वर्षपूर्तीनिमित्ताने जनतेबरोबरील पत्रसंवादात काय लिहिलय पंतप्रधान मोदींनी…?


देशाने कायम नवी स्वप्ने पाहिली, नवीन संकल्प केले आणि हे संकल्प सिद्धीला नेण्यासाठी निरंतर निर्णय घेत पावले देखील उचलली….


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकालाची आज पहिली वर्षपूर्ती. या निमित्ताने मोदी यांनी जनतेशी पत्ररूप संवाद साधला आहे. गेल्या वर्षभरात काश्मीरमधून ३७० रद्द करणे, राम मंदिर बांधण्यास परवानगी, तिहेरी तलाक पद्धत रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. एकापाठोपाठ एक झालेल्या या ऐतिहासिक निर्णयांमध्ये भारताच्या विकास यात्रेला नवी गती मिळाली आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत, असे मोदी यांनी देशातील नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आले त्याला आज, (शनिवार ३०) एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने देशवासीयांना उद्देशून मोदी यांनी लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून सरकारच्या एक वर्षांच्या कारभाराचा आढावा घेतला आहे. २०१४ मध्ये सत्तेत आल्यावर पाच वर्षांत देशाने विविध यंत्रणांना निष्क्रियता आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीतून बाहेर पडताना पाहिले आहे.

त्या पाच वर्षांत देशाने अंत्योदय भावनेसह गरिबांचे जीवन सुलभ बनवण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न अनुभवले. त्या कार्यकाळात जगात भारताची प्रतिमा तर सुधारलीच, त्याचबरोबर गरिबांची बँक खाती उघडली, त्यांना मोफत गॅस जोडणी, मोफत वीज जोडणी दिली, शौचालये, घरे बांधून गरिबांची प्रतिष्ठा देखील वाढवण्यात आली.

सरकारच्या आधीच्या कार्यकाळात सर्जिकल हल्ला व हवाई हल्ला झाला, निवृत्त सैनिकांना एक पद एक निवृत्तीवेतन, एक देश, एक कर, शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या किमान हमी भावाच्या मागण्या देखील पूर्ण करण्याचे काम केले याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.

  • भारताच्या या ऐतिहासिक प्रवासात देशातील प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक व्यक्तीने उत्तम प्रकारे आपली जबाबदारी पार पाडली आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र घेऊन आज देश सामाजिक, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये पुढे वाटचाल करत आहे.
  • संरक्षण दल प्रमुख हे पद निर्माण केल्यामुळे सैन्य दलात समन्वय वाढला आहे तसेच ‘गगनयान’ अभियानाच्या तयारीसाठीसुद्धा भारताने वेग वाढवला आहे. गरीब, शेतकरी,  महिला-युवा यांचे सक्षमीकरण करण्याला सरकारने प्राधान्य दिले. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत प्रत्येक शेतकऱ्याचा समावेश झाला आहे. गेल्या वर्षभरात या योजनेअंतर्गत साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या  खात्यात ७२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे..
  • देशातील १५ कोटींपेक्षा जास्त ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी जलजीवन अभियान सुरू करण्यात आले आहे.
  • ५० कोटींपेक्षा जास्त पशुधनाच्या चांगल्या आरोग्यासाठी मोफत लसीकरणाचे व्यापक प्रमाणावर अभियान राबविण्यात येत आहे..
  • देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार आणि असंघटित क्षेत्रातील श्रमिक या सर्वासाठी वयाच्या साठीनंतर नियमितपणे दरमहा तीन हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

करोनाचे संकट  

देशवासीयांच्या इच्छा- आकांक्षांच्या पूर्ततेसाठी  जलदगतीने मार्गक्रमण करीत असतानाच कोरोनाचे जागतिक संकट आले. करोनाने भारतालाही विळखा घातला. एकीकडे अत्याधुनिक आरोग्यसेवा आणि विशाल अर्थव्यवस्था असलेल्या जगातील मोठमोठय़ा महासत्ता आहेत तर दुसरीकडे इतकी प्रचंड लोकसंख्या आणि अनेक आव्हानांनी ग्रासलेला भारत आहे. जेव्हा करोनाचा संसर्ग वाढेल तेव्हा भारत पूर्ण जगासाठी संकट ठरू शकतो, अशी भीती काही जणांनी व्यक्त केली होती. परंतु भारताकडे बघण्याचा साऱ्या जगाचा दृष्टिकोन बदलला.

टाळ्या-थाळ्या वाजवून आणि दिवे प्रज्वलित करून तसेच सेनेकडून करोना योद्धय़ांचा सन्मान असेल, एक दिवसाची जनता टाळेबंदी असेल किंवा देशव्यापी टाळेबंदी दरम्यान नियमांचे निष्ठेने पालन असेल, या सर्व प्रसंगी भारत हीच आपली खरी शक्ती आहे हे साऱ्यांनी दाखवून दिले. इतक्या मोठय़ा संकटात सर्व घटकांना त्रास झाला किंवा गैरसोय झाली. श्रमिक मित्र, प्रवासी कामगार बंधू-भगिनी, छोटय़ा-छोटय़ा उद्योगात काम करणारे कारागीर, स्थानकांवर सामान विकणारे, टपरी -हातगाडी लावणारे,  दुकानदार , लघू उद्योजक अशा सहकाऱ्यांनी अपरिमित यातना सोसल्या आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करीत आहोत, असे मोदी यांनी म्हटले..

जम्मू आणि काश्मीरला घटनेच्या ३७० व्या अनुच्छेदानुसार असलेला विशेषाधिकार रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा, राम मंदिर बांधण्याच्या दृष्टीने अनुकूल पाऊल, तिहेरी तलाक पद्धत रद्द करणे यासारखे काही महत्त्वाचे निर्णय वर्षभरात घेण्यात आले.  एका वर्षांत देशाने कायम नवी स्वप्ने पाहिली, नवीन संकल्प केले आणि हे संकल्प सिद्धीला नेण्यासाठी निरंतर निर्णय घेत पावले देखील उचलली.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात