प्रतिनिधी
मुंबई – ठाकरे – पवार सरकारमधील राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या १२७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची कागल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होत नाही, तोवर त्यांची चौकशी होऊ शकत नाही, त्यामुळे आज जमले नाही तरी पुन्हा मला कोल्हापुरात यावेच लागेल, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कराडमध्ये दिला होता. आता त्याची ते अंमलबजावणी २८ सप्टेंबरला करणार आहेत.
किरीट सोमय्या हे आपला कोल्हापूर दौरा कराडपर्यंतच जाऊन अर्धवट टाकून २० सप्टेंबर रोजी मुंबईला परत आले होते. मात्र आता सोमय्यांनी त्यांचा नव्याने कोल्हापूरचा दौरा निश्चित केला आहे. त्यामुळे आता तरी सोमय्या कोल्हापुरात जाऊ शकणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
किरीट सोमय्या यांनी या नियोजित दौऱ्याची माहिती लेखी पत्राद्वारे कोल्हापूरचे पोलिस अधीक्षकांना कळविली आहे. ते पत्र सोमय्या यांनी ट्विट केले आहे. या पत्रात सोमय्या म्हणतात की, २० सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनामुळे आपण जमावबंदीचा आदेश लागू केला होता, त्यामुळे मला कोल्ह्यापुरात प्रवेश बंदी करण्यात आली होती,
मात्र आता मी २८ सप्टेंबर रोजी कोल्हापूरला येत आहे. मला सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा, गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना घोटाळा आणि हसन मुश्रीफ यांच्या परिवाराचा घोटाळा या संदर्भात कागलला यायचे आहे. माझ्यावर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या बंदीचा आदेश २० सप्टेंबरला काढण्यात आला होता.
मी आता २७ सप्टेंबरला रात्री मुंबईहून निघून २८ सप्टेंबरला कोल्हापूरला येणार आहे. माझे पूर्वी दिलेल्या माहितीप्रमाणे सर्व कार्यक्रम होणार आहेत. २८ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता महालक्ष्मी अंबाबाईचे बाहेरून मंदिर दर्शन आणि आशीर्वाद घ्यायची इच्छा आहे, माझी योग्य सोय करावी, ही विनंती, असे सोमय्यांनी या पत्रात नमूद केले आहे. यावर कोल्हापूर पोलीस आता नेमकी काय भूमिका घेतात, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App