संघ – काँग्रेस सहकार्याबद्दल सरदार पटेलांचे प्रयत्न; गोळवलकर गुरूजींच्या पुण्यतिथीनिमित्त दै. तरुण भारतच्या विशेषांकातून हाती लागलेला महत्त्वाचा दस्तऐवज


नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांची आज पुण्यतिथी या निमित्त एक महत्त्वाचा दस्तऐवज हाती लागला तो म्हणजे १९७४ मध्ये दै. तरुण भारतने काढलेला गोळवलकर गुरूजी श्रद्धांजली विशेषांक. जुनी पुस्तके जमविण्याच्या माझ्या छंदातून असाच रस्त्यावर हा विशेषांक जुन्या पुस्तकांच्या मांडलेल्या दुकानात मिळालेला… पण त्यातला कंटेट अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक. गुरूजींच्या निधनानंतर लगेच हा विशेषांक प्रसिद्ध केल्याने त्याचे संदर्भमूल्य मोठे आणि त्यातले लेखकही मोठे…!! RSS Chief Golwakar Guruji Punya smaran; RSS – Congress coporation efforts from sardar patel

पण आज चर्चा करणार आहे, ती त्यातल्या दोन – तीन महत्त्वाच्या संदर्भांची. संघ – काँग्रेस सहकार्याबद्दल सरदार वल्लभभाई पटेलांच्या प्रयत्नांची. बाकीच्या बऱ्याच आठवणी या विशेषांकात आहेत, अटलबिहारी वाजपेयींपासून ते बाबाराव भिडे यांच्यापर्यंत अनेकांनी गुरूजींचा सहवास अनुभवला होता. त्याच्या आठवणींचे प्रतिबिंब यात पडणे स्वाभाविक आहे. पण वर उल्लेख केलेला विषय विशेष राष्ट्रीय महत्त्वाचा आणि देशाच्या राजकारण आणि समाजकाराणला वळण देणारा ठरल्याने त्याची चर्चा आजच्या गुरूजींच्या स्मृतिदिनी करणे औचित्याचे ठरेल.

यातला संघ – काँग्रेस सहकार्याबद्दल सरदार पटेलांचे प्रयत्न या शीर्षकाचा लेख बेळगावचे कार्यकर्ते पुंडलिकजी कातगडे यांनी लिहिला आहे. हेच ते पुंडलिकजी कातगडे जे लोकमान्यांच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये त्यांची सरदारगृहात सेवा करीत होते. ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि कर्नाटक सिंह गंगाधरराव देशपांडे यांचे निकटवर्ती होते. त्यांनी संघ आणि काँग्रेस यांच्या सहकार्याबद्दल सरदार पटेलांच्या भूमिकेविषयी लिहिणे याला मोठे संदर्भमूल्य आहे, कारण यापैकी काही चर्चा – घटनांच्या वेळचे ते साक्षीदार होते.



संघ आणि काँग्रेस यांच्यात सक्रीय सहकार्य असावे, ही सरदार पटेलांची इच्छा होती. यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात यावेत यासाठी स्वतः पटेलांनी पुढाकार घेतला होता. यामध्ये त्यांनी गंगाधरराव देशपांडे आणि काँग्रेसचे अध्यक्ष पट्टाभी सितारामय्या यांना सहभागी करवून घेतले होते. एक प्रकारे ही अलिखित समितीच सरदार पटेलांनी नेमली होती. संघाच्या काही कार्यक्रमांमध्ये काँग्रेस नेत्यांनी सहभागी व्हावे, ही या नेत्यांची धारणा होती. त्याप्रमाणे सरदार पटेल हे संघाच्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

संघाच्या स्वयंसेवकांनी काँग्रेसमध्ये सामील व्हावे. काँग्रेस जिंकून दाखवून जनता आपल्याच पाठीशी आहे, हे सिध्द करावे, असे पटेलांना वाटत होते. या मुद्द्यावर चर्चेसाठी पटेल – गोळवलकर गुरूजी यांची दोन – तीनदा भेटही झाली होती.

संघाच्या कार्यक्रमात सलग तीन – चार दिवस प्रत्यक्ष सहभागी होऊन निरीक्षण करण्याची गंगाधरराव देशपांडे यांनी पुंडलिकजी कातगडेंना केली होती. त्याप्रमाणे ते सांगली जिल्ह्यातील माधवनगरमध्ये संघाच्या कार्यक्रमात सहभागी देखील झाले होते. त्याची सविस्तर माहिती पुंडलिकजींनी गंगाधरराव देशपांडे यांना दिली होती.

यानंतर पुण्यात संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांशी गंगाधरराव देशपांडे यांनी काही बैठका घेतल्या. काही संघ कार्यकर्त्यांशी गंगाधररावांचा पत्रव्यवहार झाला. त्यामध्ये संघ – काँग्रेस सहकार्यासंबंधी व्यापक आराखडा तयार करण्याचा विषय होता. त्याच वेळी बेळगावचे आणखी एक काँग्रेस नेते जीवनराव याळगी यांना गंगाधरराव देशपांडे यांनी संघाच्या दुसऱ्या कार्यक्रमांमध्ये पाठवून अहवाल मागविला होता. ते कार्यक्रमात सहभागी होणार होते. पण संघाने त्यांना एका कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणूनच बोलावले आणि ते त्यात सहभागी झाले.

या सगळ्या एकत्रित प्रयत्नांनंतर गंगाधरराव देशपांडे मुंबईला गेले. तेथील संघ कार्यकर्त्यांबरोबर बैठका घेतल्या. त्याचवेळी सरदार पटेलांचा देखील मुंबई दौरा होता. गंगाधरराव देशपांडे यांनी सरदार पटेलांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या सूचनांनुसार संघ – काँग्रेस सहकार्यासंबंधीच्या सर्व चर्चा – बैठकांची आणि आराखड्याची माहिती दिली.

सरदार पटेलांच्या पुढाकाराने संघ आणि काँग्रेस सहकार्याचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली होती. पण गांधी हत्या झाली आणि या प्रयत्नांना खीळ बसली. नंतर तो प्रयत्न सोडून देण्यात आला.

पण या सर्व प्रयत्नांचा संघबंदी उठविण्यासाठी खूप उपयोग झाला. सरदार पटेलांच्या आग्रहाने संघावरील बंदी उठविण्यात आली ही गोष्ट सर्वश्रूत आहे. पण या मागच्या कहाणीचे संघ – काँग्रेस सहकार्याचे पटेलांचे प्रयत्न हे अत्यंत महत्वाचे प्रकरण आहे. यावर गुरूजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुंडलिकजी कातगडे यांच्या लेखाच्या आधारे हा प्रकाश टाकण्याचा अल्पसा प्रयत्न.

RSS Chief Golwakar Guruji Punya smaran; RSS – Congress coporation efforts from sardar patel

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात