विशेष प्रतिनिधी
पुणे : भारतातील कोणतीही भाषा संस्कृतशिवाय नाही. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान, विज्ञान, चिंतन आणि जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी संस्कृत भाषेशिवाय पर्याय नाही. खऱ्या अर्थाने संस्कृतशिवाय भारतीयत्व अथवा हिंदुत्व अपूर्ण आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.Sanskrit; Bhaiyyaji Joshi’s clarion call; Publication of 10 books in Sanskrit
संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने १० संस्कृत पुस्तकांचे लोकार्पण गुरुवारी (दि. २२ जानेवारी) करण्यात आले. टिळक रस्त्यावरील गणेश सभागृहात आयोजित कार्यक्रमात भैय्याजी जोशी बोलत होते. यावेळी राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलपती प्रा. वेंपटी कुटुंबशास्त्री, अखिल भारतीय गीता शिक्षण प्रमुख शिरीष भेडसगावकर, संस्कृत भारतीचे पश्चिम मध्य क्षेत्र अध्यक्ष आणि डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष कर्नल सतीश परांजपे, पुणे महानगर अध्यक्ष डॉ. रामचंद्र सिधये आदि उपस्थित होते.
– भारत समजला नाही, त्यांनी…..
ज्यांना भारत समजला नाही, अशा लोकांच्या तोंडून संस्कृत भाषा मृत असल्याचे ऐकायला मिळते, असा खेद भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, “संस्कृतपेक्षाही मृत असलेली हिब्रू भाषा इस्रायलने जिवंत केली, नव्हे ती व्यवहारात आणली. यासाठी भाषेविषयी स्वाभिमान असला पाहिजे. सर्वच भाषांमध्ये समान संस्कृत शब्द असतानाही आपण संस्कृतबद्दल आस्था ठेवत नाही. संस्कृतमधील मूळ शब्दांचा अनुवाद करता येत नाही. त्यामुळे भारत समजून घेण्यासाठी आपल्याला संस्कृत भाषा समजून घ्यावीच लागेल.”
– संस्कृत भाषा भारताची संपत्ती
संस्कृत ही भारताची संपत्ती असल्याचे मत कुटुंबशास्त्री यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नवनवीन शोध लागत आहेत. जुन्या सिद्धांतांच्या मर्यादा लक्षात येत आहेत. मात्र संस्कृतमधील कोणतेही तत्त्वज्ञान किंवा सिद्धांत आजपर्यंत अव्यवहार्य ठरला नाही. त्यामुळे भारताच्या उद्धारासाठी सर्वांनी संस्कृत भाषेच्या उत्थानात योगदान द्यावे.” कार्यक्रमात ‘वंदना चंद्रनाग्रामात्’, ‘ग्रन्थरत्नरश्मिः’, ‘प्रभुचित्तम्’, ‘वर्तमानसंदर्भे हिंदुत्वस्य’, ‘ध्वनिः’, ‘भाषा-विश्लेषणरश्मिः’, ‘अस्माकं गृहम्’, ‘उद्गाराः’, ‘भरतमुनिप्रणीतं नाट्यशास्त्रम्’ आणि ‘कौटिलीयार्थशास्त्रम्’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
भेडसगावकर यांनी प्रस्तावना केली, मुक्ता मराठे यांनी सूत्रसंचालन केले आणि रामचंद्र सिधये यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन ओंकार जोशी यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App