सिंहगडावर जाण्याचा प्लॅन असेल तर थांबा! रेड अलर्टमुळे प्रवेशावर बंदी

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत भारतीय हवामान विभागाने (IMD) ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत १ आणि २ ऑगस्ट २०२६ (शनिवार व रविवार) या दोन दिवसांसाठी सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय पुणे वन विभागाने घेतला आहे.

वीकेंडच्या सुट्ट्यांमध्ये सिंहगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, सततच्या मुसळधार पावसामुळे घाट परिसरात दरड कोसळण्याचा आणि मोठे दगड किंवा झाडे रस्त्यावर येण्याचा धोका वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

घाट रस्ता आणि पायवाटांवरही बंदी

वन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार सिंहगडाकडे जाणारा मुख्य घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच ट्रेकर्स वापरत असलेल्या सर्व पायवाटा आणि पर्यायी मार्गांवरूनही गडावर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.



दरड कोसळण्याचा धोका वाढला

गेल्या काही दिवसांपासून सिंहगड परिसरात जोरदार पाऊस सुरू असून डोंगरकडे सैल झाले आहेत. त्यामुळे घाट रस्त्यावर दरड कोसळणे, मोठे दगड घसरणे किंवा झाडे पडण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही जुलै महिन्यात मुख्य प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याची घटना घडली होती. अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि पर्यटकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

वन विभाग आणि स्थानिक पोलिसांनी नागरिकांना पावसाळी पर्यटनासाठी सिंहगड परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर आणि सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतरच किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Sinhagad Fort Closed in this weekend

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात