हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्… !!; ममतांच्या पत्राचा मर्यादित अर्थ


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह भाजपच्या विरोधातील १५ नेत्यांना लिहिलेल्या पत्राचा अर्थ मर्यादित स्वरूपात “हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं  जित्वा वा भोक्ष्यसे महीम्… !!” या पंक्तीत आहे… या पंक्तीचा इथे फारसा कोणी खोलवर जाऊन अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नये. कारण ममता बॅनर्जींच्या पुढच्या राजकीय वाटचालीची दिशा सांगण्यापुरताच मी त्या पंक्तींचा मर्यादित वापर केला आहे.


ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांच्यासह १५ नेत्यांना लिहिलेले पत्र हे त्यांच्या भविष्यातील राजकारणाची सोय आणि दिशा दाखविते आहे. ममता बॅनर्जी जिंकल्या तर त्या पुन्हा बंगालवर राज्य करतील आणि त्या हरल्या तरी त्या पूर्ण बाजूला पडणार नाहीत, उलट त्या लढून हरल्याबद्दल एका हिरोचा तात्पुरता राजकीय अस्त अनुभवतील पण यातच त्यांच्या पुनरागमनाची बीजे दडलेली असतील, हे सांगणारे हे पत्र आहे. ममतांचे पत्र त्यांच्या राजकारणाच्या विस्तारणाऱ्या दिशेकडे अंगुलीनिर्देश करते आहे.

त्याही पेक्षा एक वेगळा अर्थ त्या पत्रात असू शकतो, तो म्हणजे काँग्रेसशी निवडणूकोत्तर समझोत्याचे दरवाजे त्यांनी स्वतःहून उघडले आहेत, हा… काँग्रेसपुढे मैत्रीचा हात पुढे करायचा की नाही, हे बंगालमधल्या पुढच्या राजकीय परिस्थितीवर ठरवायचे असले, तरी थेट सोनिया गांधींना पत्र लिहून ती शक्यता ममतांनी स्वतःहून सूचित केली आहे. पत्राच्या मायन्यात कोणा एका नेत्याचा उल्लेख नाही. पण पत्र लिहिल्याच्या बातमीत सोनिया गांधींचे नाव पहिले देण्यात आलेले आहे. ही सूचकता पुरेशी बोलकी आहे. बाकीची नावे सोनिया गांधी यांच्या पाठोपाठ ज्येष्ठताक्रमाने येतात. यात शरद पवारांचे नाव दुसरे आहे.

निकालांच्या अंदाजांचे पतंग जरी हवेत उंच उंच उडत असले, तरी राजकारण जमिनीवरूनच करावे लागते, हे ममतादीदी पूर्ण जाणून आहेत, हे या पत्राच्या मजकूरातील बिटविन द लाइन्समधून स्पष्ट दिसते. ममतांनी पत्रात राज्यघटना, संघराज्य पध्दती, केंद्र – राज्य संबंध यांवर दीर्घ नोट लिहिली आहे. तिच्यातल्या मूलभूत तत्त्वांवर सर्व विऱोधकांनी एकवटले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. हेच त्यांचे प्रतिपादन ममतांचा राज्याच्या कक्षेबाहेर पडण्याचा विचार दर्शविते.

काँग्रेसशी संबंधांचे दरवाजे खुले

त्याच बरोबर एक राजकीय व्यवहार पण दर्शविते… न जाणो उद्या निकाल लागून त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली, तर काँग्रेसला तिच्या ताकदीनुसार सत्तेत कमी – जास्त वाटा देऊन बंगालवर पुन्हा राज्य करता आले पाहिजे, याची तजवीजही ममतांनी या पत्राद्वारे केल्याचे दिसते.

डाव्यांबरोबर त्यांचे जमणार नाही आणि भाजप तर सध्या राजकीय शत्रू नंबर १ आहे त्यामुळे त्या पक्षाशी समझोता आत्ता होणार नाही. पण काँग्रेसचे तसे नाही. काँग्रेसशी राजकीय शत्रूत्व तयार होऊन १० वर्षे उलटून गेली आहेत. समझोत्याचे मार्ग दोन्ही पक्षांना मोकळे करवून घेण्याला हा उत्तम काळ आला आहे. सोनियांना पत्र लिहिण्यामागे ममतांचा हा देखील दूरचा विचार असू शकतो.

