सतत जजमेंटल होवू नका

प्रभावी श्रवण कौशल्य अंगी बाणवायचे असेल तर जजमेंटल होऊन चालत नाही. बरेचजण समोरच्याचं ऐकून घेताना लक्षपूर्वक ऐकतात, प्रोत्साहन पण देतात, मात्र जजमेंटल होतात आणि मला तुझ्यापेक्षा खूप माहिती आहे अशी जाणीव करून देतात. खरा ऐकणारा जोपर्यंत पूर्ण ऐकून घेत नाही तोपर्यत मान्य किंवा अमान्य या निष्कर्षाला कधीच पोचत नाही. सांगण्याची व ऐकण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याचा एक क्षण असतो तो गाठता यायला हवा किंवा पकडता यायला हवा. यासाठी समोरच्याला बोलू द्यायला हवे, आपल्या संवादातील अनेक कृतीतून प्रोत्साहन देणे सहज शक्य आहे. Don’t be constantly judgmental

आपण जेव्हा ऐकत असतो तेव्हा बोलणारा व्यक्ती जी भाषा वापरतो किंवा जे काही सांगत असतो ते नेहमीच व्यवस्थित व मुद्देसूद असेलच याची खात्री नसते. काही जण बोलताना सिक्वेन्स सुद्धा चुकवतात. प्रत्येक जण आपापल्या परीने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ऐकणाराची जबाबदारी अशा वेळी वाढते. त्याला ऐकण्यातून संगती लावावी लागते. यालाच संक्षेप म्हणतात. ऐकणारा अनेकदा यासाठी आवश्यक तेव्हा बोलणाऱ्याकडून येणारे मुद्दे विश्लेषित करून एखादा प्रश्न विचारू शकतो. असे करण्याचा श्रोत्याला एक फायदा असतो. तो म्हणजे पुढील संभाषणाची प्रगती तपासण्याची संधी मिळते, मुख्य मुद्यांचा पुनरुच्चार होतो, आणि महत्वाचे मुद्दे एकत्र करता येतात. या प्रक्रिया निमिषार्धात घडत असतात. म्हणून ऐकत असताना एव्हढं सगळं कसं करणार? असा भाबडा प्रश्न स्वतःला विचारण्याची खरंच आवश्यकता नाही.

आपण जाणीवपूर्वक अवलोकन केले तर सामान्यपणे संवादात हे टप्पे घडत असतातच हे आपल्या लक्षात येईल. या टप्प्यांना अधिक जागृत अवस्थेत नियंत्रित केले तर प्रभावी श्रवण व त्याद्वारे होणाऱ्या चांगल्या परिणामांचा आपण आनंद घेऊ शकतो.

Don’t be constantly judgmental