्या पत्रकारांना प्रतिक्रिया देऊन शरद पवार क्लीन बोल्ड झाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App