खरी लोकशाही तर काँग्रेसमध्ये आली आहे…!!

होय… काँग्रेसमध्ये खरी लोकशाही आली आहे. असा दावा करण्यास वाव आहे… काँग्रेस नेतृत्वावर सवाल खडे केले जाताहेत… पण नेतृत्वाकडून चकार शब्द काढला जातोय का सवालकर्त्यांवर आणि त्यांच्या सवालांवर…!! हे लोकशाहीचे लक्षण नाही तर दुसरे काय आहे…??

विनायक ढेरे

खरी लोकशाही तर काँग्रेसमध्ये आली आहे…!! हे शीर्षक वाचून बऱ्याच जणांची सटकेल… लोकशाही आणि काँग्रेसमध्ये… कसे शक्य आहे?… काही तरी खोटे बोलताहेत… पण नाही… खरेच काँग्रेसमध्ये लोकशाही आली आहे, असेच वातावरण गेल्या चार – पाच महिन्यांपासून जाणवायला लागले आहे.

साधारण या चार – पाच महिन्यांपासूनचा काँग्रेस पक्षातला घटनाक्रम पाहिला असता याची तर खात्रीच पटेल. याची सुरवात कपिल सिब्बलांपासून करावी लागेल. त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर एक दोन नव्हे, तर तब्बल २३ नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून सवाल खडे केले. नेतृत्व बदलाचे वेगवेगळ्या भाषा वापरून आग्रह झाले. त्याच्या बातम्या पेरण्यात आल्या. गाजविण्यात आल्या. काँग्रेसचे नेतृत्व कधी बदलणार या प्रश्नाचे गुऱ्हाळ तर उसाच्या गुऱ्हाळापेक्षा जास्त फिरविण्यात आले… पण हे सगळे करणारे नेते, पत्रकार हे विसरले की पत्र लिहिणाऱ्या किती नेत्यांवर काँग्रेसच्या नेतृत्वाने कारवाई केली…?? उलट काही अपवाद वगळता सगळ्यांचे ऐकून घेतले गेले ना…

हा आता त्या २३ नेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर काय “कार्यवाही” झाली… हा प्रश्न उपस्थित करता येऊ शकतो… झाली नसेल तशी “कार्यवाही”… पण पक्ष नेतृत्वावर सवाल खडे करणाऱ्या २३ पैकी एकाही नेत्यावर “कारवाई” देखील झालेली नाही ही राजकीय वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारून चालणार नाही.

२०१४ पूर्वीची काँग्रेस आठवून पाहा… त्या वेळी झाली असती का कोणाची पक्ष नेतृत्वावर सवाल खडे करण्याची हिंमत…?? आणि कोणी हिंमतच केली असती तर त्याची पक्षातून गच्छंती झाल्याशिवाय राहिली असती का…?? विचारा जरा सोनियांच्या परदेशी जन्माच्या मुद्द्यावर पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना… त्यांचे पक्षात पुढे काय झाले…??, हा नजीकचा इतिहास माहिती नाही का पत्रकारांना… त्यावेळी सगळ्यात ज्येष्ठ नेते काढले होते की नाही पक्षाबाहेर… त्यावेळी तिघे होते… आता २३ आहेत… पण झाली का कारवाई एकावर तरी??… मग काँग्रेसमध्ये लोकशाही नाही आली तर दुसरे काय म्हणायचे याला…??

त्या तेवीसांनी जशी पक्ष नेतृत्वावर सवाल खडे करायची उचल खाल्ली तशी चढाओढच लागली पक्षात वेगवेगळ्या मार्गाने पक्ष नेतृत्वाला पिंजऱ्यात उभे करण्याची… यात पक्षाबाहेर असलेले शरद पवारही मागे राहिले नाहीत. त्यांनीही बाहेर राहुन राहुल गांधींना “सातत्यहीन” म्हणून घेतले. त्या “सातत्यहीन” नेतृत्वाच्या पक्षाचा पाठिंबा त्यांना चालतो महाराष्ट्रात हा भाग अलहिदा… तो पवारांना शोभेसा देखील आहे.

पण त्या पलिकडे जाऊन शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जणू १९९९ च्या सगळ्या घटनाक्रमाचा राजकीय सूड उगविण्यात आला. पवारांच्या नेतृत्वाच्या गुणगानाच्या बरोबरीने किंबहुना अधिकच काँग्रेस नेतृत्वाच्या उणीवांकडे बोटे दाखविण्यात आली… पण एवढे होऊनही काँग्रेसच्या नेतृत्वाने चकार शब्द तरी काढला त्यावर?? की काही प्रत्युत्तर तरी दिले का त्यांना…?? महाराष्ट्रातल्या सत्तेच्या पिंजऱ्यात राष्ट्रवादीच्या पोपटाचा प्राण आहे. पण पाठिंबा काढून घेऊन काँग्रेस नेतृत्वाने केले त्या सत्तारूपी पोपटाचे प्राणहरण…?? काँग्रेस नेतृत्वाने केल्या ना पवार कँपमधल्या सगळ्या दुगाण्या सहन…यालाही काँग्रेसमध्ये लोकशाही आली असे म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणायचे…!!

पवार कँप कमी पडला म्हणून की काय दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या आगामी आत्मचरित्रातून “वेचक निवडक” भाग माध्यमांमध्ये छापण्यात आला. त्यावर लाइव्हपासून ड्रायपर्यंत सगळ्या चर्चा झडविल्या गेल्या. अगदी मुखर्जी बहिण – भावंडांच्या वादापर्यंत बातम्या छापल्या. चर्चा घडविल्या. यात टार्गेट कोण… तर काँग्रेसचे नेतृत्व… पण काँग्रेस नेतृत्वाने काढला का तरी चकार शब्द त्यावर…?? वास्तविक प्रणवदांच्या मुलाला खासदार केले. मुलीला आमदारकीचे तिकीट दिले… तरीही काँग्रेस नेतृत्वच आरोपीच्या पिंजऱ्यात… एवढे होऊनही काँग्रेस नेतृत्व काढतेय का त्यांच्याविरोधात एक चकार शब्द…??

बरं… आणखी एक मुद्दा… जेवढे म्हणून नेते आधी – आत्ता आणि नंतर काँग्रेसच्या नेतृत्वावर सवाल खडे करताहेत किंवा केले आहेत, त्यांनी कधी खरा पुढाकार घेतला होता हो काँग्रसचे नेतृत्व करण्याचा…?? त्यांच्यापैकी किती नेत्यांमध्ये संपूर्ण भारतभराचे अपील ठरेल असा करिष्माई चेहरा होता…?? की जे स्वतःच्या प्रतिभेच्या आणि प्रतिमेच्या बळावर काँग्रेसची नौका निवडणुकीतील यशाच्या गंगेच्या पार नेतील…!! काँग्रेस नेतृत्वावर बाहेर पडून दुसऱ्याला लेख लिहायला लावून सवाल खडे करणारे एक नेते… प्रादेशिक वकुबाचे… ५ ते ९ खासदारांच्या रेंजमध्ये खेळणारे…!! बाकीचे २३ नेते… बहुतेक राज्यसभेचे मेंबर… बोलायला एक नंबर… पण राजकीय कर्तृत्वाचे काय…?? त्यांच्या पैकी कितीजण काँग्रेसला निवडणुकीच्या मैदानात जिंकून दाखवतील…?? आहे उत्तर… असले तर द्या…!!

… आणि तरीही म्हणायचे नाही का… काँग्रेसमध्ये लोकशाही आली नाही म्हणून… व्वा… असे कसे…!! आम्ही म्हणणार की खरी लोकशाही तर काँग्रेसमध्ये आहे म्हणून… कारण हे नेतृत्व प्रादेशिक वकुबाच्या नेत्यांच्या दुगाण्या ऐकून घेतेय आणि त्यांच्यावर परिणामकारक कारवाई करत नाही म्हणून…!!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*