नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या exit नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याचे असे काही त्रांगडे झाले आहे, की त्यातून सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार, असा मुख्य नेतृत्वाचा पेच तयार झालंय. त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची सत्तेसाठी खेचाखेच उघड्यावर आली आहे. या सगळ्यांमध्ये शरद पवारांच्या एकछत्री अंमलाला सुरुंग लागला आहे.
– राजकीय घोंगडे अडकले
अजित पवार हयात नसताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाचा अंतिम निर्णय पवार कुटुंबीय आणि शरद पवारच घेतील, अशा बातम्या जरी मराठी माध्यमांनी दिल्या असल्या, तरी जर तो निर्णय फक्त पवार कुटुंबीय आणि शरद पवार यांच्याच हातात असता, तर ते तो निर्णय घेऊन केव्हाच मोकळे झाले असते, पण दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणाचा निर्णय आणि त्यातले राजकीय ताणेबाणे हे एकट्या पवार कुटुंबीयांच्या आणि शरद पवार यांच्या हातात उरले नाहीत, तर ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या हातात गेलेत, म्हणून तर बऱ्याच जणांचे राजकीय घोंगडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या पायाखाली अडकले आहे.
– दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची खेचाखेच
दोन्ही राष्ट्रवादींचे एकीकरण व्हावे, यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, रोहित पवार हे नेते आग्रही आहेत. कारण त्यांना महाराष्ट्रातल्या सत्तेतला वाटा हवा आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे एकीकरण सध्यातरी होऊ नये, यासाठी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, उमेश पाटील आदी नेते प्रयत्न करत आहेत. कारण त्यांना शरद पवारांच्या गटातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या सत्तेत वाटेकरी होऊ द्यायचे नाहीये. याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादींच्या दुसऱ्या फळ्यांमध्ये सत्तेसाठी अभूतपूर्व खेचाखेचा सुरू आहे. ही खेचाखच सोडविणे एकट्या शरद पवारांचा राजकीय घास उरलेला नाही. कारण एकट्या शरद पवारांना तो पेच सोडवता आला असता, तर त्यांनी तो कधीच सोडवला असता. पण एकट्या पवारांना तो पेच सोडवता येणे शक्य नाही. कारण त्यांच्या हातात तेवढी सत्ताच उरलेली नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला राष्ट्रवादीतल्या पेचामध्ये नजीकच्या भविष्यकाळात हस्तक्षेप करावाच लागेल. अन्यथा राष्ट्रवादीतला पेच सुटणे कठीण आहे.
– सुनेत्रा पवारांचे नेतृत्व वरचढ
त्याचवेळी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केले, तर पवारांच्या घरातच सुप्रिया सुळे यांना स्पर्धा ठरणारे नेतृत्व उभे राहील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे गेले, की सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुरते संकुचित राहील. दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या तरी सुनेत्रा पवारांचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वापेक्षा वरचढ ठरेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सुप्रिया सुळे यांचे राजकीय भवितव्य टप्प्याटप्प्याने धूसर होत जाईल, याची भीती शरद पवारांना आणि त्यांच्या गटातल्या नेत्यांना भेडसावते आहे. त्यामुळे आत्ताच संधी आहे, तर दोन्ही राष्ट्रवादींचे ऐक्य करा आणि शरद पवारांच्या गटातल्या नेत्यांना सत्तेतला वाटा द्या. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व प्रस्थापित करा, असा शरद पवारांच्या गटातल्या नेत्यांचा आग्रह आणि होरा आहे.
– भाजपच्या नेत्यांची भूमिका निर्णायक
पण या सगळ्यांमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका सर्वाधिक निर्णायक ठरणार आहे. कारण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातल्या किंवा केंद्रातल्या सत्तेचा फारच मर्यादित वाटा राष्ट्रवादीच्या नावाने बाजूला काढून ठेवलाय. भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व राष्ट्रवादीच्या सत्तेच्या वाट्यात वाढ करण्याच्या मनःस्थितीत नाही. थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या आठ मंत्री पदांपेक्षा जास्त मंत्री पदे त्यांना मिळण्याची शक्यता नाही. अगदीच वाढवून मिळाली, तर एक किंवा दोन मंत्रिपदे वाढवून मिळतील. म्हणजेच मंत्री पदांची संख्या 10 पेक्षा जास्त होणार नाही.
– मंत्रिपदांच्या संख्येची मर्यादा
याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्या आणि त्यांचे आमदारांचे संख्याबळ 41 + 10 = 51 असे झाले, तरी एकीकृत 10 पेक्षा जास्त मंत्रिपदी मिळणार नाहीत. म्हणजेच राष्ट्रवादीचा सत्तेतला वाटा तेव्हा सुद्धा संकुचितच राहील. म्हणूनच दोन्ही राष्ट्रवादी एक व्हायला नकोत. अगदी होणारच असल्या, तर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष केल्यानंतर व्हाव्यात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेतला कमीत कमी वाटा द्यावा, यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते दिल्ली पासून मुंबई पर्यंत कठोर प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना दिल्लीतून “बळ” मिळते आहे. कारण त्याशिवाय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासारखे नेते उघडपणे सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभे राहणे शक्य नाही.
– पवारांची खंत
या सगळ्या राजकारणाचा एकूण अर्थ असा, की महाराष्ट्रातल्या राजकीय पट मांडणीत शरद पवारांच्या निर्णयाचा वाटा संकुचित झालाय, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा वाटा सिंहाचा बनलाय. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केले, तर पवारांच्या घरातलीच व्यक्ती त्या पदावर बसेल. महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळेल, पण ती “बाहेरून पवारांच्या घरात आलेली महिला” असेल. “मूळची पवार महिला” नसेल, याची खंत शरद पवारांना सतत वाटत राहील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App