महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजारपण वैद्यकीय पेक्षा राजकीय कारणांनी अधिक गाजत आहे. मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाची खुद्द त्यांच्या पेक्षा आणि त्यांच्या कुटुंबियांपेक्षा बाकीच्या नेत्यांना खूप मोठी “चिंता” लागून राहिली आहे…!! Lalu – Rabdidevi will Uddhav Thackeray handover charge of CM to Rashmi Thackeray
या चिंतेमध्ये अधून मधून महाराष्ट्राचा कारभार, महाराष्ट्राच्या जनतेचे हित हे मुद्देही डोकावत आहेत. पण प्रमुख मुद्दा असा असतो की मुख्यमंत्री आजारी असल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार यांनी इतर जेष्ठ मंत्र्यांकडे सोपवावा किंवा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांवर विश्वास नसल्यास आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवावा आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही विश्वास नसल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन ज्येष्ठ मंत्री या नात्याने त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपावावा…!!
पण ही सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी करून आठवडा लोटला आहे. तरी आज या सूचनेची पुनरावृत्ती शिवसेनेचेच मंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याने मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाची आणि कार्यभार इतरांकडे सोपवण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू झाली आहे. मेनस्ट्रीम मीडियाने याच्या बातम्या जरूर दिल्या आहेत.
पण या मीडियाकडून निसटलेला एक मुद्दा इथे आवर्जून नमूद करावासा वाटतो, 1990 च्या दशकात बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर जेव्हा चारा घोटाळ्याचे आरोप होऊन त्यांची तुरुंगात जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या कोणत्याही वरिष्ठ मंत्र्यांवर विश्वास न ठेवता सरळ आपल्या पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री करून ते मोकळे झाले. त्यावेळी इंग्रजी प्रसार माध्यमांनी लालूप्रसाद यांची प्रचंड खिल्ली उडवली होती. त्यावेळची टाइम्स ऑफ इंडिया मधली आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे खूप गाजली होती. त्या सगळ्यांचा सूर लालूप्रसाद सगळी सत्ता आपल्याच घरात कशी एकवटत ठेवत आहेत, अशा टीकेचा होता.
पण आज याच्या उलट परिस्थिती महाराष्ट्रात दिसत आहे. मुख्यमंत्री स्वतःला आजारी न समजता घरातूनच कार्यभार सांभाळत आहेत. ऑनलाइन बैठका घेऊन मंत्र्यांना – अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. पण विरोधी पक्षांचे प्रमुख नेते आणि आता त्यांच्या सरकार मधले मंत्री स्वतःहून मुख्यमंत्र्यांना “लालू – राबडी प्रयोग” महाराष्ट्रात राबवण्याची सूचना करत आहेत…!!
त्यावेळी लालुप्रसाद यादव यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आपल्या पत्नीला दिल्याबद्दल देशभरातून टीका झाली आणि आज महाराष्ट्रात स्वतःहून विरोधकच मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सत्तासूत्रे सोपवण्याच्या सूचना करत आहेत. यात त्यावेळी बिहारचे हित नेमके काय साधले गेले? हे माहीत नाही. पण बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या हातातून सत्ता जेव्हा निसटली त्यावेळी ते मुख्यमंत्री नव्हते, तर राबडीदेवी या मुख्यमंत्री होत्या. हा मुद्दा येथे आवर्जून अधोरेखित करावासा वाटतो.
महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांवर लालूप्रसाद यादव यांच्यासारखे भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. (म्हणजे आरोप म्हणजे आरोप आहेत, पण त्यांच्याविरुद्ध खटला दाखल होऊन त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झालेली नाही.) त्यामुळे त्यांच्यावर सत्तासूत्रे आपल्या पत्नी रश्मी ठाकरे किंवा अन्य कोणत्याही ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवण्याचे अजिबात बंधन नाही. पण तरी देखील विरोधक स्वतःहून मुख्यमंत्र्यांना त्यांच्या स्वतःच्या घरात सत्ता एकवटण्याची मुभा द्यायला तयार आहेत. यातून विरोधी नेत्यांना नेमके काय सुचवायचे आहे…?? आणि त्यामध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आणि मंत्री झालेले अब्दुल सत्तार चंद्रकांत दादा पाटील यांच्या सुरात सूर मिसळून नेमके काय साध्य करू इच्छित आहेत?? हा प्रश्न मात्र गूढ आणि गंभीर आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App