भारतातल्या तिसऱ्या आघाडीचा इतिहास; काँग्रेस – भाजप विरोधी गर्जनांचा, पण त्यांनीच टाकलेल्या सत्तेचे तुकडे चघळण्याचा…!!

तिसऱ्या आघाडीने भारतात कधी राजकीय जीवच धरलेला नाही. तिसऱ्या आघाडीचे हे वैशिष्ट्य राहिले आहे, की काँग्रेस आणि भाजप विरोधाची खुमखुमी येऊन ती अतिउत्साहात जन्माला घातली जाते पण थोड्याच दिवसांमध्ये तिचा बेवारस अवस्थेत राजकीय मृत्यू ओढवतो. तिला जन्माला घालणारे सगळे नेते तिच्याकडे दुर्लक्ष करतात. हे नेते अतिमहत्त्वाकांक्षी असतात, पण वकूबाने सामान्य असतात. ते काँग्रेस आणि भाजप विरोधात मोठ – मोठ्या गर्जना करतात. पण नंतर मागच्या दाराने तडजोड करून सत्तेचे तुकडे मिळवतात. गौतम अदानींच्या अहमदाबादच्या घरात गुप्तपणे अमित शहांना भेटणारे ज्येष्ठ नेते शरद पवार आज देशाच्या इतिहासात पाचव्यांदा की सहाव्यांदा तिसऱ्या आघाडीची मोट बांधताहेत. पवारांचा हा राष्ट्रमंच पुढची साडेतीन वर्षे तग धरेल…??sharad pawar`s Rashtra manch; the third front experiment not new in indian political history


ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज करीत असलेला राष्ट्रमंच नावाचा तिसऱ्या आघाडीचा प्रयोग अजिबात नवीन नाही. किंबहुना तिसरा मोर्चा हे काँग्रेस विरोधकांचे आणि भाजप विरोधकांचे कायमच गोड गुलाबी स्वप्न राहिले आहे. यामध्ये डॉ. राम मनोहर लोहियांच्या स्वप्नाळू समाजवाद्यांपासून ते आजच्या १०० टक्के राजकीय व्यवहारी शरद पवारांपर्यंत अनेक नेत्यांचा समावेश होतो.

काँग्रेस विरोधकांच्या आघाडीचे खरे जनक हे डॉ. राम मनोहर लोहिया. त्यांनी १९६७ मध्ये पहिल्यांदा असा प्रयोग केला. त्यावेळी समाजवादी पक्ष फुटून संयुक्त सोशलिस्ट आणि प्रजा सोशलिस्ट हे दोन पक्ष बनले होते. त्यांची ताकद उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात होती. जनसंघाची ताकद मध्य भारतात होती. कम्युनिस्टांची ताकद बंगालमध्ये तयार व्हायला लागली होती. लोहियांनी निवडणूक त़डजोड म्हणून १९६७ साली हा प्रयोग केला. तो केंद्रात यशस्वी झाला नाही. पण ९ राज्यांमध्ये काँग्रेस विरोधी सरकारे आली. ती संयुक्त विधायक दलांच्या नावाने. पण ही सरकारे जेमतेम वर्षभर देखील टिकू शकली नाहीत.१९७१ मध्ये देखील विरोधकांनी एकजूटीने काँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी संघटना काँग्रेस, संयुक्त सोशलिस्ट पार्टी, प्रजा सोशलिस्ट पार्टी, स्वतंत्र पार्टी आणि जनसंघाने एकत्र येऊन महाआघाडी स्थापन केली होती. तिचे नेतेही जबरदस्त होते. कामराज, अटलबिहारी वाजपेयी नेतृत्व करीत होते. पण इंदिरा गांधींनी या महाआघाडीला असा काही दणका दिला की त्यांना लोकसभेत फक्त ३८ जागा मिळाल्या आणि इंदिरा गांधींच्या काँग्रेसला ३५१…!!

पण त्यानंतर देखील हे प्रयोग होत राहिले. १९७८ च्या पुलोद प्रयोगाचे तर खुद्द शरद पवार हे जनक होते. पण त्याचे खरे श्रेय़ पवारांपेक्षा जनता पक्षाला जाते, की जो मूळातच चार पक्ष एकमेकांमध्ये विलीन होऊन तयार झाला होता. पण १९७७ च्या आणीबाणीनंतरच्या लोकसभा निवडणूकीत २७१ जागा मिळवून यशस्वी होऊन देखील हा प्रयोग अडीच वर्षांपेक्षा अधिक चालला नाही. शिवाय मोरारजी आणि चरणसिंग यांची सरकारे खऱ्या अर्थाने तिसऱ्या आघाडीची सरकार नव्हती. चरणसिंग सरकार तर इंदिरा गांधींच्या पाठिंब्यावर फक्त ५ महिने तरले. लोकसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचीही चरणसिंगांची हिंमत झाली नाही. या सरकारमध्ये यशवंतराव चव्हाण हे उपपंतप्रधान होते.

