विशेष प्रतिनिधी
नाशिक – जनसंघाचे ज्येष्ठ नेते, आदर्श लोकप्रतिनिधी रामभाऊ म्हाळगी यांची आज ता. ९ जुलै २०२१ जन्मशताब्दी. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तरूण भारतच्या रामभाऊ म्हाळगी विशेषांकात त्यांच्या आठवणी लिहून पवारांनी म्हाळगी यांच्या अलौकिक लोकप्रतिनिधित्वाचा आढावा घेतला आहे. sharad pawar pays tribute to Rambhau Mhalagi on his birth centenary
विचारधारा वेगळी असली, तरी रामभाऊ म्हाळगी आपल्या निर्भिड वक्तृत्वामुळे विधिमंडळात सर्वपक्षीय सदस्यांमध्ये लोकप्रिय होते. सत्ताधारी आणि विरोधक त्यांची भाषणे अगदी काळजीपूर्वक ऐकायचे, अशी आठवण पवारांनी लिहिली आहे. विधिमंडळात आपले विचार निर्भिड आणि निस्पृहपणे मांडणारे रामभाऊ म्हाळगी हे आदर्श लोकप्रतिनिधी होते.
१९५७ मध्ये ते पहिल्यांदा मुंबई प्रांताच्या विधिमंडळात मावळमधून निवडून आले तेव्हापासून त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम काम केले. १९६७ मध्ये मी विधानसभेत निवडून आल्यावर त्यांचे काम मला जवळून पाहाता आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाची विचारप्रणाली आणि संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रूजविण्यासाठी रामभाऊ म्हाळगींनी अहोरात्र मेहनत घेतली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी आधी जनसंघ आणि नंतर भाजप पोहोचविण्यासाठी अतिशय कष्ट घेतले.
राजकीय पद आणि प्रलोभनांपासून ते नेहमी दूर राहिले. ते हाडाचे स्वयंसेवक होते. देशात लोकशाही रूजविण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षित हवा ही त्यांची तळमळ होती. ठाण्याजवळ उत्तनला आज त्यांच्या नावाने प्रशिक्षण प्रबोधिनी आहे, हे त्यांचे उचित स्मारक आहे.
त्यांचे आणि माझे राजकीय विचार वेगळे असले, तरी एक प्रामाणिक, कर्तव्यकठोर आणि कष्टाळू संघटक म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय – सामाजिक इतिहासात रामभाऊ म्हाळगींच्या कार्याची नोंद होईल, अशा शब्दांत शरद पवारांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App