‘नेटफ्लिक्स’चे यश आणि कॉकटेल पार्टी इफेक्ट…


आमची कोणत्याही स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मशी स्पर्धा नाही. आमची जर खरंच कोणाशी स्पर्धा असेल तर ती केवळ आणि केवळ लोकांच्या झोपण्याशी आहे. हे नेटफ्लिक्सचे ब्रीद असे म्हण्टले तर वावगे ठरणार नाही.नेटफ्लिक्स बद्दल रंजक माहिती दिली आहे आमचे डिजिटल मिडिया तज्ञ विश्वनाथ गरूड यांनी… Netflix’s success and cocktail party effect 


 

सोनी पिक्चर्सने नुकताच आपल्या सर्व सिनेमांच्या ऑनलाईन स्ट्रिमिंगसाठी नेटफ्लिक्सशी करार केला. २०२२ पासून सोनी पिक्चर्सची निर्मिती असलेले सिनेमे मल्टिप्लेक्समधून निघाल्यावर थेट तुमच्या मोबाईलमधील नेटफ्लिक्सवर दिसू शकतील.

सध्या जगातील एकूण वेब ट्रॅफिकपैकी १५ टक्के एकट्या नेटफ्लिक्सकडे जाते. लॉकडाऊनमध्ये त्यात १२ टक्क्यांनी वाढच झाली होती.

नेटफ्लिक्सकडे सध्या २० कोटी ग्राहक आहेत.

नेटफ्लिक्सचे बाजारमूल्य २४६ अब्ज डॉलर इतके आहे

नेटफ्लिक्सकडे सध्या ५० हजारांहून अधिक टायटल्स (सिनेमे) आहेत.

ही झाली आपल्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी आकडेवारी. सध्याच्या जमाना आकडेवारीचा आहे. मग विषय कोरोना रुग्णांचा असू दे की एखाद्याच्या यशाचा. आकडे समजून घेतले पाहिजेत. अर्थात एखाद्या कंपनीच्या यशाच्या आकड्यांमागे लपलेले कष्ट, विचार करून घेतलेले निर्णय, दूरदृष्टीने केलेली गुंतवणूक या सगळ्याचा वाटा मोठा असतो. तसा तो नेटफ्लिक्सच्या यशातही आहेच.

मागे काही महिन्यांपूर्वी लिहिलेल्या एका लेखात मी नेटफ्लिक्सबद्दल लिहिन, असे म्हटले होते. गेल्या काही महिन्यांपासून या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचा अभ्यास करतोय. लॉकडाऊनमुळे वेळ मिळाल्याने नेटफ्लिक्सवर सिनेमे बघण्यासोबतच कंपनीच्या यशामागे काय दडलंय हे शोधण्याचा प्रयत्नही करतोय. खरंतर सध्या नेटफ्लिक्सची स्पर्धा कोणाशीच नाही. स्वतः नेटफ्लिक्सच म्हणते की, आमची कोणत्याही स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मशी स्पर्धा नाही. आमची जर खरंच कोणाशी स्पर्धा असेल तर ती केवळ आणि केवळ लोकांच्या झोपण्याशी आहे. याचा अर्थ सरळ आहे. जर लोक झोपले तर आणि तरच ते नेटफ्लिक्सवर येणार नाहीत.

आपल्याकडे पेपरवाले जसे आम्हीच सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र, असले हास्यास्पद आणि निरर्थक दावे करतात. तसलं काही नेटफ्लिक्सला करायचंच नाही. किती ग्राहक आहेत त्यापेक्षा असलेले ग्राहक किती वेळ नेटफ्लिक्सवर घालवतात हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि त्याच उद्देशाने नेटफ्लिक्सची रचना करण्यात आली आहे.

आता ग्राहकांनी जास्तीत जास्त वेळ नेटफ्लिक्सवर घालवला पाहिजे, हा उद्देश साध्य करण्यासाठी कंपनीने कॉकटेल पार्टी इफेक्टवर अधिक लक्ष दिले. हे कॉकटेल पार्टी इफेक्ट म्हणजे नक्की काय?

सध्याच्या काळात लोकांकडे वेळ कमी आहे. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्यासाठी उपयुक्त आहेत किंवा ज्यामध्ये आपल्याला इंट्रेस्ट आहे. तेवढ्याच गोष्टी बघण्याला किंवा वाचण्याला ते प्राधान्य देतात. यालाच कॉकटेल पार्टी इफेक्ट म्हणतात. लेखिका जेनिफर क्लाईनहेन्स हिने एका लेखामध्ये हे खूप सविस्तरपणे समजावून सांगितले आहे.

