गोव्याचा सांगावा आणि ममतांचा संदेश!!

“गोव्याचा सांगावा आणि ममतांचा संदेश” हे शीर्षक वाचून कोणालाही संबंधित विषय हा फक्त गोवा विधानसभा निवडणूकीपुरता मर्यादित आहे, असे वाटेल. परंतु ते तसे नाही. गोव्याचा सांगावा हा वेगळा विषय आहे आणि ममतांचा संदेश हा वेगळा विषय आहे. तरी देखील त्यात एक विशिष्ट राजकीय सूत्रही दडलेले आहे. goa election update mamata banerjee and sharad pawar

गोव्यातला सांगावा हा काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना धाडला आहे. म्हणजे गोव्यात ज्याप्रकारे काँग्रेस पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना पक्षांच्या महाविकास आघाडीच्या प्रस्तावाला धुडकावले त्यातून दोन्ही पक्षांना तुम्ही महाराष्ट्रापुरते मर्यादित प्रादेशिक पक्ष आहात हा सांगावा आपल्या राजकीय कृतीतून धाडला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष गोव्यात राजकीय दृष्ट्या शिरकाव करण्यासाठी काँग्रेसच्या गोटात शिरून यांचा सत्तेतला वाटा ओढून घेऊ इच्छित होते. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे नेते कितीही मुरब्बी असले तरी काँग्रेस पक्षाचे नेते या दोन्ही पक्षांचे बारसे जेवले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा गोव्याच्या राजकारणात अजिबातच स्थान असलेल्या पक्षांना तथाकथित महाविकास आघाडीच्या रूपाने काँग्रेस नेते चंचूप्रवेश तरी का करू देतील?, हा प्रश्नच होता. काँग्रेसने दोन्ही पक्षांना महाविकास आघाडीत स्थान दिले नाही. महाराष्ट्रात जरी काँग्रेसने महाविकास आघाडीत तिय्यम स्थान स्वीकारले असले तरी काँग्रेस मुळात राष्ट्रीय पक्ष आहे. अनेक राज्यांमध्ये राजकारण खेळवण्याचा त्यांचा अनुभव शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रादेशिक पक्षांपेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे काँग्रेस नेते झुकतील ही सुतराम शक्यता नव्हती.


अखिलेश यादवांची राजकीय चतुराई; ट्विटर हँडलवर मोदी – ममतांच्या लोकप्रिय घोषणांचे प्रतिबिंब!!


 

कांग्रेस गोव्यात महाविकास आघाडी करतच नाही हे पाहून आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर आगपाखड केली आहे. आमच्या मदतीशिवाय कॉंग्रेस गोव्यात एकही जागा जिंकू शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे पण या दाव्यातला फोलपणा त्यांना पुरता माहिती आहे.

एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गोव्यातील निवडणुकीसाठी असा धडपडाट सुरू असताना दुसरीकडे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र राजकीय चतुराई दाखवत अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशात बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला आहे. तृणमूल काँग्रेस शक्तीशाली असली तरी उत्तर प्रदेशात निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय त्यांनी घेतला आहे. या निर्णयातून त्यांनी अखिलेश यादव यांचे मन जिंकले आहे. अखिलेश यादव यांच्या समवेत 8 फेब्रुवारीला संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. ममता बॅनर्जी यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा मोठी आहे. या महत्त्वाकांक्षेत कुठलेही प्रादेशिक अडथळे त्यांना नको आहेत आणि यासाठीच अखिलेश यादव यांच्यासारख्या मोहरा आपल्या हाताशी असावा यादृष्टीने त्यांनी उत्तर प्रदेशात तृणमूल काँग्रेस निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. ही राजकीय चतुराई राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना किंवा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखवता आलेली नाही.

शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची गोव्यातली ओळख डिपॉझिट जप्त होणारे पक्ष अशी आहे. अशा स्थितीत इथे निवडणूक लढवून हाती काय लागणार हा खरा प्रश्न आहे. तरी देखील हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरून हात दाखवून अवलक्षण करून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर ममतांची राजकीय चाल ठळकपणे उठून दिसणारी आहे… आणि इथेच शरद पवार उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातला मूलभूत राजकीय फरक दिसून येत आहे…!!

goa election update mamata banerjee and sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या