विनायक ढेरे
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त देशभर आदरांजली वाहिली जात आहे. पण आजच्या लॉकडाऊनमध्ये मोठे कार्यक्रम आयोजित करणे शक्य नसताना अनेकजण विशेषत: अनेक कलावंत सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर एकत्र येऊन अनोख्या पद्धतीने सावरकरांना आदरांजली वाहताहेत. या पार्श्वभूमीवर एका अशाच उपक्रमाची माहिती वाचनात आली. हा अनोखा उपक्रम होता, सावरकरांच्या त्रिमिती मुलाखतीचा…!!
3 D interview of savarkar…!! हा योग साधला होता, महाराष्ट्रातल्या प्रख्यात साहित्यिक आणि कलावंतांनी. या सर्वांची नावे वाचली तरी त्या उपक्रमाची सांस्कृतिक उंची आणि एेतिहासिक महत्त्व लक्षात येते.
सावरकरांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यावेळी देशभर कार्यक्रम झाले. त्याच वेळी मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या रहस्य रंजन मासिकाचे संपादक ना. वि. काकतकर यांना वेगळी कल्पना सूचली. सावरकरांचे विविध पैलू एकाच वेळी उलगडणारी मुलाखत घ्यायची. त्याचवेळी त्यांच्या भावमुद्रा टिपणारी स्केचेस काढायची आणि फोटोही घ्यायचे.
काकतकरांनी सावरकरांची परवानगी घेऊन राजकारण ते साहित्य असे सर्वस्पर्शी विषय निवडले आणि केसरीचे संपादक दि. वि. गोखले, समीक्षक स. गं. मालशे, कवी सदानंद रेगे, प्रा. व. र. आंबेरकर, प्रख्यात चित्रकार आणि आर. के. स्टुटिओचे आर्ट डायरेक्टर एम. आर. आचरेकर, पोर्टेट फोटो आर्टिस्ट पुरव या सर्वांना उपक्रमात सहभागी करवून घेतले. यातील प्रत्येकजण विविध विषयांवर सावरकरांना प्रश्न विचारत होते.
सावरकर त्यांना सविस्तर उत्तरे देत होते…!! आणि त्याच वेळी आचरेकर सावरकरांची लाइव्ह स्केचेस काढत होते. पुरव फोटो घेत सावरकरांच्या भावमुद्रा टिपत होते. सावरकर सदनात झालेली ही मुलाखत अडीच तास रंगली. देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व मुद्यांना सावरकरांनी आपल्या अनोख्या शैलीत स्पर्श केला होता. या मुलाखतीला काकतकरांनी नाव दिले होते, “सावरकरांची त्रिमिती मुलाखत”. रहस्य रंजनच्या खास सावरकर अंकात ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली. सावरकरांच्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक विचार – मूल्यांचा यातून समग्र दस्तावेज तयार होऊ शकला…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App