विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मित्रांनो, लक्ष्मणरेषा ओलांडू नका. जगात काही लोकांनी ती ओलांडली आणि आज त्यांना पश्चाताप होतोय. कृपया सरकारचे दिशानिर्देश पाळा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात आज केले. ते म्हणाले, “कोरोना विरोधातील लढाईत अनेकजण घराबाहेर आहेत. ते बाहेरून संघर्ष करताहेत. त्यांच्या अनुभवातून आपण शिकले पाहिजे.” पंतप्रधानांनी या संवादातून काही लोकांचे अनुभव एेकवले. कोरोनापासून सावधानता बाळगण्यासंबंधीच्या बारकावे यात होते. रामगम्पा तेजा यांनी कोरोनातून बाहेर पडताना आलेले अनुभव सांगितले. अशोक कपूर यांनीही अनुभव सांगितले. त्यांचे संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित झाले होते, ते यातून बाहेर आले. घाबरून जाण्यापेक्षा वेळेत उपचार आणि काळजी घेतल्याने कोरोना बरा होतो, याची ग्वाही त्यांनी पंतप्रधानांना दिली. डॉ. अशोक गुप्ता यांनीही पंतप्रधानांशी संवाद साधला. कोरोनाच्या बाधेपेक्षा घबराट अधिक आहे. लोकांना समजावले की त्यांचे मनोधैर्य वाढते, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. भारत दृढ निश्चयातून कोरोनावर मात करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. पुण्याच्या डॉ. गोडसे यांनी देखील अनुभव सांगितले. तरुणांना कोरोनाची बाधा अधिक होताना दिसल्याचा ट्रेंड डॉ. गोडसे यांनी सांगितला. होम क्वारंटाइन विषयी तपशीलवार माहिती त्यांनी सांगितली. कोरोना फैलावापुढे प्रगत देशातल्या वैद्यकीय व्यवस्था तोकड्या पडल्या, असा इशारा पंतप्रधानांनी दिला. भारतात असे घडू नये, यासाठी संयम पाळून लॉकडाऊन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. आचार्य चरक यांनी वैद्यकीय सेवा करणाऱ्यांसाठी दिलेल्या संदेशाची आठवण त्यांनी करवून दिली.
आंतरराष्ट्रीय नर्स आणि मिडवाइफ वर्षानिमित्त पंतप्रधानांनी त्यांच्या विषयी विशेष आभार व्यक्त केले. सामान्यांच्या जीवनातील रियल हिरोंविषयी त्यांनी कौतूकोद्गार काढले. डॉक्टर, बँकिंग, छोटे दुकानदार, घरगुती सेवा करणारे, डिजिटल दुनियेतील लोक आणि काम करणारे यांच्या विषयी पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले. कोरोनाग्रस्त संशयितांशी काही ठिकाणी गैरव्यवहार झाला, या बद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सोशल डिस्टंसिंगचा अर्थ सोशल कॉन्टँक्ट तोडणे नाही. आपण नवीन तंत्राच्या आधारे नव्या गोष्टी करा. आपापले जुने छंद जोपासा, नवीन काही तरी शिका. आपल्यातील काळाच्या ओघात लपलेल्या गुणांचा शोध घ्या. नरेंद्र मोदी अँप वर मी काय करतो, याचे व्हिडीओ अपलोड करीन ते तुम्ही पाहा, असे आवाहन त्यांनी केले. लॉकडाऊनमुळे तुमचे बाहेर जाणे बंद आहे, स्वत:च्या अंर्तमनात डोकावणे बंद करू नका. भारत दृढ निश्चयातून कोरोनाला हरवेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App