धर्मेंद्र यांना पद्मविभूषण; अलका याज्ञिक यांना पद्मभूषण; रोहित शर्मा, रघुवीर खेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील 11 जणांना पद्मश्री

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2026 या वर्षासाठी 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील एकूण 15 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहे. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह पाच व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहे.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते शिबू सोरेन आणि गायिका अलका याज्ञिक यांच्यासह 13 व्यक्तींची पद्मभूषणसाठी निवड करण्यात आली आहे.

दुसरीकडे, क्रिकेटपटू रोहित शर्मा, अभिनेता आर. माधवन, पॅरा-अ‍ॅथलीट प्रवीण कुमार, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि हॉकीपटू सविता पुनिया यांच्यासह 113 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.

पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी 19 महिला आहेत. त्यापैकी सहा परदेशी/NRI/PIO/OCI श्रेणीतील आहेत. सोळा व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील एकूण 15 जणांना पद्म पुरस्कार

महाराष्ट्रातून दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण, तर अलका याज्ञिक, दिवंगत पीयूष पांडे(मरणोत्तर), उदय कोटक यांना पद्मभूषण तर क्रिकेटपटू रोहित शर्मा, अभिनेता आर माधवन, लोकनाट्य कलावंत रघुवीर खेडकर, डॉ. अर्मिडा फर्नांडिस, तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा व श्रीरंग लाड यांच्यासह 11 पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली आहे.

महाराष्ट्रातील पद्म विजेते

पद्मविभूषण

धर्मेंद सिंह देओल (मरणोत्तर) (कला)

पद्मभूषण

अलका याज्ञिक (कला)
पीयूष पांडे (मरणोत्तर) (कला)
उदय कोटक (उद्योग)

पद्मश्री

अर्मिडा फर्नांडिस (मेडिसिन)
अशोक खाडे (उद्योग)
भिकल्या लाडक्या धिंडा (कला)
जनार्धन बापुराव बोठे (सामाजिक कार्य)
जुझेर वासी (विज्ञान व अभियांत्रिकी)
माधवन रंगनाथन (कला)
रघुवीर खेडकर (कला)
रोहित शर्मा (क्रीडा)
सतीश शाह(मरणोत्तर) (कला)
सत्यनारायण नवल (उद्योग)
श्रीरंग लाड (कृषी)

धर्मेंद्र यांच्यासह 5 जणांना पद्मविभूषण

लोककलेचा सन्मान: रघुवीर खेडकर (कला)

नगर जिल्ह्यातील तमाशा परंपरेचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर’ या तमाशा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी लोककलेची सेवा केली. तमाशासारख्या ग्रामीण कलेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा असून, त्यांच्या या गौरवामुळे संपूर्ण लोककला विश्वात आनंदाचे वातावरण आहे.



वैद्यकीय क्षेत्रात क्रांती: डॉ. अर्मिडा फर्नांडिस (औषधोपचार)

मुंबईतील सायन रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि ‘स्नेहा’ (SNEHA) संस्थेच्या संस्थापिका डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे. आशियातील पहिली ‘ह्युमन मिल्क बँक’ (मानवी दुग्धपेढी) स्थापन करण्याचे श्रेय त्यांना जाते. नवजात बालकांचा मृत्यूदर रोखण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील माता-बालकांच्या आरोग्यासाठी त्यांनी केलेले कार्य जागतिक स्तरावर नावाजले गेले आहे.

कृषी ऋषी: श्रीरंग लाड (कृषी)

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील शेतकरी श्रीरंग लाड यांना कापूस संशोधनातील त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कोणत्याही मोठ्या पदव्या नसताना, केवळ अनुभवाच्या जोरावर त्यांनी कापसाच्या अशा वाणांचा शोध लावला, ज्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या या कार्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी उभारी मिळाली असून, एका सामान्य शेतकऱ्याचा हा गौरव कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

पालघरचे ‘तारपा सम्राट’ भिकल्या लाडक्या धिंडा

आदिवासी वारली संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘तारपा’ वाद्याला जागतिक ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ कलाकार भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पालघरच्या वाळवंडे गावच्या या ९० वर्षीय कलाकाराने गेल्या १५० वर्षांची कौटुंबिक वादन परंपरा जिवंत ठेवली आहे.

पद्म पुरस्कार 3 श्रेणींमध्ये दिले जातात

देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेले पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात – पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. हे पुरस्कार कला, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, उद्योग, वैद्यकीय, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्यासाठी दिले जातात.

Padma Awards 2026: Dharmendra, Alka Yagnik, Rohit Sharma Among Winners

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात