प्रति सेकंद ४० गिगाबिट्स अफाट क्षमतेचे वायरलेस नेटवर्क

फोन व इंटरनेटचे कनेक्शन हा सध्याच्या काळात जगभर सर्वांत महत्वाचा मुद्दा आहे. ज्या ठिकाणी इंटरनेटची रेंज नसते त्या ठिकाणी किती समस्या येतात याची कल्पना न केलेली बरी. Wireless network of 40 gigabits per second

सध्या लॉकडाउनच्या काळात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना जगभर रुजत आहे. त्याचप्रमाणे याला प्रोत्साहनही दिले जात आहे. अशाप्रकारे काम करायचे झाल्यास वेगवान इंटरनेटची फार मोठी गरज निर्माण होणार आहे. आता सुरक्षित इन्फ्रारेड किरणांवर आधारलेल्या, सध्याच्या वायफाय नेटवर्कपेक्षा शंभर पट अधिक वेगवान आणि कोंडी न होता अनेक उपकरणांना जोडण्याची क्षमता असलेल्या वायरलेस इंटरनेटची र्निमिती करण्यात नेदरलँड्समधील एंडहोवन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे.

या वायरलेस नेटवर्कची क्षमता ४० गिगाबिट्स प्रति सेकंद इतकी प्रचंड आहे, तसेच प्रत्येक उपकरणाला स्वतंत्र प्रकाशकिरण मिळत असल्याने कोंडी होत नाही. ही यंत्रणा उभारण्यास सोपी आणि स्वस्त आहे. वायरसेल डेटा हा लाइट अँटेनाद्वारे पोहोचतो. या अँटेनामधील ग्रेटिंग्जमधून वेगवेगळ्या वेव्हलेंग्थच्या प्रकाश किरण वेगवेगळ्या कोनातून उत्सर्जित केले जातात.

प्रकाशाची वेव्हलेंग्थ बदलली की, प्रकाशकिरणाची दिशाही बदलते. या तंत्रज्ञानात सुरक्षित इन्फ्रारेड वेव्हलेंग्थचा वापर केला जात असल्यामुळे ती डोळ्याच्या दृष्टिपटलापर्यंत पोहोचत नाही. सध्याचे वाय-फाय सिग्नल २.५ किंवा ५ गिगाहर्टझ फ्रीक्वेन्सीच्या रेडिओ सिग्नलचा वापर करतात. मात्र नवीन यंत्रणा १,५०० नॅनोमीटर वेव्हलेंग्थच्या इन्फ्रारेड प्रकाशाचा वापर करते. त्यामुळे डेटाही क्षमता वाढते.

संशोधकांना अडीच मीटर अंतरात ४२.८ गिगाबिट प्रतिसेकंद एवढे वेग गाठण्यात यश आले. सध्याच्या सर्वोत्तम वाय-फायचा वेग ३०० मेगाबिट प्रति सेकंद आहे. त्यापेक्षा नव्या वाय फायचा वेग जास्त असेल. आगामी काळात सारे जग फाईव्ह जी सेवा वापरण्यास सुरुवात करेल. अशा या काळात या नव्या संशोधनाचा फार मोठा लाभ होणार आहे हे नक्की.

Wireless network of 40 gigabits per second