नाशिक : बिहार सारख्या मोठ्या राज्यात शांतपणे सत्तांतर घडवून नितीश कुमार राज्यसभेत येऊन भाजपच्या मुख्य टीम मध्ये सामील झाले, पण शरद पवार वयाच्या 86 व्या वर्षी राज्यसभेत येऊन सुद्धा अजून “राखीव” खेळाडूच्या भूमिकेतून बाहेर पडू शकले नाहीत. शरद पवारांनी महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळवून राज्यसभेत एन्ट्री केली असली, तरी भाजपच्या दृष्टीने पवारांचे स्थान “राखीव” खेळाडूच्या पलीकडचे नाही. Nitish Kumar
– मोदी + शाह यांची पवारांना असाइनमेंट
कारण मूळातच मोदी + शाह यांनी शरद पवार यांना असाइनमेंटच ही दिली आहे, की त्यांनी INDI आघाडीत राहून काँग्रेसला पोखरत राहावे. शिवसेनेला डिवचत राहावे आणि भाजपच्या सत्तेचे अनुषंगिक फायदे मिळवत राहावे. त्यापलीकडे शरद पवारांना मोदी – शाह यांनी कुठली भूमिकाच राखून ठेवलेली नाही आणि ती भूमिका शरद पवारांनी मान्य केल्यानेच भाजपने किंवा शिवसेनेने सातवा गडी राज्यसभेच्या मैदानात उतरविला नाही. अन्यथा शिंदे सेनेने आज सकाळपासून सातवा गडी म्हणून रोहित टिळकांचे नाव समोर आणलेच होते. पण रोहित टिळकांनी अर्ज भरला नाही म्हणून शरद पवारांची राज्यसभा निवडणूक बिनविरोध होऊ शकली. अन्यथा महायुतीने सातवा उमेदवार दिला असता, तर शरद पवारांचा पराभव झाला असता, असे वक्तव्य भाजपचे नवोदित आमदार परिणय फुके यांनी करून राजकीय राळ उडवून दिली होती.
– भाजपचा शब्द पवारांना नाही पचला
वास्तविक शरद पवारांना 2019 मध्ये मोदी आणि शाह यांनी सन्मानपूर्वक भाजपच्या टीम मध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यातून सुप्रिया सुळे यांचे राजकीय बस्तान बसवायचा शब्दसुद्धा दिला होता. पण शरद पवारांना आणि सुप्रिया सुळे यांना हा शब्द नीट “पचला” नाही. त्यांना स्वबळाविषयी एवढा भ्रम झाला, की आपणच महाराष्ट्राचे राजकारण एकट्याच्या हिंमतीवर हलवू शकतो, असे वाटले, पण प्रत्यक्षात तो प्रयोग अडीच वर्षांपेक्षा पलीकडे जाऊ शकला नाही आणि त्यानंतरच्या राजकीय प्रयोगांनी शरद पवारांना एवढे जेरीस आणले, की त्यांनी स्थापन केलेला पक्ष सुद्धा त्यांच्या पुतण्याने त्यांच्या हातातून काढून घेऊन तो भाजपच्या वळचणीला नेऊन बांधला. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांनी विलीनीकरणाच्या नावाखाली अजितदादांचा पक्ष कब्जात घ्यायचा “डाव” खेळला पण सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भाजपच्या साथीने तो “डाव” हाणून पाडला. शरद पवारांच्या विरोधात राजकारणातले सगळे फासे पडले. शेवटी तर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांसारख्या नेत्यांना काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांकडे जाऊन लॉबिंग करून शरद पवारांसाठी राज्यसभा उमेदवारी मिळवावी लागली.
– भाजपने पवारांना उपकृत करून ठेवले
पण भाजपने आणि शिवसेनेने सातवा उमेदवार न देऊन शरद पवारांना बिनविरोध निवडून आणून त्यांना उपकृत करून ठेवले. किंबहुना त्यांना वेगळ्या प्रकारे असाइनमेंट देऊन आपल्या अंकित करून ठेवले. शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर निवडून आले असले, तरी त्यांचे काम एवढेच, की त्यांनी अदानींना बारामतीत नेऊन पाहुणचार करावा. काँग्रेसला पोखरत राहावे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचत राहावे. पण त्यापलीकडे भाजपच्या इच्छेच्या विरोधात जाऊन दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विचारही करू नये. भाजपची इच्छा झाली, तर विलीनीकरण होईल, अन्यथा भाजपच्या छत्रछायेखाली दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्रच वाटचाल करतील, अशी “व्यवस्थाच” मोदी + शाह यांनी करून मगच शरद पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होऊ दिली.
– नितीश कुमार सन्मानपूर्वक दिल्लीच्या राजकारणात
त्याउलट भाजपने नितीश कुमार यांना सन्मानाने बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करून त्यांच्या केंद्रीय राजकारणामध्ये पुनर्प्रवेश करून घेतला. शरद पवारांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सुप्रिया सुळे, संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ वगैरे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेते मुंबईच्या विधानभवनात हजर राहिले. तिथे उद्धव ठाकरे किंवा राहुल गांधी आणि अगदी आदित्य ठाकरे सुद्धा गैरहजर राहिले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या गैरहजेरीचीच चर्चा जास्त रंगली.
– बिहारमध्ये अमित शाहांची हजेरी
त्याउलट नितीश कुमार नितीन नवीन यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बिहार विधानभवनात हजर राहिले. नितीश कुमार आणि नितीन नवीन यांनी अर्ज दाखल केल्यानंतर अमित शाह यांनी खास व्हिडिओ जारी करून त्या दोघांचे केंद्रीय राजकारणात स्वागत केले. त्याचबरोबर नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार यांना सुद्धा बिहारच्या राजकारणामध्ये सन्मानपूर्वक प्रतिष्ठित करायचा शब्द दिला. नितीश कुमार सन्मानपूर्वक बिहारच्या राजकारणातून बाहेर पडून केंद्रीय राजकारणात भाजपच्या मुख्य टीम मध्ये सहभागी झाले. त्याउलट शरद पवारांना मात्र राज्यसभेच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीत झगडावे लागले आणि महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळून सुद्धा भाजपचा “राखीव” खेळाडू म्हणून राज्यसभेत प्रवेश मिळवावा लागला. त्यापलीकडे भाजपने पवारांना कुठली किंमत दिली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App