एक कॅबिनेट मंत्री स्वत:च्या बंगल्यावर त्याच्या विरोधात सोशल मीडियात लिहिणार्याला बळजबरीने आणतो. त्याच्यासमोर त्या माणसाला मरेपर्यंत मारहाण केली जाते. हा मंत्री कोण्या सिनेमातला खलनायक नाही. ‘शाहू-फुले-आंबेडकर’ ही जपमाळ सतत ओढणारा, सुसंस्कृत यशवंतराव चव्हाण यांना गुरूस्थानी मानणार्या नेत्याचा चेला आहे. या मारहाणीचं समर्थन उघडपणे किंवा आडून करणार्या भोंदू पुरोगामी, खोटे लोकशाहीवादी आणि बुर्झ्वा उदारमत वाद्यांचं पितळ या निमीत्तानं उघडं पडलं. या विषयीच ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सोशल मीडियात व्यक्त केलेल्या विचारांचा संपादीत भाग.
जितेंद्र आव्हाड प्रकरणात आव्हाड दोषी आहेत की नाहीत हे नंतर सिद्ध होईल पण यानिमित्ताने हिंसेचे समर्थन अनेक पुरोगामी कार्यकर्ते करत आहेत हे जास्त धक्कादायक आहे.नरेंद्र भक्तांसारखे इकडे जितेंद्रभक्त तयार झाले आहेत. मान्य आहे की भाजप परिवाराला या घटनेचा निषेध करण्याचा किंचितही नैतिक अधिकार नाही. गुजरातमध्ये यांनी क्रिया-प्रतिक्रिया सांगत हिंसेचे समर्थन केले त्यांना या किरकोळ हिंसेचे दुःख करण्याचा काडीचाही अधिकार नाही हे मान्य. पण आपल्यासारख्या विचार विवेक असलेल्या सामान्य माणसांनी जे घडले ते चूक आहे हे म्हणायला हरकत काय ? फेसबुकवर अनेक पुरोगामी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया उत्सुकतेने बघतो आहे त्या निराश करतात. पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने आजपर्यंत आव्हाड व इतरांबाबत जे केले त्यात त्या नीचपणाचा कळस म्हणावे असेच आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल किंचितही सहानुभूती असण्याचे कारण नाही पण त्याने असे केले म्हणून आपण त्या हिंसेचे समर्थन करणार असू तर या देशात अशा हिंसेचे तात्विक समर्थन देण्याचे प्रयोग महात्मा गांधींच्या हत्येपासून सुरू आहेत. याचे भान आज समर्थन करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे जर आपण हे समर्थन करणार असू तर
तेव्हा हिंसेची ताकद समोरच्या प्रवृत्तीकडे जास्त आहे गुजरातपासून अनेक प्रकारच्या हिंसेचा त्यांना दीर्घ अनुभव आहे तेव्हा आपण केवळ एका घटनेतून हिंसेच्या तत्त्वज्ञानाला मान्यता देण्याची गंभीर चूक करू नये हेच मला यानिमित्ताने पुरोगामी मित्रांना सांगावेसे वाटते….मान्य आहे की अशा विकृत मंडळींकडून सातत्याने होणारे ट्रोलिंग अनेक कार्यकर्ते नेत्यांवर पातळी सोडून झालेली टीका यामुळे पुरोगामी कार्यकर्ते उद्विग्न आहेत व सायबर क्राईम हा अत्यंत तकलादू कायदा असल्याने त्याबाबत होत काहीच नाही यातून कदाचित काहीनी समर्थन केले असेल परंतु दीर्घकालीन भूमिका लक्षात घेऊन अशी चूक करू नये असे वाटते
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App