वृत्तपत्रांमध्ये लाखो रुपये देऊन पान पान भर जाहिरात देणारे जाहिरातदार बघितले की मला भयंकर हसायला येते. अशा जाहिरातींचा जमाना गेला. खूप कमी वाचक अशा जाहिरातींना आता प्रतिसाद देतात. जाहिरातदारांना आपल्या जाहिरातींच्या माध्यमातून चांगले लीड्स हवे असतील तर त्यांनाही कॉकटेल पार्टी इफेक्टकडे वळलेच पाहिजे. पण हे बिचाऱ्या जाहिरातदारांच्या लक्षात कधी येईल देव जाणे. असो विषय नेटफ्लिक्सच्या कॉकटेल पार्टी इफेक्टचा आहे.

नेटफ्लिक्सने या कॉकटेल पार्टी इफेक्टचा परिणामकारक वापर करून घेतला आहे. नेटफ्लिक्सवर गेल्यावर तुम्ही तुमचे प्रोफाईल नेम सेट करता. त्यानंतर तुम्ही आवडलेले सिनेमे बघता. तुम्ही कोणते सिनेमे बघता हे लक्षात ठेवून त्यानंतर तुम्हाला त्याच पद्धतीच्या सिनेमांची पोस्टर दाखवली जातात. जेणेकरून तुम्हाला पुढचा सिनेमा कोणता बघायचा आहे हे शोधणे सोप्पे होते. नेटफ्लिक्सकडे हजारो सिनेमे आहेत. पण त्यातून बघण्यासाठी सिनेमा निवडणे वाटते तितके सोप्पे नाही. समोर खूप पर्याय दिसत असतील तर आपल्या मनाची अनेकवेळा द्विधा मनःस्थिती होते. हे निवडू की ते, असे होऊन बसते. यासाठीच तुम्ही संपूर्णपणे बघितलेले सिनेमे कोणते, तो सिनेमा सलग एका बैठकीत पूर्ण केला की त्यासाठी जास्त वेळ घेतला या सगळ्याचा अंदाज लावून त्यानंतर तुम्हाला सिनेमे सुचविले जातात. यालाच ते नेटफ्लिक्स रेकमेंडेशन इंजिन म्हणतात.

बिकॉज यू वॉच या कॅटेगरीच्या माध्यमातून ग्राहकांना काही सिनेमे सुचविले जातात. गेल्या दोन वर्षांत केलेल्या एका अभ्यासानुसार, नेटफ्लिक्सची बिकॉज यू वॉच कॅटेगरी यशस्वी झाली आहे. नेटफ्लिक्सवरील ८० टक्के ग्राहक बिकॉज यू वॉच याच कॅटेगरीत सुचविलेले सिनेमे किंवा इतर निर्मिती बघण्याला प्राधान्य देतात, असे दिसून आले आहे.

याच कॉकटेल पार्टी इफेक्टसाठी नेटफ्लिक्स आपल्याकडील सिनेमांच्या थम्बनेल इमेजवरही खूप काम करते. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण नेटफ्लिक्सवर खूप कमी वेळा एकाच सिनेमाची एकच थम्बनेल इमेज जगातील सगळ्या ग्राहकांना दाखविली जाते. प्रत्येक देशातील लोकांची मानसिकता, त्याची टेस्ट समजून घेऊन त्यांना त्या पद्धतीने सिनेमाची वेगवेगळी थम्बनेल इमेज दाखविली जाते. त्याचबरोबर थम्बनेल इमेजवरील फोटोही खूप विचारपूर्वक आणि अभ्यासकरून निवडले जातात. त्याचाही फायदा नेटफ्लिक्सला होतोच. युट्यूबसाठी व्हिडिओ करताना थम्बनेल इमेजचा खूप फायदा होतो, याचा अनुभव मी स्वतःही अनेकवेळा घेतला आहे.

लोकांची झोप आणि वेळ हेच आपले खरे स्पर्धक आहेत बाकी स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यांच्याशी आपलीच स्पर्धाच नाही, असे मानणारेच अशा पद्धतीने संशोधन करू शकतात आणि ग्राहकांचा विचार करून त्यांना सेवा देऊ शकतात. म्हणूनच नेटफ्लिक्स ग्रेट आहे…

(फोटो इंटरनेटवरून साभार)

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात