सागर शिंदे
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले परंतु काही संस्थाने मात्र भारतात सामील झाली नाही. त्यातील एक मोठा भूप्रदेश व लोकसंख्या असलेले संस्थान म्हणजे हैद्राबाद संस्थान होते. निजामाचे जुलमी वर्चस्व असलेल्या या प्रदेशातील जनतेने मात्र निजामाविरुद्ध स्वातंत्र्यासाठी मोठा लढा उभारला. अनेक वीर या संघर्षात हुतात्मा झाले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ने निजामाला स्पष्ट विरोध दर्शवला होता. फेडरेशन चे तत्कालीन प्रांत अध्यक्ष स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब मोरे यांनी निजामाच्या विरुद्ध दलित समाजाला उद्देशून एक पत्रक काढले होते. त्यात म्हटले होते कि, “निजामाची पदच्युती व्हावी. लोकशाहीवर आधारलेली जबाबदार लोकशाही राज्यपद्धती निर्माण झाली पाहिजे. हे प्रत्येक आंबेडकर अनुयायाचे धोरण असावे. म्हणून अस्पृश्य जनतेने रझाकार संघटनेत जाऊ नये तसेच मुसलमान धर्मातही प्रवेश करू नये.” या आवाहणास अनुसरून मराठवाड्यात ठिकठिकाणी झालेल्या निजाम विरोधी संघर्षात अनेक दलित बांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवला. Marathwada Mukti Sangram and Dr. Babasaheb Ambedkar
डॉ.आंबेडकरांनी हैद्राबाद संस्थानातील दलितांना आवाहन केले होते. “एक गोष्ट मला सांगावयाची आहे ती अशी की, पाकिस्तान आणि निजामाचे हैद्राबाद संस्थान यांतील मुसलमानांवर किंवा मुस्लिम लीगवर विश्वास ठेवण्याने दलित समाजाचा घात होईल….. पाकिस्तान आणि हैद्राबादमधल्या दलित समाजाला इस्लाम धर्माच्या दीक्षेला त्यांनी केवळ जीव वाचविण्याच्या हेतूने बळी पडू नये… हैद्राबादमधील दलित वर्गांनी निजामाची -जो उघड उघड हिंदुस्थान चा शत्रू आहे त्याची बाजू घेऊन आपल्या समाजाच्या तोंडाला काळिमा लावू नये”. ( संदर्भ – धनंजय कीर लिखित ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ चरित्र, पॉप्युलर प्रकाशन, पृ.क्र.४४३,४४३)
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यातील दलित, वंचित घटकाला स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रेरणा देणारी व निजामविरोधी पहिली जाहीर परिषद दि.३० डिसेंबर १९३८ रोजी मक्रणपूर(डांगरा) ता.कन्नड जि. औरंगाबाद येथे झाली. हि परिषद म्हणजे हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक क्षण होता. या परिषदेत स्वातंत्र्यसेनानी व शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे चे नेते भाऊसाहेब बी.एस.मोरे यांनी डॉ.आंबेडकरांच्या भाषनाच्या अगोदर ‘जय भीम’ या घोष वाक्याचा नारा दिला. हेच घोषवाक्य पुढे अभिवादानाचे, संघर्षाचे प्रेरणादायी प्रतिक बनले. असे असले तरी आज ओवेसी च्या एमआयएम AIMIM (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन) पक्षाचे लोक जे आजही मराठवाडा मुक्ती दिनाला विरोध करतात. या पक्षाचे खासदार मराठवाडा मुक्तीदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला अनुपस्थित राहतात. मात्र दलित मतबँकेवर डोळा ठेवून “जय भीम-जय मिम” चे फसवे नारे देतात. मुळात हा नारा जय भीम विरोधी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
हैदराबाद संस्थानावर भारत सरकारने कारवाई करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी तत्कालीन कायदामंत्री असलेले डॉ. आंबेडकरांशी सविस्तर चर्चा केली होती. डॉ.आंबेडकरांचे मत असे होते कि, आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची युनोमध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैद्राबाद संस्थानावर आक्रमण केले असे अनेक अर्थ निघू शकतील. डॉ.आंबेडकरांनी सुचना केली कि आपण सैन्य पाठवू पण या कारवाईला ‘पोलिस ऍक्शन’ असे नाव देवू. डॉ. बाबासाहेबांच्या सूचनेचा सरदार वल्लाभाई पटेल यांनी स्वीकार केला. त्या अगोदर आंतरराष्ट्रीय न्यायालयात व युनोमध्ये हैदराबाद संस्थानाची बाजू मांडावी म्हणून निजामाने डॉ.आंबेडकरांना विनंती केली होती. मात्र निजामाची विनंती धुडकावून लावत निजामाला युनोमध्ये प्रतिवाद करण्यासाठी यत्किंचितही जागा राहणार नाही, अशा रीतीने आंतरराष्ट्रीय कायद्याचा मागोवा घेत कायदेशीर बाजू सांभाळण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी केले. सप्टेंबर महिन्यात भारताने सैन्य पाठवले त्यापुढे निजामाचा टिकाव लागला नाही आणि निजाम शरण आला. १७ सप्टेंबर १९४८ साली हैद्राबाद संस्थान निजामाच्या जुलमी वर्चस्वातून मुक्त झाले.
भारतरत्न डॉ.आंबेडकरांनी धर्मांध निजामाला तसेच दलित, वंचित समाजाच्या होत असलेल्या इस्लाम धर्मांतराला विरोध केला. मराठवाड्यातील दलितांची स्थिती बिकट होती. निजामा कडून होत असलेले जुलूम, पिळवणूक, तसेच गरिबी, शिक्षणाचा प्रचंड अभाव आणि जातीय विषमता, भेदभाव अशी हि परिस्थिती बदलण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक होते. डॉ.आंबेडकरांनी औरंगाबादेत शिक्षण संस्था हि सुरु केली. अनेक स्वातंत्र्यसेनानी, स्वामी रामानंद तीर्थ, सरदार पटेल, डॉ.आंबेडकर यांच्या नेतृत्वामुळे धर्मांध निजामाच्या तावडीतून मराठवाडा स्वतंत्र झाला. भारत एक राहिला व विकासाची द्वारे खुली झाली. या समस्त स्वातंत्र्यसेनानी व महापुरुषांना विनम्र अभिवादन.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App