पत्राची एक वाट यूपीए चेअरपर्सनच्या पदापर्यंतही…

याखेरीज पत्राची एक वाट यूपीए चेअरपर्सनच्या पदापर्यंतही जाऊन पोहोचते, ही वाट धूसर आहे… पण महाराष्ट्रातल्या सिल्वर ओकच्या वाटेपेक्षा नक्कीच ठळक आणि स्पष्ट आहे, हे विसरता कामा नये. सिल्वर ओकची यूपीए चेअरमनशीपची महत्त्वाकांक्षा नेहमी उफाळून येत असते. संजय राऊतांच्या लेखणीतून आणि बाइटमधून ती वारंवार प्रकटही होते. पण ५ खासदारांच्या जोरावर मजल मारून – मारून किती मारणार??… आणि त्यांच्यावर विश्वास कोण ठेवणार…?? किंबहुना विश्वासाचा लाँगेस्ट डेफिसिट कसा भरून काढणार..??, या प्रश्नाच्या गुंत्यातच पाय अडकून सिल्वर ओकची यूपीए चेअरमनशीपची महत्त्वाकांक्षा वारंवार खाली पडत असते.

ममतांचे तसे नाही. तिथे विश्वासाचा डेफिसिट नाही. आहे, तो कणखरपणा आणि समोरून लढण्याची ताकद आणि हिंमत. दिल्लीहून अफजलखानाच्या फौजा सुटल्यात त्यांच्याशी लढायचेय वगैरे गर्जना महाराष्ट्रातूनही करण्यात आल्या होत्या. पण पण शेवटी त्यांचाही पाय ५० ते ६० जागांच्या उंबऱ्याच्या आतच अडकून पडला. आणि २०१४ मध्ये त्याच “अफजलखानी फौजांशी” समझोता करून मंत्रिमंडळात सहभागी व्हावे लागले होते.

ममतांचे राजकीय यश असले अर्धेमुर्धे कधीच नव्हते. होते ते थम्पिंग मेजॉरिटीचे आणि दमदार राजवटीचे. इथे ममतांची अकारण स्तुती करण्याचे प्रयोजन नाही किंवा त्यांच्या मुस्लिमधार्णिज्या राजकारणाचे समर्थन करण्याचा प्रश्न नाही. त्यांच्या राजकीय चूका झाकण्याचाही हा प्रयत्न नाही. पण त्यांनी गेल्या १० वर्षांमध्ये मिळविलेले राजकीय दमदार यश कसे दुर्लक्षित करता येईल…?? डाव्यांच्या पोलादी राजवटीशी समोरासमोर टक्कर घेऊन सलग दोन निवडणूकांमध्ये संपूर्ण बहुमत मिळविणे हे यश साधे आणि सोपे नाही. तसे यश ना मातोश्रीला मिळविता आले ना सिल्वर ओकला… सगळ्या पक्षांमध्ये मैत्री राखून, सध्या ज्येष्ठत्वाचा मान मिळवत राहण्यापलिकडे आणि त्याचे राजकीय भांडवल करण्यापलिकडे सिल्वर ओकचे यश गेले नाही.

या पार्श्वभूमीवर ममतांचे राजकीय यश लखलखते आहे… आणि विधानसभेच्या निवडणूकीत पराभव झाला, अगदी कितीही मोठा पराभव झाला, तरी तो समोरासमोर लढून झालेला पराभव आहे, म्हणून इतिहासात त्याची नोंद करण्याची संधी ममतांना प्राप्त होईल. ममतांच्या नेतृत्त्वाचे हे वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे, हे मान्यच करावे लागेल. त्यांची तुलना करायचीच झाली, तर तामिळनाडूच्या अम्मांशी करता येईल. सध्याच्या कुठल्याही मराठी नेत्याशी नाही.

… आणि म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे ममतांच्या पत्राची वाट यूपीए चेअरपर्सनच्या दिशेनेही जाऊ शकते. कारण सध्याच्या सर्व विरोधकांमध्ये भाजपचा कट्टर विरोधक म्हणून ममतांचाच चेहराच त्यातल्या त्यात उजळ आणि विश्वासार्ह आहे. निदान मध्यरात्री अहमदाबादेत दुसऱ्याच्या घरी जाऊन तिसऱ्याची भेट घेणाऱ्याचा तो चेहरा नाही. त्यामुळे एखाद दुसरा अपवाद वगळला, तर सर्व भाजपविरोधी नेते ममतांवर विश्वास ठेवू शकतात. कारण त्यांचा आत्तापर्यंतचा इतिहास तरी विश्वासघाताचा किंवा दगाबाजीचा नाही…!!

अर्थात, या सगळ्या ठोकताळ्यांचे २ मे नंतर काय होईल सांगता येत नाही. पण ममतांनी पत्र लिहून स्वतःच्या पुढच्या राजकीय वाटचालीची तजवीज करून ठेवली आहे, हे मात्र नक्की…!!

The Trinamool Congress chief MamataBanerjee sent the appeal to 15 non-BJP leaders including Congress chiefSonia Gandhi

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात