सारसार बुद्धीला नेहमी जपा

प्रत्येकाच्या जीवनात आई, वडील, बहीण, भाऊ, बायको, मुलें, धंद्यांतील सहकारी मित्र व शत्रू अशा वेगवेगळया व्यक्तींशीं वेगवेगळे संबंध येतात. प्रत्येक व्यक्तीशीं असलेल्या संबंधाला उचित असे वर्तन त्याला या व्यक्तीशीं करावें लागतें. हे औचित्याचे धोरण जो योग्य रीतीने सांभाळतो त्याला व्यवहारांतल्या भाषेत शहाणा किंवा हुशार म्हणतात, व ज्याला हे धोरण राखतां येत नाही तो वेडा ठरतो. शास्त्रीय परिभाषेत बोलावयाचे तर पहिल्या मनुष्याचा व्यक्तिकेंद्र संघटित असतो व दुसर्यारचा शिथिल असतो असे म्हणतां येईल. Always guard your intellect

त्याच्या डोक्याचा स्क्रू ढिला आहे असे एखाद्या विमनस्क माणसाचे वर्णन केल्याचे आपण ऐकतो. जीवनचरित्रात ज्या गोष्टीशी आपला संबंध येतो त्यांना योग्य व रास्त किंमत देण्याची हातोटी किंवा अटकळ निरोगी अविकृत मनाला साधलेली असते. तिचा नाश झाला की, मन रोगी किंवा नादुरुस्त होते. जीवनाला आवश्यक असणार्यास गोष्टींच्या किंमतीचे समतोलन करण्याची शक्तिलाच सारासार बुद्धि असे नांव आहे. हे निरोगी मनाचे मुख्य लक्षण आहे. ही शक्ति थोडीशी कमी झाली तरी मनाचें आरोग्य बिघडले असे म्हणण्यास हरकत नाहीं. घर, कपडे, पैसा, मानमरातब यांपैकी प्रत्येकाकडे जितके आवश्यक त्याहून अधिक लक्ष देऊ लागल्यास त्याला घराचे, कपडयाचे किंवा पैशाचे वेड लागले असे आपण व्यावहारिक भाषेत बोलतो त्याचे मर्म हेंच आहे. परंतु एखाद्या गोष्टीकडे वाजवीपेक्षा जास्त लक्ष पुरवीत असला तरी जोपर्यंत बाकीच्या गोष्टी त्याच्या विचाराच्या कक्षेतून पार निघून जात नाहीत व म्हणून त्याच्या व्यवहाराला म्हणण्यासारखा बाध येत नाही तोपर्यंत त्याची शहाण्या माणसांतच साधारण गणना होत असते. परंतु एकदा का तो कोणत्याहि एकाच गोष्टीचा अनन्यभावाने निदिघ्यास करू लागला की, तो वेडा ठरतो.

परंतु वेड जसे वाईट गोष्टींचे असूं शकेल, तसे ते चांगल्या गोष्टींचेहि असू शकेल. पुस्तकांचे, व्यायामाचे किंवा परमेश्वराचे वेड. याचा तरतम विचार करून प्रत्येकाने आपल्यात चांगल्या गोष्टींची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. त्याचा मेंदूच्या विकासाला फार मोठा उपयोग होतो.

Always guard your intellect