विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : Sujay Vikhe Patil अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिस दलासाठी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, स्थानिक गुन्हे शाखेतीलच एक कर्मचारी एमडी ड्रग्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. नार्कोटिक विभागाची जबाबदारी सांभाळणारा हवालदार शामसुंदर गुजर याला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या खाकीचाच हात ड्रग्स रॅकेटमध्ये असल्याचं उघड झाल्याने पोलिस प्रशासनाची विश्वासार्हता मोठ्या प्रश्नचिन्हाखाली आली आहे.Sujay Vikhe Patil
ही कारवाई मंगळवारी, 20 जानेवारी रोजी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली. शिरूर शहरात करण्यात आलेल्या छाप्यात एक किलोहून अधिक मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले असून, गॅरेज चालक शादाब शेख याला अटक करण्यात आली होती. तपास पुढे जात असतानाच या ड्रग्स रॅकेटमध्ये अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार शामसुंदर गुजर याचा थेट सहभाग असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरला अटक केली आणि अहिल्यानगर पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली.Sujay Vikhe Patil
या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालं असून, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पोलिस प्रशासनावर थेट बोट ठेवत स्फोटक प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक गंभीर गुन्हा पारनेर तालुक्याशीच का जोडला जातो? असा सवाल उपस्थित करत त्यांनी या प्रकरणामागे मोठे मासे असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ड्रग्ससारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये केवळ लहान आरोपी नव्हे, तर त्यामागे प्रभावशाली व्यक्ती आणि राजकीय हस्तक्षेप असण्याची शक्यता असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.
विखे पाटील यांनी या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आरोपी हवालदार शामसुंदर गुजर याची पारनेरवरून स्थानिक गुन्हे शाखेत बदली कोणाच्या शिफारशीवर झाली? एमडी ड्रग्स पारनेरमध्ये नेमकं कोणाच्या घरी ठेवण्यात आलं होतं? या रॅकेटमध्ये सहभागी असलेले दोन व्यक्ती कोणाचे कार्यकर्ते आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जाहीरपणे द्यावीत, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. आठवडाभरात सर्व नावे जाहीर करा, अन्यथा ती नावे मी स्वतः जाहीर करेन, असा थेट इशाराही विखे पाटील यांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे ‘ड्रग्समध्ये खाकीचा हात?’ असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे. कायद्याचे रक्षकच जर गुन्हेगारी जाळ्यात अडकत असतील, तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, या प्रकरणात आणखी कोणाची नावे पुढे येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पोलिस दलातील अंतर्गत यंत्रणाही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
अहिल्यानगरचं राजकारण आणि खाकी दोन्ही संशयाच्या छायेत
ड्रग्स प्रकरणामागे राजकीय आशीर्वाद आहे का, असा गंभीर प्रश्नही या निमित्ताने पुढे आला आहे. आरोपींच्या बदल्या, संरक्षण आणि कारवाईतील ढिलाई यामुळे राजकीय हस्तक्षेपाचा संशय अधिक बळावत आहे. पोलिस प्रशासन यावर मौन बाळगणार की कठोर कारवाई करणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. विखे पाटील यांनी दिलेल्या आठवड्याच्या अल्टिमेटमनंतर कोणकोणती नावे उघड होतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष केंद्रीत झालं आहे. सध्या अहिल्यानगरचं राजकारण आणि खाकी दोन्ही संशयाच्या छायेत सापडले आहेत.
महापौर निवडीचा अंतिम निर्णय मुंबई स्तरावर
दरम्यान, या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर निवडीबाबतही महत्त्वाची माहिती दिली आहे. अहिल्यानगर महापालिकेत महापौर पद ओबीसी महिलांसाठी राखीव असून, या निवडीचा अंतिम निर्णय मुंबई स्तरावर घेतला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संयुक्त बैठक होणार असून, त्यानंतर महापौरपदाबाबत शिक्कामोर्तब केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. एकीकडे ड्रग्स प्रकरणामुळे पोलिस प्रशासन अडचणीत असताना, दुसरीकडे महापौर निवडीमुळे अहिल्यानगरचं राजकीय तापमानही वाढत चाललं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App