प्रमोद महाजन यांना आठवताना….


प्रमोद महाजन यांचा स्मृतिदिन काल झाला. आज संपूर्ण देशावर कोरोना व्हायरसचे संकट असताना त्यांची आठवण विशेषत्वाने येते. याचे कारण म्हणजे राजकीय विचारप्रणालीच्या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र आणण्यात प्रमोद महाजन यांचा हातखंडा होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना संकटमोचक म्हणून ओळखले जायचे. आज जेव्हा राजकीय वातावरण दूषीत बनले आहे त्यावेळी महाजन यांनी शिष्टाईने चीनी व्हायरस विरोधात लढण्यासाठी नक्कीच एकत्र आणले असते.


अभिजित विश्वनाथ, नवी दिल्ली

प्रमोद महाजन यांचा स्मृतिदिन काल झाला. आज संपूर्ण देशावर कोरोना व्हायरसचे संकट असताना त्यांची आठवण विशेषत्वाने येते. याचे कारण म्हणजे राजकीय विचारप्रणालीच्या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र आणण्यात प्रमोद महाजन यांचा हातखंडा होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना संकटमोचक म्हणून ओळखले जायचे. आज जेव्हा राजकीय वातावरण दूषीत बनले आहे त्यावेळी महाजन यांनी शिष्टाईने चीनी व्हायरस विरोधात लढण्यासाठी नक्कीच एकत्र आणले असते.

प्रमोद महाजन यांचे विशेष म्हणजे त्यांनी कायमच संवादाची भूमिका ठेवली. कोणत्याही मुद्यावर वाद घालत बसण्यापेक्षा स्वत:च्या प्रभावी सहभागाने समस्या सोडविण्यावर त्यांचा भर असायचा. याचे उदाहरण म्हणजे भारताचे मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी तयार केले. तत्कालिन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडे राष्ट्रपतीपदासाठी बहुमत नव्हते. त्यामुळे निवडणूक होणे इष्ट नव्हते. या वेळी सर्वसंमतीचा उमेदवार असणे गरजेचे होते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विश्वासू दूत म्हणून प्रमोद महाजन चेन्नईला गेले. त्यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपतीपदासाठी तयार केले. यातील राजकारण वगळले तर कलाम यांच्यामुळे भारताची मान जगात ताठ झाली.

मराठवाड्यातील अंबेजोगाईसारख्या ग्रामीण भागात जन्मलेले महाजन यांनी दिल्लीपर्यंत भरारी घेतली. आजही महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्ली स्वीकारत नाही किंवा पचत नाही असे म्हटले जाते. परंतु, महाजन यांनी दिल्लीतील राजकारणाला वेगळे आयाम दिले. निवडणूक रणनिती असो की वॉर रुमची कल्पना, अत्यंत कल्पकतेने त्यांनी राजकारण केले. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांशी आपला संपर्क त्यांनी कधीही तुटू दिला नाही. त्यांच्या भाषणाची मजाच काही और होती. अत्यंत मर्मविनोदी भाषण करताना विरोधकांच्या मर्मावर ते घाव घालायचे. त्यांचा प्रतिवाद करणे सोपे नव्हते. त्यांच्या भाषणात एक प्रकारचा गोडवा होता. सगळे संदर्भ मुखोद्गत असल्याने त्यांना कधी कागदाची गरज पडायची नाही.

प्रमोद महाजन यांच्यात असलेली उर्जा आणि उत्तम वक्तृत्वकला स्व. वसंतराव भागवत यांनी ओळखली. त्यांनीच महाजनांना राजकीय प्रवाहात आणले. १९८० साली भाजप ची स्थापना झाली आणि प्रमोद महाजन प्रदेश सरचिटणीस पद सांभाळले.

महाजन यांचे नाव घेतलेल्यावर गोपीनाथ मुंडे यांचे नाव आपोआपच येते. या दोघांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली. ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाला पोहोचविण्याचे खरे श्रेय मुंडे-महाजन या जोडीकडेच जाते. मराठवाडा, विदर्भ ठिक आहे; पण पश्चिम महाराष्ट्रात जेथे अनेक ठिकाणी पाय ठेवायलाही कार्यकर्ता नाही त्या भागातही या दोघांनी पक्ष पाहोचविला. महाराष्ट्राच्या राजकारणात कॉँग्रेसला हरवायचे असेल तर शिवसेनेसारख्या समविचारी पक्षाशी युती करण्याची गरज पहिल्यांदा प्रमोद महाजन यांनीच ओळखली. त्यामुळे त्यांना युतीचे शिलेदारही म्हटले जाते. १९९५ च्या विधानसभा निवडणूकीत बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांच्या प्रचाराच्या झंजावतामुळे राज्यात पहिल्यांदा युतीचे सरकार आले.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी महाजन यांचे वेगळेच ऋणानुबंध होते. त्यामुळे युतीमध्ये कधीही ताण निर्माण झाला की महाजन बाळासाहेबांची भेट घ्यायचे आणि सगळे ताण हलके व्हायचे.

महाजनांनी स्वत:ला महाराष्ट्रापुरते मर्यादित कधीच केले नाही. त्यामुळे लाल कृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेचे सर्व नियोजन त्यांनी केले. त्यांनीच ही कल्पना मांडली आणि या यात्रेचे पडद्याआडून सारथ्य केले. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे तत्कालिन राष्ट्रीय अध्यक्ष मुरलीमनोहर जोशी यांच्या एकता यात्रेचे शिल्पकार महाजनच होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे तर ते मानसपुत्रच होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षातील तीनही मोठ्या नेत्यांचे सारखेच प्रेम मिळविणारा त्यांच्यासारखा नेता विरळच होता. त्यामुळेच अटल वाजपेयींनंतर कोण? असा प्रश्न निर्माण होताच दोनच नावे समोर यायची ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन.

प्रमोद महाजनांनी भाजपला एक वैचारीक चौकट दिली. वाजपेयी सरकार मध्ये त्यांनी संसदीय कामकाज मंत्री म्हणून उल्लेखणीय कामगिरी केली. माहिती आणि प्रसारण मंत्री पदाच्या कार्यकाळात देशात दुरदर्शन केंद्रांचा विस्तार झाला. देशाचे पहिले माहिती तंत्रज्ञान मंत्री होण्याचा त्यांना मान मिळाला. त्याच काळात त्यांनी जगात भारताला आयटी क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. त्यांनी देशात पहिल्यांदा मोबाईल सेवेचा शुभारंभ केला. म्हणूनच त्यांना मोबाईल क्रांती चे जनक म्हणले जाते.

दुर्दैवी घटनेत महाजन यांचा मृत्यू झाला नसता तर…कदाचित देशाला पहिला मराठी पंतप्रधान प्रमोद महाजन यांच्या रुपाने लाभला असता. महाराष्ट्राचा गौरव झाला असता.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था