१९७९ – ८० साली ब्रह्मानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाणांनी रेड्डी काँग्रेसचा प्रयत्न करून पाहिला. पण इंदिरा गांधींपुढे त्यांची डाळ शिजली नाही. रेड्डी – चव्हाण हे नेते अस्तंगत झाले.

त्यानंतर राजीव गांधींच्या काळात १९८७ मध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांनी काँग्रेसमध्ये बंड करून जनमोर्चा काढला. त्यांनी आणि रामधन यांनी उत्तर प्रदेशात बुलेटवर फिरून हवा निर्माण केली. पण ही बुलेट जनता दलाला १९८९ मध्ये लोकसभेत १४३ जागांपर्यंतच नेऊ शकली. जनता दलाने विश्वनाथ प्रताप सिंग, एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे तीन पंतप्रधान दिले. पण ते वेगवेगळ्या काळामध्ये ३६५ दिवसांपेक्षा कमी टिकले.

विश्वनाथ प्रताप सिंग (१९८९ -१९९०, ३४३ दिवस) एच. डी. देवेगौडा (१९९६ – १९९७, ३२४ दिवस) आणि इंद्रकुमार गुजराल (१९९७ – १९९८, ३३२ दिवस) अशी जनता दलाच्या पंतप्रधानांची कारकीर्द राहिली आहे. ही म्हटली तर तिसऱ्या आघाडीची सरकारे होती. पण विश्वनाथ प्रताप सिंगांचे सरकार हे भाजपच्या आणि कम्युनिस्टांच्या आधारावर टिकले होते. तर देवेगौडा आणि गुजराल यांची सरकारे तर सीताराम केसरी या काँग्रेस अध्यक्षांच्या मेहेरबानीने टिकून पडली होती.

या अर्थाने तिसऱ्या आघाडीने भारतात कधी राजकीय जीवच धरलेला नाही. तिसऱ्या आघाडीचे हे वैशिष्ट्य राहिले आहे, की काँग्रेस विरोधाची खुमखुमी येऊन ती जन्माला अतिउत्साहात घातली जाते. पण थोड्याच दिवसांमध्ये तिचा बेवारस अवस्थेमध्ये राजकीय मृत्यू ओढवतो. तिला जन्माला घालणारे सगळे नेते तिच्याकडे दुर्लक्ष करतात. हे नेते अतिमहत्त्वाकांक्षी असतात. पण वकूबाने ते सामान्य असतात. ते काँग्रेस विऱोधात आणि भाजप विरोधात मोठ्या गर्जना करतात. पण नंतर मागच्या दाराने तडजोड करून सत्तेचे तुकडे मिळवतात. एखाद – दुसऱ्या यशाने ते हुरळतात आणि तशाच अपयशाने खचूनही जातात. त्यांच्यात फाटाफूट होते. पवारांच्या राष्ट्रमंचाचे भवितव्य याला अपवाद ठरेल का??, हा खरा प्रश्न आहे.

तिसऱ्या आघाडीचा इतिहास पाहिला की सिंहासन सिनेमातला एक डायलॉग आठवतो… मंत्री (श्रीकांत मोघे) हे मुख्यमंत्र्यांना (अरूण सरनाईक) सांगत असतात, “हे पाहा आबा, या सगळ्या असंतुष्टाचे एकमेकांशी थोडा थोडा वेळ पटते. पण एकदा का ते भांडायला लागले, की मग ते कोणी कोणाचेच राहात नाहीत.”

गौतम अदानींच्या अहमदाबादच्या घरात गुप्तपणे अमित शहांना भेटणारे ज्येष्ठ नेते शरद पवार आज देशाच्या इतिहासात पाचव्यांदा की सहाव्यांदा तिसऱ्या आघाडीची मोट बांधताहेत. तेव्हा हा इतिहास थोडा आठवला इतकेच…!!

sharad pawar`s Rashtra manch; the third front experiment not new in indian political history