कोरोनाच्या संकटातही पंतप्रधानांचा विश्वबंधुत्वाचा आदर्श


चीनी व्हायरसमुळे अखिल मानवजातच संकटात सापडली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील देशांना देऊ केलेली मदत आणि विविध राष्ट्रप्रमुखांशी सातत्याने संवाद साधून त्यांची उमेद वाढवित आहेत. त्यातून चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईतून विश्वबंधुत्वाचा आदर्शच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून दिला आहे.


अभिजित विश्वनाथ

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न पाहिले होते. २०२० मध्ये भारत महासत्ता होईल असे ते म्हणत. त्यांच्या या विधानांवर त्यावेळी विनोद केले जात होते. अगदी आता आतापर्यंत भारतातील काही घटनांचा संदर्भ देऊन त्याची खिल्ली उडविली जात होती. परंतु, चीनी व्हायरसमुळे अखिल मानवजातच संकटात सापडली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील देशांना देऊ केलेली मदत आणि विविध राष्ट्रप्रमुखांशी सातत्याने संवाद साधून त्यांची उमेद वाढवित आहेत. त्यातून चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईतून विश्वबंधुत्वाचा आदर्शच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून दिला आहे.

कॉँग्रेसमध्ये मोदींच्या तोडीचा नेता नसल्याने कॉँग्रेसी विचाराने कायमच मोदी विरुध्द नेहरू हे मिथ उभे केले. मोदींना जगभरातून पाठिंबा मिळत असताना नेहरूंच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरीचा संदर्भ दिल जातो. पंचशील धोरणाबाबत बोलले जाते. आंतरराष्ट्रीय सद्भावना आणि सहकार्य वृध्दींगत व्हावे यासाठी पंचशील धोरणाचा पुरस्कार करण्यात आला होता. पण आदर्शवादी, स्वप्नाळू आणि दुबळ्यांच्या पंचशील धोरणापेक्षा अखिल मानवतेलाच वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. त्याला संपूर्ण जगातून आता पाठिंबा मिळू लागला आहे. भारतापेक्षा जगातील अनेक देशांत चीनी व्हायरसचे संकट जास्त मोठे आहे. यामध्ये तथाकथित विकसित देशांची परिस्थिती तर अधिक वाईट आहे. अमेरिकेखारखी महासत्ताही चीनी व्हायरसमुळे जर्जर झाली आहे. हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या निमित्ताने भारताकडे याचना करण्याची वेळ या महासत्तेचे प्रमुख डोनाल्ड ट्रंप यांच्यावर आली. पंतप्रधानांनी मोठ्या मनाने ही याचना मान्य केली. त्यासाठी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधावरील निर्यातबंदी उठविली. त्यामुळे ट्रंप यांंनी नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले आहे. मोदी हे महान नेते आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की कठीण काळात मित्रांकडून जास्तीत जास्त मदतीची गरज असतो. हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन संदर्भात घेतलेल्या निर्णयाबाबत भारताचे आणि भारतीय लोकांचे आभार. हे विसरू शकत नाही. या लढाईत आपल्या मजबूत नेतृत्वाने फक्त भारतीय नाही तर माणुसकीची मदत करणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही त्यांनी आभार मानले आहेत.

भारतीय माध्यमांतील एका गटानेआणि विरोधी पक्षांनी ट्रंप यांच्या कथित धमकीचेही राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे लक्षात घ्यायला हवे की भारताने केवळ अमेरिकेलाच मदत केलेली नाही तर अन्य देशांनाही मदत पाठवायला सुरूवात केली आहे. चीनी व्हायरसवर गुणकारी ठरणारे हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन हे औषध भारताकडून अनेक देशांना पाठविले जात आहे. भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे. अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. चीनी व्हायरसवर उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.

पंतप्रधान स्वत: अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांशी बोलत आहेत. स्वीडन, ओमानचे पंतप्रधान, युगांडाचे राष्ट्रपती यांच्याशी संवाद साधला. आखाती देशांना औषधांची कितपत गरज आहे, यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आखाती देशांच्या संपर्कात आहेत. इंडो-पॅसिफिक देशांबरोबर अमेरिका, फ्रान्स, स्पेन, यूके आणि इटली या देशांबरोबरही परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी संपर्कात आहेत. चीनी व्हायरसचे प्रमाण भारतात वाढत असले तरी त्यामध्ये लक्षणिय वाढ झालेली नाही. याचे कारण म्हणजे भारताने त्याचा धोका खूप आधी ओळखला. त्यासाठी पंतप्रधानांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनचा निर्णयही घेतला. चीनी व्हायरसविरुध्दच्या भारताच्या लढाईचे जागरिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले. ही लढाई दीर्घकाळ चालेल, पण आपल्याला थांबायचं नाही, थकायचं नाही, विजयी व्हायचं आहे, असा संकल्प पंतप्रधानांनी १३० कोटी लोकांसोबत केला आहे. मात्र, हे संकट केवळ भारतावरआलेले नाही तर मानवजातीवरच आले आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी आता सिध्दता केली आहे.

आज या वेळी पंतप्रधानांनी २८ सप्टेंबर २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेपुढे केलेले भाषण आठवते. या वेळी पंतप्रधान म्हणाले होते की, सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी जगाला सौहार्द आणि शांतीचा संदेश दिला होता. आजही भारताचा जगाला हाच संदेश आहे. त्याच वेळी त्यांनी भारतासारख्या विकसनशिल देशाने सुरू केलेल्या आरोग्य विमा योजनेची माहिती दिली होती. ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत इलाज असलेली ही योजना संपूर्ण जगाला नवा मार्ग दाखवेल, असे म्हटले होते. आज चीनी व्हायरसच्या निमित्ताने पंतप्रधानांचे बोल सगळ्या जगाला आठवत असतील. हजारो वर्षांची परंपरा असलेली भारताची महान संस्कृती अखिल विश्वाच्या स्वप्नांना आपल्यामध्ये पाहते. लोकसहभागातून लोककल्याण यातूनच जगकल्याणा हिच आमची प्रेरणा आहे. ‘सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास’ केवळ भारताच्या सीमांपुरता मर्यादित नाही तर संपूर्ण जगासाठी आहे. त्यासाठीचे आमचे परिश्रम हे केवळ दिखावू किंवा दयाभावातून नाहीत तर कर्तव्यभावनेतून आहे. १३० कोटी लोकांना केंद्रस्थानी ठेऊन आम्ही करत असलेले प्रयत्न हे संपूर्ण जगाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे. प्रत्येक देशाचे आणि प्रत्येक समाजाचे हेच स्वप्न आहे.

दहशतवादाच्या संकटाच्या संदर्भात ते म्हणाले होत की दहशतवाद हा केवळ एका देशापुढची समस्या नाही तर संपूर्ण जगासमोरची आणि मानवतेसमोरचेच एक आव्हान आहे. विखुरलेले जग कोणाच्या हिताचे नाही. त्यातून आपण संकटांचा मुकाबलाही करू शकत नाही. आपापल्या सीमांपुरते मर्यादित राहणे कोणत्याही देशाच्या हिताचे नाही, असे आवाहनही मोदींनी केले होते.मानवतेसाठी दहशतवादाच्या विरोधात संपूर्ण जगाचे एकमत होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते. चीनी व्हायरस आज दहशतवादाच्या रुपात आला असताना याच आपल्या विचारांना स्मरून मोदी काम करत आहेत. विश्वबंधुत्वाचा नवा आदर्श जगापुढे ठेवत आहेत

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात