आव्हाडांसारख्यांना मग्रुरी कोणाच्या बळावर? शरद पवार आता लिहितील का पत्र?


ठोकशाहीची भाषा करणाऱ्या शिवसेनेचा वाण नाही पण गुण राष्ट्रवादी कॉंग्रेसमधल्या काही नेत्यांना लागला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातली शिवसेना दिवसेंदिवस मवाळ होत आहे. त्याचवेळी ठोकशाहीचा राष्ट्रवादीला लागला का, असा प्रश्न शाहु-फुले-आंबेडकरांच्या नावाच जप सतत ओढणाऱ्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्यावरून विचारला जात आहे. पण मुळात प्रश्न आहे की, आव्हाडांसारख्यांना सत्तेची मग्रुरी येते कशी? शरद पवार यांच्यासारखे सुसंस्कृत म्हणविले जाणारे नेतेही आव्हाडांसारख्यांना आपल्या पदरी बाळगतात. यामागे केवळ राजकारणाची सोय असते की अशाप्रकारची ‘शाऊटींग ब्रिगेड’ ही त्यांच्या राजकारणाची गरज असते ?


अभिजित विश्वनाथ

नवी दिल्ली :  ठोकशाहीची भाषा करणाऱ्या शिवसेनेचा वाण नाही पण गुण राष्टÑवादी कॉँग्रेसला लागला काय, अशी शंका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्यावरून येत आहे. पण मुळात प्रश्न आहे की आव्हाडांसारख्यांना सत्तेची मग्रुरी येते कशी? शरद पवार यांच्यासारखे सुसंस्कृत म्हणविले जाणारे नेतेही आव्हाडांसारख्यांना आपल्या पदरी ठेवतात. यामागे केवळ राजकारणाची सोय असते की अशाप्रकारची ‘शाऊटींग ब्रिगेड’ ही त्यांच्या राजकारणाची गरज असते, असे विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.

जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अत्यंत उथळ नेते. सतत वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहायचे ही त्यांची राजकारणाची कार्यपध्दती. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनेकदा त्यांना फैैलावरही घेतले आहे. मात्र, शरद पवार यांनी मात्र त्यांची पाठराखण केली. किंबहुना त्यांना आव्हाडांचे कौतुकच वाटते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी आव्हाडांनी ट्विट करीत महाराष्ट्र पेटविणार अशी धमकी दिली होती. त्याचबरोबर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरूनही आव्हाडांनी वाद निर्माण केला होता. या वेळी त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. धमक्या येत आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले होते. या पत्रात आव्हाड यांचे कौतुक करताना पवार यांनी, महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे ओबीसी समाजातील लोकप्रिय नेते आहेत, असा उल्लेख केला होता. आज तेच पवार आव्हाड यांच्यासमोर एका अभियंत्याला अमानुष मारहाण झाल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिणार का? हा प्रश्न आहे.

या प्रश्नाचे उत्तर कदाचित नाही असेच आहे. याचे कारण म्हणजे शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील ओबीसी चेहरा म्हणून आणि अल्पसंख्याकांचा हितरक्षक म्हणून आव्हाडांना पुढे आणले. आव्हाड अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करतात यामागे त्यांच्या भूमिकेपेक्षा मुंब्रा या त्यांच्या मतदारसंघातील जातीय गणित आहे. याठिकाणी मुस्लिम समाजाची मते मोठी आहेत. त्यामुळे अगदी देशद्रोह्यांची पाठराखण करण्यापर्यंत आव्हाडांची मजल गेली होती. गुजरातमधील अहमदाबाद येथील चकमकीत इशरत जहाँ मारली गेल्यानंतर आव्हाडांनी इशरतला निर्दोष ठरवत तिच्या कुटुंबियांना पाठिंबा दर्शविला होता. त्यांच्यासाठी निधी गोळा केला होता. मात्र, मुंबई बॉँबस्फोटातील आरोपी डेव्हिड हेडलीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या साक्षीत इशरत लष्कर-ए-तोयबाची हस्तक असल्याचा खुलासा झाला. त्यानंतरही ‘गिरे तो भी नाक उपर’ या उक्तीप्रमाणे आव्हाडांनी हेडली हा डबल एजंट असल्याने त्याच्या साक्षीला महत्व नाही, असे म्हटले. यापुढे जाऊन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हेडलीच्या तोंडून तसं वदवून घेतल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

राज्यात शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी कॉँग्रेस- कॉँग्रेस महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री असतानाआव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती. इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. त्यावेळीही पवारांनी त्यांच्यावर कारवाई केली नव्हती. सातत्याने वादग्रस्त विधाने आणि समाजात तेढ निर्माण करण्याची आव्हाडांची जुनी सवय आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा खून झाला होता, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड त्यांनी एकदा फेसबुक लाइव्हदरम्यान केले होते. यावरून वाद निर्माण झाल्यावरही आव्हाडांवर कोणतीही कारवाई झाली नाही.

भडक विधाने ही तरआव्हाडांची खासियत आहे. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याचा वाद निर्माण झाला तेव्हा आव्हाड म्हणाले होती, मी दिल्लीच्या तख्तला विचारु इच्छितो, मी देशवासी असल्याचा पुरावा तू मागणार का? आता तू ऐक, जेव्हा तुझा बाप इंग्रजांसमोर झुकून त्यांचे तळवे चाटत होता. तेव्हा माझा बाप फाशीच्या तख्ताचे चुंबन घेत इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत होता. मुस्लिमांचे लांगुलचालन करताना हिंदूंवर टीका करायचीही त्यांना सवय आहे. हिंदू आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार कुठे झाले हे सांगू शकत नाही, परंतु मुस्लिम सांगू शकतात. त्यांच्या हक्काचं कब्रस्तान आहे, असेही ते म्हटले होते. मात्र, या सगळ्यावर कारवाई करण्याऐवजी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील एक बुध्दीवादी नेता अशी त्यांची प्रतिमा उभी करण्यात आली. आव्हाडांनी विविध विषयांवर लिहिलेल्या ब्लॉगचे एक पुस्तकही प्रसिध्द झाले आहे. पण अभियंत्याला मारहाणीच्या प्रकरणात त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील अनेक नेत्यांना आव्हाडांची कार्यपध्दती आवडत नाही. त्यांच्या बेताल वक्तव्यांबाबत नाराजी व्यक्त केली गेली आहे. पण, सातत्याने शरद पवार यांच्यासमोर राहायचे. त्यांना अगदी ‘आपल्या सगळ्यांचा बाप’ असे म्हणायचे यामुळे पक्षात आव्हाड यांची सद्दी निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा सन्मान करणारा शरद पवार यांच्यासारखा नेता मी कधी पाहिला नाही, असे आव्हाड नेहमी म्हणतात. मग त्याचा आदर्श घेऊन विरोधकाच्या मताचाही सन्मान मात्र करत नाहीत. महाराष्ट्राच्या एका मंत्र्याच्या अशा प्रकारच्या कृत्याबाबत आव्हाडांनीच वर्णन केलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करणारे नेते काय भूमिका घेणार? आव्हाडांच्या समर्थनासाठी उतरलेल्या आणि विरोधकांना अशाच प्रकारे उत्तर द्यायला पाहिजे असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना शरद पवार शहाणपणाचे चार बोल सुनावणार का? हाच प्रश्न आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात